Thursday, May 29, 2008

एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो

” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात, मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.”
तसा मी वरचेवर गोव्याला जात येत असतो.एखादा आठवडा राहायचं असल्यास मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंट मधे राहतो.त्यामुळे माझा आजुबाजूच्या लोकांशी परिचय झालेला आहे.त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ख्यालीखुषालीच्या गप्पाही होतात.असंच एकदा त्या होटेल मधल्या एका वेटरशी हलो-हाय झाल्यावर मी त्याला सहजच म्हणालो,
“तुला मी इकडे नवीनच पहात आहे.”
ते ऐकून तो म्हणाला,
“होय, मला इकडे येवून दोन तीन महिने झाले.मी पुर्वी मुंबईच्या एका होटेलमधे काम करीत होतो. माझ्या एका मित्राने मला ह्या होटेलची माहिती दिली.मी पुर्वीपण गोव्याला येत जात असे.मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
मी त्याल विचालं,
“असं का?”
तो म्हणाला,
मुंबईच्या मानाने गोवं खूपच लहान आहे.इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात.आता तुमचंच घ्या ना,तुम्ही माझ्याशी मुद्दाम वेळ काढून बोलत आहात.मुंबईच्या लोकाना कुठे वेळ आहे.एखादं हास्य फेकतील किंवा हलो-हाय करतील.त्यांचा पण दोष नाही.कारण त्यामानाने गोव्याचं लाईफ जरा स्लोच आहे.”

हे त्याचं म्हणणं ऐकून मला पण थोडं त्याच्याशी बोलावसं वाटलं आणि तो पण माझ्या सारखा बडबड्या आहे असं वाटलं.
“तू ह्या होटेलमधे काय काम करतोस?”
ह्या माझ्या दुसऱ्या प्रश्नाची तो जणू वाटच पहात होता असं वाटलं.लगेचच म्हणाला,
“मी इकडे वेटरचं काम करतो.आलेल्या गिऱ्हाईकाला प्रथम कॉफी देतो.इकडच्या होटेलचा तसा रिवाज आहे.मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हल्लीच्या जीवनात ऑन-लाईन-चॅट,ऑन- लाईन- शॉपिंग आणि बरचसं ऑन-लाईन झाल्यामुळे माणसा माणसा मधल्या दुव्यासाठी कुणालाही भूक नसते.
इकडे त्यामानाने हे सर्व कमीच असल्याने,घरी दुध घेवून माणूस केव्हा आला,पेपर टाकून पोऱ्या केव्हा गेला,नातवंडं आता काय करतात असल्या गोष्टीवर बोलायला अजून वेळ सापडतो.कधी कधी माझी पण चौकशी करतात.माझं कसं चाललंय म्हणून पण विचारतात.
असलं हे जीवन इकडे जास्त जीवंत वाटतं.”

मला म्हणाला,
“काका,तुम्हाला वेळ असेल तर एक किस्सा सांगतो”
एव्हडं बोलणारा हा वेटर काय सांगतो म्हणून ऐकण्याची माझी पण जिज्ञासा वाढली.मी आणखी एक कॉफी ओतायला सांगून म्हणालो,
“तुझं ऐकायला काढतो वेळ हवा तर”
हे ऐकून त्याला बरं वाटलं.
मला म्हणाला,
“एकदा,मी इकडच्या होटेलच्या मागे एक “फुंकणाऱ्या” लोकांसाठी एक स्पेशल खोली आहे,तिथे कॉफी घेवून गेलो होतो.एक म्हातारी आजी बराच वेळ वाट बघत असलेली दिसली.तिला मी कॉफी दिली.मला माझ्या आजीची आठवण आली
मला म्हणाली,
” मला एक पाव आणि मटण प्लेट मिळेल काय?”
तिचा तो पेहराव आणि चेहऱ्यावरून ती एक दोन दिवस उपाशी असल्या सारखी दिसली.मी तिला एक पाव आणि आमलेट आणून दिलं.मी खोटं खोटंच तिला सांगितलं की एका गिऱ्हाईकाने त्याची ऑरडर कॅनसेल केली ते मी तुला आणून दिलं. खावून झाल्यावर ढेकर देत ती मला म्हणाली,
” मला पाचएक रुपये मिळतील काय?”
मी माझ्या टिप मधली मिळकत तिला दिली.
मला म्हणाली,
“मी परत आल्यावर तुझे पैसे परत करीन.”
असं म्हणत ती आनंदी चेहरा करून मेन दरवाजातून निघून गेली.
ती तिन आठवड्यानंतर ती सकाळीच आली आणि माझे पैसे देवून गेली.तिला कुठेतरी काम मिळाल्याने तिच्या कमाईतून तिने मला पैसे दिले.मला तिने सकाळचा ब्रेकफास्ट पण देऊ केला.

मी त्या वेटरला म्हणालो,
” ह्यातून तू काय शिकलास?”
मला तो वेटर सांगू लागला,
” एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा अशा घटनेला अर्थ आणून देते.एक मैत्रिचा हात मनाला शांती आणून देतो.एका माणसापासून सुरवात होते आणि प्रसाद वाटावा तसं त्याचं होतं.
मी गिऱ्हाईकाला कॉफी देताना त्याच्या नजरेशी नजर मिळवतो,”कसं काय?” म्हणून विचारतो.आणि मग तो काय म्हणतो ते ऐकतो.माझा जॉब गिऱ्हाईकाची सेवा करण्याचा आहे पण मला वाटतं ह्यातून एकमेकाचा दुवाही साधला जातो आणि एकमेकाच्या मदतीला हात पुढेही करता येतो.”
हे सर्व ऐकून मी मनात म्हणालो,
” एखादा वेटर सुद्धा छोटासा संदेश देवून जातो.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: