Friday, November 28, 2008

शेवटी कविताच जन्माला आली

संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.
हे चित्र मनात आलं जेव्हा,
(हंसर्‍या)मुमुक्षुने एक ओळ दिली.
“खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव”
आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं.
पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार.शेवटी कविताच जन्माला आली.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड

घन घन घटा जमूनी कोसळतील धारा
सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा
नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे
पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे

आवर ग! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्यांची हळह्ळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: