Friday, May 16, 2008

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना,
मला म्हणाला,
" मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. सभोवतालच्या वातावरणा बद्दल जागृततेची क्षमता असण्यावर माझा विश्वास आहे.अपेक्षा नसतानाही माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटना मधे आलेल्या एका घटनेवर माझा विश्वास आहे."
आणि मला पुढे सांगू लागला,
"त्यादिवशी मी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आलो.सर्दी खोकला जब्बर झाल्याने कधी एकदां अंथरूणावर पडतो असं झालं होतं.शेजारच्या घरात पार्टी चालली होती त्यांच्या आवाजानें माझी झोप जागृतच होती.
माझ्या तुटपुंज्या स्वप्नाचा बाहेरून येणारा आवाज भंग करू शकला.कांचा फूटल्याचा आवाज मला पुर्ण जागं करू शकला.माझ्या खिडकीतून दिसणारं रात्रीचं आकाश आगीच्या डोंबाने शेंदूरी रंगाचं दिसू लागलं.अरुंद जिन्याला आगिच्या ज्वाळानी घेरलं होतं.बाहेर जाण्याचा तिथूनच दरवाजा होता.माझे शेजारी माझ्या किचनच्या खाली उभे राहून तिकडच्या खिडकीतून उडी मारण्याची मला आवर्जून सांगत होते.

दोन तिन आठवड्यानंतर मी सर्व प्रकरणांची जंत्री घेत घेत ज्यावेळी विमानात बसून सीट बेल्ट लावून झाल्यावर त्या घटनेचा विचार करू लागलो तेव्हा मला राग आणि संतापाने घेरलं,
"मलाच हे असं कसं झालं"
असा विचार मनात आला.
"मी जवळ जवळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडलो होतो आणि माझं सर्वस्व मी गमावून बसलो होतो.मी असं काय केलं होतं की मलाच हे प्रायश्चित मिळालं?"
माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला बघून मी माझ्या ह्या विचारातून बाहेर पडून त्याच्याशी बोलायला लागलो.तो दिल्लीला चालला होता आणि तो डॉक्टर होता.मद्रासला झालेल्या सायंटीफिक कॉनफरन्सला हजर राहून दिल्लीला आणखी काही कंपनीच्या कामाला चालला होता.त्याचं आणि माझं साध्या साध्या गोष्टीवर बोलणं चाललं होतं. परदेशातही तो बरेच फिरून आला होता.गेल्या वर्षी मेडिकल कनव्हेनशनसाठी तो पॅरिसला गेला होता.नंतर मी त्याला आणखी प्रश्न विचारले. त्याच्या फॅमिली बद्दल आणि तो कुठल्या प्रांतात राहतो त्याबद्दल.त्याचे डोळे थोडे पाणवळल्या सारखे दिसले.
तो महाराष्टात मुंबईत राहत होता.असाच एकदा तो युरोपला गेला असताना,मुंबईत झालेल्या दंगलीत त्याची अख्खीच्या अख्खी फॅमिली मारली गेली होती.असं सांगता सांगता त्याने माझा हात हातात घेवून घट्ट धरला.माझे पण ते बघून डोळे पाणावळले.मी माझे डोळे पुसले.
मी ज्यावेळी त्याची बोटं माझ्या हातात कुरवाळली,तेव्हा माझ्या मनात क्षणभर आगीत झालेल्या माझ्या नुकसानीचं स्मरण माझ्या दैवाच्या अगणीत उपकाराच्या भावनेत रुपांतरीत झालं.मी त्या आगीतून जीवंत होतो.जळलो पण नव्हतो.माझे नातेवाईक मला सभोवताली घेरून होते,माझे प्रिय मित्र मला आधार देत होते.मला हवं असलेलं सर्व काही माझ्या जवळ होतं.

माझ्या ह्या प्रवास-मित्राचं नंतर काय झालं ते मला माहित नाही.आम्ही एकमेकाचे पत्ते किंवा फोन नंबर्स घेतले नाहीत.आम्ही एकमेकाला गुडबाय म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की मला त्याचं फक्त पहिलं नांवच माहित होतं.पण त्याची ती कथा मी माझ्याबरोबर घेतली होती.त्याची ज्या ज्यावेळी मला आठवण यायची त्यावेळेला मी त्याचे मनात आभार मानत होतो कि तोच मला जीवनात मोठा फरक काय असतो ते स्मरण करून देत होता.

मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.
मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: