Tuesday, July 31, 2012

"मी ही अशी"




"गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?"


दादर पश्चिमेला भवानी शंकर रोडवर इंदारा निवास ह्या बिल्डींगमधे आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो.तळमजल्यावर म्हणजे आमच्या खालीच देसाई कुटूंब रहायचं.देसायाना पाच मुलगे आणि एक मुलगी होती.मुलगी शेवटचीच म्हणून तिचं नाव सरला ठवलं होतं.
सरला शेंडेफळ असल्याने फारच लाडात वाढली होती.तिचे आईबाबा तिचे भरपूर लाड करायचेच त्याशिवाय पाच भावांना एकुलती बहिण म्हणून तेही तिचे लाड करायचे.त्यामुळे सरला खूपच लाडावून गेली होती.



पण भावंडात कधीतरी खटके उडायचे.मग क्वचित सरलावरपण राग काढला जायचा.सरला खूप बापुर्वाणी व्हायची.आमच्या सारख्या बाहेरून आलेल्याने चौकशी केली की म्हणायची,
"मी ही अशी"
आणि मग आपल्यावर कसा अन्याय होत आहे ते सांगायची.
म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा असायचा की,ह्या पाच भावांबरोबर राहून दिवस काढणं तितकं सोपं नाही.एखादा भाऊ म्हणायचा,
"तुझे खूपच लाड केले जात आहेत म्हणून तू अशी झाली आहेस"
कुणी म्हणायचा,
"तुझ्या जिभेला हाड नाही.वाट्टेलते बोलतेस"
वगैरे वगैरे.


मला तिच्या भावांचीपण कीव यायची.एकटी लाडावलेली बहिण असणं ही त्यांची एक व्यथाच झाली होती.
तिचं हे सगळं वागणं आणि अबलता बघून,आणि तिच्या भावांची व्यथा लक्षात येऊन, मला बत्तीस दातामधली एक जिभ आठवली.आणि कविता सुचली ती अशी,



दातांची व्यथा

एकदां जिभली बोले दातांना
मी अशी (बिचारी) एकटी असून  
बत्तीस भावांमधे कशी राहू रुसून


मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले इकडे तिकडे
दात करतात माझा चोळामोळा
कुणी विचारले काय झाले
तर सांगतात सर्व जीभ चावून


ऐकून हे जिभलीचे संभाषण
दात म्हणती लगेचच तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला


बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
धमकी देती लोक वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com