Wednesday, November 26, 2008

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं,घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता जाता त्याला उरलेलं जेवण देऊन त्याच्या हातावर चवली ठेवायचं माझ्या आजीचं आणि चुलत आजीचं रोजचं काम असायचं.
माझी आई दरखेपेला अशीच आमच्याबरोबर येताना न चूकता आमचे जूने कपडे काळू महाराच्या मुला मुलीना वापरायला द्दायची.त्यांची ही गरिबी बघून मला त्यावेळी खूपच त्यांची दया यायची.काळूचा बाप आणि आजा मरेपर्यंत असलीच काम येऊन करायचे.हे त्यांचं पिढीजात काम असायचं.असं माझे आजोबा सांगायचे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर ही सर्व आजोळची वहिवाट पाहून मी त्यात स्वारस्य घेऊन पहायचो. मुंबईला असले व्यवहार होत नसल्याने हे बघायला जरा कौतूक वाटायचं.आणि दुःखही व्ह्यायचं.काळू महाराचा मुलगा-दगडू- मात्र असली कामं करीत नसे.तो शाळेत जाऊन शिकत असल्याने त्याचा अभ्यास करण्यात वेळ जायचा.
शिक्षणामुळे त्याच्या इच्छाशक्तिचा आणि शैलीचा उपयोग उपयुक्त प्रारंभीक सामाजीक क्रियांच्या व्याख्या करण्यात आणि वापर करण्यात झाला. धर्माचा खरा उपयोग अश्या काही लोकाना होतो की ज्याना त्यांच्या मनुष्य म्हणून जन्माला येण्याच्या योग्यतेच्या पलिकडे त्या धर्माची गरज, सहारा घेण्यात आणि दिलासा घेण्यात होते.एकप्रकारची मंत्रमुग्ध सुंदरता दुःखाने भरून वहाणार्‍या खोल नदीतून उफाळून येऊन,ती सुंदरता जणू मानवी जीवनाच्या छपलेल्या झर्‍यांना छूत आणि अछूत यातल्या धार्मिक अभिव्यक्तीला स्पर्श करते.शिक्षीत दगडूला हे आता भासू लागलं होतं.माझी खात्री आहे की,मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
दगडू महाराचा विचार केल्यावर त्याच्या जीवनाच्या तर्कशास्त्रात माणसा माणसातल्या असमानतेचा असंधिक्त विचार मी करू लागलो.
मला असं वाटतं,ज्यावेळेला माझी आई ह्या समाजातल्या लोकाना बोलावून आमचे सर्वांचे,तसेच आमच्या शेजार्‍यापाजार्‍यांचे वापरलेले कपडे मुद्दाम जमा करून आणून त्यांना द्दायची त्यावेळी त्या महारवाड्यातून त्यांच्या आया बहिणी कच्ची बच्ची सर्व आशाळभूत होऊन यायची. ते देण्यात कुणाला काय तर कुणाला काय दिलं जायचं.पण मग मला आवर्जून वाटायचं,की जरी कपडे देण्याच्या क्रियेत असामनाता राहिली तरी मुळातच त्या अच्छूत गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात असमानता असण्यात कसली प्रामाणिकता आली असावी.

हे सांगण्याचं कारण एका वर्षी माझ्या आईने हे दरवर्षीचं कपडे देण्याचं काम एकदा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर सोपवलं.ह्या मिळालेल्या संधीतून मला वरील विचार सुचला.ह्या संधीने मला अचंबा होण्यासारखा,आणि नवीन जागृती होण्यासारखा एक मार्ग दिसू लागला.त्यामुळे सामाजीक धारणे बाबत एका महत्वाच्या बाबीवर माझा मजबूत दृढविश्वास बसाला. आणि तो असा की कुणाही व्यक्तीची ईमानदारीने पारख करायची झाल्यास त्याच्या नेत्रातून जगाकडे दृष्टी टाकली पाहिजे.मग ती त्यांची गरीब आजी असो किंवा तरूण बहिण असो,किंवा म्हातारा आजा असो.त्यानंतर ज्या ज्या वेळी मी माझ्या आजोळी येत असे त्या त्या वेळी मी हे कपडे तर घेऊन यायचोच,त्या शिवाय लहान मुलाना खेळणी, शाळेत जाणार्‍याना गंमतीच्या गोष्टी असलेली पुस्तकं आणि वृद्धासाठी त्या वयात लागणारी नेहमीची औषधं आणून द्दायचो.अशा तर्‍हेने मी माझ्या अंतरदृष्टीचं आयोजन करायचो.

आतापावेतो दगडू चांगलाच शिकून मोठा झाला होता.मी त्याला विचारलं,
“तुझे वाडवडील ज्या तर्‍हेने राहायचे आणि आता तू शिक्षण घेऊन तुझी जी प्रगती केलीस त्यानंतर तू तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?”
त्यावर तो मला म्हणाला,
“जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्‍या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला “निसर्ग” समजतात तर काही “देव” समजतात.”

दगडू महाराचं हे छोटसं भाष्य ऐकून मला इतका आनंद झाला की निदान ह्याच्या पिढीला नव्हेतर ह्याच्या नंतरच्या कुठच्याच महाराच्या पिढीला आमची ती कामं करावी लागणार नाहीत आणि मला जुने कपडेपण कुणाला द्दायला नकोत.त्याला दोन कारणं झाली.एक म्हणजे माझ्या मामानी गाईम्हशीना डेअरीत देऊन टाकून तो गाईम्हशीचा गोठा बंद करून टाकला आणि आता त्याना सेंट्रल डेअरीतून मुबलक दुध मिळायला लागल.आणि दुसरं कारण म्हणजे दगडू पासूनची आणि नंतरची पिढी हळू हळू सुशिक्षीत होऊन त्याना साजेशी कामं करायला लागली. तो त्याच्या पूर्वीच्या पिढीचा आशाळभूतपणा डोळ्यासमोर आल्यावर मला खूप दुःख होतं.पण ही नवीन सुधारणा पाहून मात्र अत्यानंद होतो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: