Sunday, July 15, 2012

नियतीचा निर्णय





"योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती"

"ह्या धरतीवर बर्‍याच गोष्टींना दोन बाजू असतात.अगदी पृथ्वीपासून सुरवात केली तरी तिला उत्तर आणि दक्षीण धृव आहे.झाडांना शेंडा आणि मुळ आहे, काठीला दोन टोकं असतात अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.शेवटी,चांगलं प्रचलीत म्हणणं सांगायचं झाल्यास, वादालाही दोन बाजू असतात हे सांगता येईल."
शरद मला आपला मुद्दा समजावून सांगण्य़ाचा प्रयत्न करीत होता.
पुढे म्हणाला,
"कुणाही मध्यस्थ्याकडे जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडलीत आणि त्याचा निर्णय विचारलात तर तो पटकन सांगेल की दुसरी बाजू मला ऐकली पाहिजे."
मी शरदला म्हणालो,
"तुझं म्हणणं मला पटतं.एखाद्याने डोळ्यासमोर एखाद्याचा खून केला आणि न्यायाधीशाला सांगीतलं तरी न्यायाधीशपण म्हणतो तरीपण मला दुसरी बाजू ऐकली पाहिजे."

नंतर काही दिवसानी का कुणास ठाऊक शरदचं ते वाक्य दुसरी बाजू ऐकली पाहिजे माझ्या सारखं मनात घोळायला लागलं आणि मग कविता सुचली.ती अशी,

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीतोस मात्र नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com