Wednesday, February 20, 2008

मंदाची बाईआज्जी

एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं.
म्हणाली,
"माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता. खानोलीच्या घाटीवरून खाली उतरल्यावर समुद्रसपाटीवर बरीचशी घरं एका रांगेत बांधलेली होती.हिरव्या गार माडांच्या बनात ही घरं वरच्या डोंगरावरून हिरव्या पानांमधे ओवलेल्या मण्यांच्या माळे सारखी दिसायची.समुद्राच्या फेसाळ दुधाळलेल्या लाटा पाहून देखावा रम्य दिसायचा."
मी म्हणालो,
"मंदा, पण तुला समुद्राच्या विषयावरून आजीची आठवण आली का?"
ती म्हणाली,
"होय,एक म्हणजे आपण जुन्या माणसाबद्दल बोलत होतो आणि कुणी तरी कोकणातल्या समुद्रावर विषय काढला,आणि ह्या दोनही गोष्टी माझ्या बाईआजीशी निगडीत होत्या"
"मग पुढे काय झालं ते सांग"असं शरद तिला म्हणाला.

मंदा सांगू लागली,
" माझी बाईआजी वयाच्या त्रेचाळीस वर्षावर आजोबा गेल्याने विधवा झाली.पईपैसा जमविण्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतं.
माझ्या आईचे आणि माझ्या दोन मावशांचे कपडे ती घरीच शिवायची.मला विणता येतं पण मला नीट शिवता येत नाही. शिवायला गेले तर वाकडं तिकडं शिवलं जातं.आणि मी त्यामुळे खूप हिरमुसली होते. शिवणासाठी बरीच सहनशीलता,थोडं गणीत,आणि जास्त नेमकेपणा असावा लागतो.तो माझ्याकडून होत
नसावा."
शिवणकामाच्या विषयातून हिला काय सांगायचं आहे हे कळण्यासाठी माझी जरा उत्सुकता वाढली.आणि मी म्हणालो,
"बरं पुढे"
माझ्याक्डे बघून हंसत हंसत म्हणाली,
" अलिकडे मी जराशी उत्सुक्त होवून काही काळ बसून गचाळा सारखं जरी एखादा फाटका शर्ट शिवला, एखाद्दया स्कर्टला हेम घातली,एखाद्दया जीनला पॅच लावला,तरी माझ्या एक लक्षात येतं की,मी जुळवाजुळवी जास्त करते.जास्त जमवून घेते.
त्यावरून माझं मन समाधान होतं आणि समजूत करून घेते, की मी सुई दोरा घेवून जे करते ते फाटलेलं शिवण्या पलिकडचं असतं.जगातल्या मोठमोठ्या संमस्या सोडवता जरी आल्या नाही तरी जवळ असलेल्या समस्याना ठिगळ घालू शकते.काही तरी गाठू शकते.कपड्याच्या बाबतीत,ते फेकून देण्यापेक्षा वापरात आणण्याचं समाधान होतं, उमेद येते."
मी म्हटलं,
"म्हणजे तुला म्हणायचं तरी काय ?"
मंदा म्हणाली,
"ठिगळ लावणं आणि नव दिसण्या सारखं दुरुस्थ करणं,यात फरक आहे.दुरुस्थ केल्याने मुळ गोष्टीचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो आणि ठिगळ लावण्याने त्याचा मागमूस राहतो,त्याशिवाय ठिगळ लावून पण वापरता येतं ह्याची साक्ष राहते.ज्यावेळी आपण तुटलेली नाती जोडतो,त्यावेळी नक्कीच वाटतं की दुरावण्यापेक्षा आपण जवळ असणं बरं,आणि कदाचीत उसवलेलं दुरुस्थ करण्यापेक्षा ठिगळ लावून जास्त मजबूत असणं बरं."
मी म्हणालो,
"तुझ्या बाईआजीचं काय झालं?"

मंदा म्हणाली,
"तेच तर सांगते,अगदी वंय झाल्यावर ती एकटीच असताना एकदा तिच्या घरात एक चोर शिरून त्याने चोरी करून सुद्धा तिला जखमी करून गेला.तिला खूप मानसीक धक्का बसला.आमच्या तोंडफटक्ळ कुटुंबातल्या कुणीही ही गोष्ट जाहिर केली नाही.मला तर पांच वर्षानी कळली.मला एक दिसून आलं की माझ्या बाईआजीने नवे कपडे शिवायचं बंद केलं.जे हाताजवळ येईल त्याला आता ती ठिगळच लावू लागली.जणू ती तिच्यावर झालेल्या आघाताच्या जखमेवर मलम लावून तिच्या दुखावलेल्या हृदयाचे, शरिराचे आणि मनाचे संबंध सांधत होती.जणू उसवलेली शिवण ठिगळ लावून ठेवत होती."
हे ऐकून मी म्हणालो,
"म्हणजे मंदा, तुला असंच म्हणायचं आहे ना की कपड्याची ठिगळ पुर्वी इथं फाटलं होतं हे लपवत नाही."
"अगदी बरोबर " मंदा म्हणाली
आणि वर पुढे म्हणाली,
" म्हणूनच म्हणते माझे ठिगळलेले कपडे,माझी गैरसमजाने दुरावलेली नाती अशीच ठिगळ लावून पहाताना बाईआजीची मला खूप आठवण करून देते"
शेवटी जाता जाता मी मनात म्हणालो विषय कसा येईल,आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

No comments: