Tuesday, July 10, 2012

सत्तेची ही कसली खूमखूमी




मालती मला नेहमी म्हणायची की तिच्या नवर्‍याचं आणि तिच्या मोठ्या मुलाचं कधीच पटलं नाही.दुसरे दोन मुलगे त्यामानाने वडीलांशी पटवून घ्यायचे.न पटणार्‍या त्या दोघांमधे मालतीने कधीही हस्तक्षेप केला की तिच कुणा एकाला वाकडी व्हायची.
"बरोबर तू त्यांचीच बाजू घेणार.तुझा नवरा पडले ते."
असं उद्धव,तिचा मोठा मुलगा तिला म्हणायचा.
आणि मुलाची बाजू घेतली की
 "बरोबर आहे तो तुझ्या पोटचा गोळा. तू त्याचीच बाजू घेणार"
 असं मालतीचा नवरा तिला म्हणायचा.
"माझी मात्र कात्रीत सापडल्यासारखी परिस्थिती व्हायची"
मालती मला म्हणायची.


मी मालतीला समजुत घालण्यासाठी म्हणायचो,
"अग,दोन व्यक्तिमधली ते पिढीचं अंतर आहे ना? मग ते तसंच व्ह्यायचं.एकमेकाने एकमेकाला समजून घेतलं नाही की हा वाद व्हायचाच.आईची स्थिती निराळी असते.तिला तडजोड करून घ्यायची निसर्गाचीच देणगी असते.अपवाद सोडल्यास आता जे काय तू म्हणालीस तशा प्रकारच्या बर्‍याच  घरातल्या तक्रारी असतात."


ह्या गोष्टीला आता खूप दिवस होऊन गेले.ह्यावेळी मी कोकणात गेलो होतो तेव्हा मला कुणीतरी सांगीतलं की मालती आणि तिचा नवरा कायमचे कोकणात रहायला आले आहेत.मालतीच्या नवर्‍याला परॅलिसीसचा आजार झाल्याने त्याला सतत कुणाचीतरी मदत लागायची.शहरात रहाण्यापेक्षा कोकणात कुणालातरी कामाला ठेवायला माणसं मिळतात.खर्चही कमी येतो.मुलांच्या आधाराने रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं कमी तापदायक आहे.असा विचार करून ती दोघं कोकणात येऊन राहिली. 


त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो.
मालती आपल्या उतार वयातल्या कर्मकथा सांगत होती.
मला म्हणाली,
"काय सांगू आमचे भोग आणि आमची कर्मदशा असं म्ह्टलं पाहिजे आणखी काय? उद्धवाकडून मानहानी शिवाय काहीच मिळत नव्हतं."


त्यांचा निरोप घेऊन घरी जाताना मी माझ्या मनात म्हणालो नवं सरकार येतं आणि सत्ता बदलते."
त्यातूनच मला एक कविता सुचली,

उद्धवा! अजब तुझे सरकार

उजाडूनी दिवस होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
वाटते त्याही पेक्षा ती रात्र बरी


उजळणी दिवसाची होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच असे तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com