Thursday, February 7, 2008

मासे पण शिकवतात

मासे पण शिकवतात


"आयुष्यात येणाऱ्या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवऱ्यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणाऱ्या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीज रिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं
"काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?"
तो म्हणाला
"होय. मी पण तुम्हाला त्यावेळीच ओळखलं, ज्यावेळी तुम्ही आमच्या डायरेक्टरशी गप्पा मारत होता.पण तुम्हाला विचारायचं धारीष्ट केलं नाही.बरं झालं तुम्हीच मला विचारलंत ते"
आणि ह्या नंतर आमचा सहवास वाढत गेला.आणि आम्ही एकमेकाला वरचेवर भेटत होतो.

दत्तु आणि मी वेंगुर्ल्याला एकाच शाळेत शिकत होतो. तसा दत्तु मला खूपच ज्युनीअर होता.पुढच्या शिक्षणासाठी जसा मी मुंबईला आलो तसा दत्तु आणि त्याचे आईवडील त्याच्याही शिक्षणासाठी मुंबईत शिफ्ट झाले.
एकदा दत्तु माझ्या घरी जेवायला आला असता आपली माहिती सांगू लागला.
"माझ्या वडीलानी मुंबईला गिरगांवला खोताच्या वाडीत एक घरगुती खानावळ काढली होती.आणि त्यावेळी मी प्रभुसेमीनरी मधे शिकत होतो.त्यानंतर मी एलफिनस्टन कॉलेजनधे पुढचं शिक्षण घेवून एम.एससी झालो.आणि आता फिशरीज मधे पीएचडी केलं."
चहाचा कप वर उचलून बशीत चहा ओतत दत्तू सांगत होता.
"आपल्या माणसाच्या घरी बशीतून चहा भुरकायला बरं वाटतं.तुमच्याकडे कसला शिष्टाचार? "
असं म्हणत हंसत हंसत पुढे सांगू लागला.
"मी आणि माझे वडील दर रविवारी ’भाऊच्या धक्क्यावर’ समुद्रातून मासे पकडण्याचा छंद म्हणून जात असायचो. माझ्या गळाला पहिला मासा लागला त्यावेळी किती आनंद मला झाला म्हणून सांगू?" मी त्याला विचारलं "तुला फिशरीज रिसर्चचं बाळकडू ह्यामुळेच मिळालं का?" "ऐका तर खरं " असं म्हणत दत्तू पुढे सांगू लागला." पाण्याचा सागर दिसला की माझं मन निरनिराळ्या माशांसाठी वेडं होतं.त्याचं जास्त श्रेय माझ्या वडीलांचच आहे."

दत्तू तसा कोळी ज्ञातीतला.त्यामुळे गावाला सुद्धा ते कोळीवाड्यातच राहायचे.मोठ मोठे खपाटे घेवून दत्तूचे आजोबा आणि वाडवडील मांडवीवर मासे मारी साठी जायचे.
"माझी आयुष्यातली महत्वाची वेळ माझ्या वडीलांबरोबर मासे गळाने पकडण्यात गेली.पण माझ्या वडीलांच्या स्वभावाला दुसरा कांगोरा होता.ते चटकन रागवायचे.कधी कधी एकदम रागावून मला मारायचे.रागच्याभरात त्याना फक्त त्यांचीच बाजू खरी वाटायची.माझी बाजू ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसायची.पण त्यामुळे मी खचलो नाही,जरा कोडगा झालो,हतबल झालो,आणि थोडा कडवटपणा आला,पण दुसरा रविवार आल्यावर पुर्वीच्या आठवड्याचे सर्व विसरून परत दोघेही गळ घेवून जायचो."
दत्तु पुढे सांगत होता.
" काही वर्षानंतर माशां वरची माझी आवड जागृत ठेवूनमी ग्रॅज्युएट झालो. मी नेहमीच चांगला विद्दयार्थी म्हणून राहिलो.पण नेहमीच मी असुरक्षतेचा बळी राहिलो.मला कसलाच भरंवसा राहिला नाही.जणू माझ्यातून भरंवसाउचकून काढला गेला.माझा मार्ग मी शोधत राहिलो पण चक्कर घेतच राहिल्यानं सर्व शक्तिचे निराकरण झालं."
नंतर अगदी आनंदात येवून तो पुढे म्हणाला
" एका रात्री जणू ’नवलची घडले’,मी मासा खवळत्या पाण्यात कसा पोहतो यावर संशोधन करत असता, असं दिसून आलं की माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवऱ्यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते. माझ्या एकाएकी एक लक्षात आलं की अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात.आणि ह्याचेच आकलन होण्याची जरूरी मला फार दिवसापासून होती."
अगदी अभिमानाने दत्तु पुढे म्हणाला.
" माझ्या संशोधनावर मी खूप मेहनत घेवून मग मी पीएचडीसाठी युनिव्हर्सीटीमधे माझा थीसीस सादर केला.तो डिग्री देण्याचा समारंभ होता.
त्या ढगाळ संध्याकाळी माझे आईवडील वेळात वेळ काढून आले आणि माझ्या बाजूला उभे राहून माझा हात आपल्या हातात घेवून मी डिग्री घेताना मला जणू आशिर्वाद देत होते."
आपले डोळे पुसत दत्तु पुढे म्हणाला
" मला वाटतं,माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवऱ्यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो. दुसऱ्या बद्दल कटुता न ठेवता मी जगायला शिकलो.एखाद्दयाला माफ करण्याच्या प्रकारापासून हे निराळं आहे. आयुष्यातल्या होणाऱ्या घटनांची व्याख्या मी अशा पद्धतीत करतो,आणि सामोरा जातो."
तो क्षणभर गप्प झाल्यावर,मी त्याला जवळ घेतलं,आणि म्हणालो
"पीएचडी होण्याच्या लायकीचाच आहेस."


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: