Friday, February 22, 2008

खोट्या सुखाचा आणि आशेचा मोह.

प्रो.देसाई म्हणतात,
“जीवनात सतत अडचणी येतच असतात,म्हणून जे काही नशिबात आहे ते होणार असं समजून जर त्या अडचणींचा स्विकार केला,आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या झिडकारल्या तर जीवनात काहीच मिळवलं जाणार नाही. माणसाने स्वतःला बळी झालो असं समजू नये. उलट माणसाने आपली स्थिती जास्तीत जास्त स्विकारणीय आणि योग्य करण्याचा प्रयत्नात असलं पाहिजे.माणसाच्या मनात श्रद्धा का असावी? ह्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही,आणि त्याचं निवारण ही करता येत नाही.श्रद्धा कुणावरही लादता येत नाही, श्रद्धा करणाऱ्याचा श्रद्धेवर विश्वास असला पाहिजे.”
हे सर्व ऐकून मी म्हटलं,

“भाऊसाहेब,आज तुमचा विचार तरी काय आहे. आज कुठच्या विषयावर मला लेक्चर देणार आहात?”

यावर मला म्हणाले,
“आज मी तुम्हाला खोट्या सुखाचा मोह आणि खोट्या आशेचा स्विकार करीत राहणं ह्यावर थोडं काही सांगणार आहे.”
आणि मग पुढे म्हणाले,
” जबाबदाऱ्या आणि श्रद्धा याची सांगड घालून तृप्त झाल्यावर, मिळणारं समाधान कसं आनंदायी नसतं हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.खरं म्हणजे मानवतेला आपला स्वभावगुणधर्म बदलता आलेला नाही.’प्रत्येक गोष्ट घडायला कारण लागतं’ असं म्हणण्या पेक्षा,’ प्रत्येक कारणामुळे गोष्ट घडते’ असं म्हटलं तर मला जास्त मान्य होईल.पण हे काही खरं नाही.”

“हे खरं नाही तर, खरं काय आहे भाऊसाहेब?”असा मी त्याना प्रश्न केला.

त्यावर ते म्हणाले,
” हे बघा, हे म्हणणं केवळ देवाला वस्तुस्थिति मानून किंवा आपल्या शक्ति बाहेर किंवा आपल्या समजुतीच्या पलिकडलं, किंवा आपण राहतो त्या समाजाच्या समजूतीच्या पलिकडलं असं समजून हे सर्व म्हटलं जातं.आणि ह्या समजुतीमुळे आपण आपल्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करायला जातो.जे आहे ते तसंच असणार,त्यामुळे माझा, ह्या मधला असलेला भाग, किंवा माझ्या हातून जे झालं ते अगोदरच ठरलेलं असल्याने मी त्यासाठी जबाबदार होत नाही,असं ’म्हणणं’ म्हणजे त्याचा अर्थ असा की जीवनात ज्या काही उलथापालथी होतात,किवा ज्या अडचणी येतात त्या नैसर्गिक असो अथवा माणसामुळे असो,आपल्या श्रद्धेच्या आधाराने त्याच्यावर मात करून सूख मिळवता आलं पाहिजे. असं म्हणण्या सारखं आहे”

मी विचारलं,
“मग भाऊसाहेब तुमचं काय म्हणणं आहे ते तर मला कळू द्दया.”

भाऊसाहेब म्हणाले,
“माझं म्हणणं असं आहे,की माणूस आपली करणी आणि भरणी ह्या दोनही गोष्टी ईश्वराच्या अंगावर टाकतो.आपल्या जीवनात होणाऱ्या उलथापालथी किंवा येणाऱ्या अडचणींच्या समोर जातो सामोरे जात नाही.खरं म्हणजे, ह्या दुखण्याला आपणच कारणीभूत असतो.आणि होतं ते बऱ्यासाठी होतं अशी समजूत करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो.हे दुखणं मलाच कां? ते कधी बंद होणार?मी ते दूर कसं करूं? असे प्रश्न विचारून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो.मग म्हणतो, ते टाळण्यासारखं नाही. आणि ते टाळायला आपल्या हातात काही नाही.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,असा विचार करण्यात काय चुकलं?”

त्यावर जरा श्वास घेत घेत भाऊसाहेब म्हणाले,
“सत्य परिस्थिती न्याहळल्यास,दिसून येईल की, वाईट होत असलं तरीसुद्धा सर्व काही आलबेल आहे अशी समजूत करून घेण्याचा हा एक अट्टाहास आहे.असल्या समजुतीतून मोकळीक करून घेणं, म्हणजेच खरी परिस्थिती स्विकारणं.आणि म्हणून मी म्हणतो, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागून मगच आनंदात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.जे काय घडत असेल त्याला आपणच जबाबदार असल्याचे समजून राहिल्यास आपोआपच मनाला सुख मिळणार.”

मी म्हणालो,
"भाऊसाहेब,असा विचार करून कितीसे लोक जीवन जगत असतात?”

निरोप घेता घेता भाऊसाहेब मला म्हणाले,
“तुम्ही चांगला प्रश्न विचारलात.त्याला माझं एकच उत्तर आहे.जोपर्यंत आपलं काम आपल्याला समाधान देतं,आणि जोपर्यंत आपण आपल्या कामाशी एकरूप असतो,तोपर्यंत आपल्याला सुख मिळत राहतं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: