Monday, February 4, 2008

सुखाचा शोध

सुखाचा शोध


"सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही."

मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात
मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं.

एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो.
"जीवनात ही घडी अशीच राहू दे.
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो.एव्हड्यात बाहेरच्या बसस्टॉप वरती एक गरीब जोडपं भर पावसात एकमेकाला खेटून उभं राहून ओलं होवू नये म्हणून खटाटोप करीत होतं त्यांच्यावर माझी नजर गेली.थंडीची त्यांना हुडहुडी भरली होती. बरीचशी ती दोघं बेचैन वाटत होती. अंगावर त्यांच्या फुटपाथवर विकत घेतलेले कपडे दिसत
होते."पाणेरी" किंवा तत्सम दुकानातून घेतलेले नव्हते. मला ठाऊक आहे कारण मी त्याच्यातून गेलो होतो. ते जोडपं पावसाच्या पाण्यापासून ओलं न होण्यासाठी एकमेकाला खेटून राहून प्रयत्नांची पराकाष्टा करीत होतं.पण नंतर मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा ते एकमेकात खुषीने हंसत असताना दिसले.कदाचित एकमेकात विनोद करून हंसत होते.हे बघून मी एकाएकी त्यांच्या बद्दलची आलेली किंव सोडून देवून त्यांचा हेवा करू लागलो.

मनात म्हणालो काय गंम्मत आहे त्यांना पावसाचा त्रास होत नव्हता,त्यांच्या त्या तसल्या कपड्यांबद्दल त्यांना कसलाच त्रागा नव्हता,मी घरात आरामात बसलोय याचा पण त्यांना हेवा वाटत नव्हता.क्षणभर वाटलं त्यांच्या सारखं सुखी व्हावं.तो एक क्षण मला एक घटके सारखा वाटला.त्या क्षणात मला दिसून आलं की माझ्या सहानभुतीची त्यांना जरुरी भासली नाही,मला वाटलं होतं की त्यांना खूप कष्ट होत असतील पण तसं नव्हतं.आणि नंतर माझ्या चांगलच लक्षात आलं,आपल्याला आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करण्याची प्रचंड ताकद आहे.मला वाटतं,आपण सगळे हे करू शकतो.जीवन जगतानाच आयुष्याच्या संदर्भाने सुखी राहता येतं. सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती ईच्छा करून चालत नाही, किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची एकाग्रता करून चालत नाही. आपल्याच मनाच्या ताकदीने आपलीच आपल्याला मदत होवू शकते.सुखाचा शोध करू शकतो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: