Monday, November 24, 2008

गुरू शिवाय विद्दा कसली?

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं.
यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती.
मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते. त्यांच्या घरी मी बरेच वेळा जातयेत असे.यशोधराचं आणि माझें दूरचं नातं होतं.रोहिणी त्यावेळी अगदीच लहान होती.मला इतक्या वर्षानी पाहून तिला तिची लहानपणाची आठवण आली.

तिचे वडील आता हयात नाहीत.ती ज्यावळी माझ्या बरोबर बोलायाला म्हणून रंगमंचावरून खाली आली.तेव्हा सहाजीकच तिच्या वडीलांचा विषय निघाला.जुन्या आठवणीना उजाळा आला.मला ती म्हणाली,
“काका तुम्ही माझ्या घरी नक्कीच या.मी इस्ट अंधेरीला गोल्डस्पॉटच्या फॅक्टरीच्या बाजूला उंच इमारत आहे त्या बिल्डिंगच्या एकदम वरच्या मजल्यावर राहते.जेवायलाच या.माझी आई पण तुम्हाला भेटेल.खूप वर्षानी तुम्हाला पाहून तिला खूपच आनंद होईल.”
मी तिचा पत्ता घेतला आणि विकएंडला तिच्या घरी गेलो.
यशोधरेला बघून मला आणि तिला खूपच आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा होई पर्यंत रोहिणीने चार पाच फोन करून घेतले.
रोहीणी मला म्हणाली,
” ह्या व्यवसायात पडल्यावर आपलं जग आपलं राहत नाही.सदाची मी बिझी असते.तुम्ही आज येणार म्हणून मी शक्यतो मला मोकळी ठेवली आहे.माझा सेक्रेटरी आता काय ते संभाळून घेईल.”
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायाची मला विषेश माहिती नाही.पण नृत्याबद्दल माहिती असावी असं मला नेहमी वाटायचं आणि त्याचं मला कुतुहल पण आहे.आणि तुझ्या इतक्या जवळच्या व्यक्तिशिवाय मला वर्णन करून कोण सांगणार?तेव्हा तू मला सगळं समजावून सांग.त्यातल्या खाचा आणि खळगे सुद्धा.

रोहिणी मला म्हणाली,
“माझ्या बाबांचेच उद्गार मी प्रथम तुम्हाला सांगते.
ते नेहमी म्हणायचे,
” आपण सर्व ह्या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहो आणि त्या काळात आपण काहीतरी चांगलं करावं.ते पुढे म्हणायचे मला वाटतं ह्या वास्तविकेत पावित्र्य आहे ते असं की “चांगले व्हा” हेच सांगणं.हे उद्गार माझ्या वडीलानी निर्वतण्यापूर्वी काढले”
माझ्या जीवनात आणि माझ्या कलाकृतीत मला असं दिसून आलं आहे की सत्यनीष्टा आणि चांगुलपणा बरोबरीने असतात. माझी आई म्हणते,
“स्वतःशी प्रथम प्रामाणिक असावं”
माझ्या रियाज करण्याच्या स्टूडियोमधे वास्तविक राहण्याचा मी प्रयास करते.
माझा स्टुडियो ही मला एक पवित्र जागा आहे जिथे स्वतःचं व्यक्तित्व आणि स्वतःच्या भावना प्रदर्शीत करता येतात.जणू माऊंट एव्हरेस्टवर उभं राहून श्वास घेतल्या सारखं वाटतं. ह्या स्टुडियोतल्या उंचीवर एकजीव राहून काहीतरी उद्देश्यपूर्वक करीत असल्यासारखं वाटतं.
मी नर्तकी म्हणून आहे आणि नृत्य-परिक्ष्क म्हणून पण अनुभव घेतला आहे.दोनही पार्ट मला माहित झाले आहेत.नर्तकी नृत्य-प्ररिक्षकाला समर्पीत होते आणि नृत्य-परिक्षक नर्तकीला समर्पीत होतो.आम्ही निष्कारण तयार झालेले भावनांचे कटू थर उतरून ठवतो.
छुपीवृत्ति नाहिशी होते,आणि सत्यनिष्टा आणि नीश्छलता असलेलं आमचं बालवय उभारून येतं.अशा तर्‍हेने एकमेकात आत्मसमर्पीत झाल्यावर काहीही होऊं शकतं.

नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.
एकदा माझी एक नृत्य करणारी विद्दार्थिनी दिसायाला सुंदर आणि शरिरसौष्टव मोहक असलेली असतानाही तिला हावभाव प्रकट करता येत नव्हते.एकदा आम्ही नृत्याची रियाज करीत असताना तिचं पाच मिनीटांच सोलो नृत्य होतं.एकदा करून तिला श्वास लागला.मी तिला परत करायला सांगितलं.ती करण्यात मग्न झाली.ती तिच्याशी प्रामाणिक होती.सरते शेवटी तिने अत्युत्तम नृत्य केलं.

नर्तक म्हणून आम्हाला आमचा सर्व अनुभव रंगमंचावर आणावा लागतो.आम्हाला किती फिरक्या घेता येतात किंवा किती उंच उड्डाण करता येतं,किती उंचीवर पायाची हालचाल करता येतं हे दाखवून प्रेक्षकाला रोमांचीत करायचं नसतं.सतत केलेल्या संवयीने बर्‍याच लोकाना ते करता येईल.आम्हाला आमच्या सत्यनिष्टेशी एकरूप व्हावं लागतं.त्याचा एक हिस्सा व्हावं लागतं. जेव्हा अभिनय वाखाणला जातो तेव्हा नुसते हातवारे मनात ठेवावे लागत नाहीत. तर अभिनयातून एक प्रकारची संवेदना येते,आणि ती संवेदना नृत्यकाराच्या प्रकटनातून येते.
रंगमंचावरच्या उत्तम अभिनयाने श्रोतेगणाना अशा पातळीवर न्यावं लागतं की ते त्यातून स्वतः बद्दल काही तरी शिकतील.हे आपल्या सर्वांसाठी आहे असं त्याना वाटावं.हे सर्व निपूणता प्राप्त करण्यासाठी आहे असं त्याना वाटावं.आणि सर्वांत जास्त ते सत्यनिष्टेशी संबंधीत आहे हे तर नक्कीच वाटावं.
माझी खात्री आहे की स्वतःहून चांगलं असणं म्हणजेच जसं माझे बाबा म्हणायचे, तसं आपण आपल्याशी सत्यनिष्ट असणं. “

नृत्य करणं दिसायला सहज सुलभ वाटतं.पण रोहिणीने जे समजावून सांगितलं ते ऐकून माझ्या मनात आलं की गाण्याबरोबर हातवारे करणं इकडून तिकडे उड्या मारणं हे करत असताना आणखी ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याची माझ्या सारख्या सर्व साधारण माणसाला कल्पना पण करता आली नसती.गुरू शिवाय कसली विद्दा हेच खरं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: