Monday, May 5, 2008

“ठेविले अनंते तैसेचि रहावे!”

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही. कदाचित,
”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा.
अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता.
अनंताला दोन तीन बहिणी होत्या. सर्वांची लग्न पण झाली होती.अनंताचे वडिल मुळ कोकणातले.जेमतेम शेतीभाती होती,संसार चालतच होता.पण त्यांना दारूचं व्यसन होतं.आणि त्या व्यसनामुळे त्यांची परिस्थिती खूपच खालावली होती.अनंता आणि त्याच्या बहिणी यातून चांगल्याच होरपळून गेल्या होत्या.
आपल्याला असं व्यसन कदापी लावून घेणार नाही असं अनंत नेहमी छातीठोकपणे सांगायचा.नव्हेतर वडिलांची ती परिस्थिती पाहून त्याला दारूची पुरी घृणा होती.
खूप वर्षानी मी आमच्या जुन्या कॉलनीला भेट देण्यासाठी अंधेरी स्टेशनच्या समोर सातबंगल्याला जाणाऱ्या बसस्टॉपवर उभा होतो.
“मला ओळखलं नाहीत,मी अनंत नाडकर्णी.”
असं म्हणणारी एक व्यक्ति माझ्या समोर उभी होती.गटारात लोळून खराब झालेले दिसतात तसे अंगात कपडे,ते पण काही ठिकाणी फाटलेले,एखाददोन दिवस न जेवलेला भिकारी कसा दिसावा असा पेहराव असलेल्या ह्या व्यक्तिला पाहून हा अनंत नाडकर्णी आहे ह्याचावर माझा विश्वासच बसे ना.
“मला एक पाव आणि चहा घेण्यासाठी पैसे द्दयाल का “
असं आवर्जून सांगणाऱ्या ह्या अनंत नाडकरण्याला पाहून मी खरोखरच संभ्रमात पडलो.इकडे तिकडे आजुबाजुला बघून थोडासा लाजतच मी त्याला हाताने खुणावून माझ्याबरोबर चल असं दाखवलं.आणि स्टशनसमोरच्या इराण्याच्या हॉटेलमधे शिरून तडक फॅमिली रूम मधे त्याला घेवून गेलो.
“अरे! अनंता काय हे तुझी दशा करून घेतलीस?झालं तरी काय तुला?तू बॅंकेत होतास ना? तुझी बायको आणि मुलगा बरी आहेत ना?तू दारूला न शिवणारा ह्या परिस्थितीत कसा आलास?”
असे एक ना दोन एकामागून एक मी त्याला प्रश्न विचारत राहिलो हे पाहून अनंत गालातल्या गालात हसत वेटरने आणून दिलेल्या पाण्याच्या ग्लासातलं पाणी रिकामं करीत म्हणाला,
“माझी कर्म दशा.आणखी काय? “
मी त्याच्यासाठी चार पावाची एक लादीच मागवली आणि तीन कप चहा त्याच्यासाठी आणि एक कप चहा माझ्यासाठी मागवून वेटरला पिटाळून लावलं. त्याच्याकडून हावऱ्या सारखं ऐकून घ्यायला मी उत्सुक्त होतो.
अनंत आता सांगू लागला,
“उच्च श्रेणीतली नोकरी करत असताना आपल्या श्रद्धा ढळू न देता सभोवतालच्या परिस्थितीत चळू न जाता आपले संस्कार लक्षात ठेवून, न राहिल्याने मला ही किंमत मोजावी लागली.पण आता इतराना दोष देवून काय उपयोग.म्हणून मी मघाशी म्हणालो, माझी कर्म दशा.”

अनंत आता अगदी गंभिर होवून सांगू लागला
“व्यसन हे माझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मैलाचा दगड झाला आहे.मी व्यसना शिवाय कधीच नसतो.प्रेमी युगुले येतात आणि जातात,युद्ध हरली जातात आणि जिंकली जातात.हरणं आणि जिंकणं सारखच होत असतं.पाऊस पडतो,बर्फ पडतं,तारे आकाशातून कोसळतात.हे होत असताना माझं व्यसन माझ्या बरोबरच असतं.मी ते वापरो न वापरो ते नेहमीच माझ्या बरोबर असतंच.
मी सर्व व्यसनी लोकांच्या घोळक्यात राहून प्रत्येकाची हकिकत ऐकत असतो.कनवाळू असणं,स्विकार करणं,प्रामाणिक असणं, अवहेलना करून घेणं,आणि शरण येणं ह्याचा वापर आपण जीवनात करीत असतो.मी स्वतः ह्या गोष्टीना सामोरा जावू शकत नाही.
व्यसनी म्हणून मी निष्टुर,तोंडफटकळ,आणि दबाव ठेवण्यात प्रवीण आहे.मी कावेबाजीत दर्दी आहे.घाबरल्याने मी खोटं बोलायला प्रवृत होतो.प्रामाणिक राहवसं मला जमत नाही.मला कुणी समजून घ्यावं असं वाटत नाही.माझ्या व्यसनाला मी खतपाणी द्दयावं असं वाटतं. बहुदा मला हे सर्व असंच असावं असं वाटतं.
सिनेमा नाटकातल्या कहाण्या पाहून व्यसनातून बाहेर पडणं खूप दुःखदायी आणि भडक असतं हे कळून येतं आणि सरतेशेवटी त्यापासून सुटका झाल्यावर ते लाभदायी होतं असं दाखवलं जातं.खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीतून सुटका होणं म्हणजे महाकष्टदायी असतं.त्याच, त्याच चुका मी परत, परत करतो.मला समजून कसं राहावं हे कळतच नाही.सत्य कसं ओळखावं हे कळतच नाही मग सत्य बोलायला कसं येणार?.कबूल व्हायला मला आवडत नाही,माझा त्याच्यावर जोरच नाही. उरलेलं आयुष्य अशा तऱ्हेने कसं राहायचं हे मला उमजतंच नाही.असं हे हताश,असं यकःश्चित, असं सदा हतबल राहून कसं जीवन जाणार हे कळत नाही.
पण एक नक्की,मला प्रयत्न सोडू नये असं वाटतं.चांगल करावसं वाटतं.मला वाटतं की मी अनेक वेळा अपयशी झालो,अनेक वेळा पडलो तरी पुन्हा माझा मला सावरून पुढे जावं असं वाटतं.माहित नाही ह्यात मी यशस्वी होईन की नाही.
माझ्या आयुष्याचे जमतील असे छोटे छोटे क्षण पाडून पहातो.मला समजलंय की एखाद्दया क्षणातून मी विनासायास सुटतो. आता मला असुरक्षित वाटलं तर ते तेव्हड्या पुरतं.दुसऱ्या क्षणाला ते बदलेलही.माझं व्यसन माझ्या कानात ह्या क्षणाला फुसफुसतंय ” बाबारे!वाटेल चांगलं तुला. कसं ते तुला माहित पण आहे.” आणि मला खरंच पुढच्या क्षणाला बरं ही वाटेल.
तेव्हा तो क्षण यायची मी वाट बघतोय.
मला वाटतं अशाच तऱ्हेने मी एक एक क्षण करून चांगल जीवन जगत राहिन.आताच मला मी चांगली निवड करू शकेन. आताच मी मला काय हवं ते करू शकेन.हेच मी खरं बोलून जाईन.ह्याच क्षणाला जे काय माझ्याकडे आहे त्याबद्दल मी उपकृत राहिन.सर्व विसरून जाण्याची मी पराकाष्टा करीन.आणखी पाच मिनीटानी काही तरी मुर्खासारखं मी करून जाईन.पण अगदी ह्या क्षणाला मी माझं जीवन बदलायचा प्रयत्न करू शकेन.
शेवटी मला वाटतं,जे काय आहे ते हे सगळं माझ्याजवळ आहे.अगदी ह्या क्षणाला.आणि मला वाटतं ते पुरं आहे.फरक व्हायला ते पुरं आहे.चांगली व्यक्ति व्हायला ते पुरं आहे.मला ह्यातून सुटकेसाठी हवं आहे तो मी ह्या क्षणी आहे …अगदी ह्या क्षणी आहे.”

हे सर्व त्याचं भाषण मी निमूट ऐकत होतो.एम.कॉम होवून बॅंकेत मॅनेजर म्हणून राहिलाला हा माणूस मी वेडा समजू की शहाणा हेच त्या क्षणी मला समजत नव्हतं.पण म्हणतात ना दारूच्या नशेत माणूस खरं तेच बोलतो तेव्हा तो काय जे बोलत होता ते त्याला मी त्याची वाफ जावू द्दयायला-स्टिम आऊट- करायला देत होतो.

अनंताची नोकरी केव्हांच गेली होती.दारुच्या व्यसनाने तो वेळेवर ब्यॉंकेत जात नसायचा. त्याची पुर्वीची सेवा पाहून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न झाला.पण नंतर नंतर अति व्हायला लागल्यावर त्याला नोकरीवर नको येवू म्हणून सांगितलं गेलं.
त्याचं व्यसन जसं वाढत गेलं तसं त्याची पत्नी त्याला सोडून मुलाला घेवून माहेरी गेली.ती येईचना.अनंताला हाऊसिंग बोर्डची जागा सोडावी लागली.तो बेघर झाला.हे केवळ दारुच्या व्यसनामुळे झालं.

माणसाच्या मेंदुमधली रक्ताच्या सरक्युलेशन मधून सततच्या अलकोहलच्या प्रादुर्भावामुळे एक जागा इतकी प्रभावित होते की नंतर त्याची त्या अलकोहलसाठी कोलाहल होते.ह्यालाच इंग्रजीत addict -व्यसनी- म्हणतात.आणि तेच अनंताचं झालं.त्याशिवाय मला वाटतं हे काही प्रमाणात आनुवंशिक पण असावं.दारुच्या व्यसनात एखाद्दयाला मुलं झाली तर त्या मुलांच्या जिनम मधे ते व्यसन उतरत असावं. असं मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं.हे व्यसन त्याला त्याच्या वडिलांकडून आलं असावं. आणि माझ्या माहितीतली पण अशीच काही उदाहरणं आहेत.ज्याठिकाणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या व्यक्ति प्राप्त परिस्थितीत एखादं लटकं कारण दाखवून असं व्यसनी व्हायला उद्दयुक्त झालेली.

अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.

कदाचित,
”ठेविले अनंते तैसेचि रहावे.”
असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: