Tuesday, November 11, 2008

“हलो” ह्या शब्दातली क्षमता.

आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले.
नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं.
नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं,
“हा माझा मित्र सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केली असून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं.”हलो” ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाहीतरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणारच मग तुम्हाला घेऊनच बोलूया.”
मला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
मी म्हणालो,
“सुरेश ऐकू या तर खरं तुझा काय अनुभव सांगतोस ते”
सुरेश सांगू लागला,
” मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वासाच्या मार्गात येतात.

मी जिथे काम करतो तिथे शेकडो लोक काम करतात.मी नक्की सांगू शकणार नाही की मी त्या सर्वांना ओळखतो म्हणून. पण बर्‍याच लोकाना ओळखतो हे नक्कीच. मला वाटतं बहुतेक सर्व मला ओळखत असावेत.आणि त्यामुळेच मी म्हणेन की हेच कारण आहे की मला जिथे वाटेल तिथे मी जाऊ शकतो कारण तसंच विश्व मी माझ्या भोवती केलं आहे. आणि ते एकदम साध्या सिधान्तावर आधारीत आहे.आणि तो सिधान्त असा की प्रत्येक स्वतंत्र व्यक्ति ओळख करून घेण्यास पात्र असते.
मी जेव्हा दहा वर्षाचा होतो आणि माझ्या आईच्या हातात हात घालून एकदा रसत्यावरून जात होतो. माझी आई करमरकरांशी बोलायला थांबली.माझं लक्ष दुसरीकडेच होतं.समोरच्या “स्टॉप” साईनच्या “ओ” कडे बघण्यात मी गर्क होतो.मी त्या गृहस्थाना पूर्वी पाहिलं होतं.म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
“बरंय”असं त्यांना आईने सांगून झाल्यावर आम्ही पुढे निघाल्यावर मला आई जे म्हणाली ते अजून पर्यंत माझ्या डोक्यात बसलेलं आहे.
ती म्हणाली,
” आता जे केलंस ते शेवटचं समजून जा.कुणाशी ही मी थांबून बोलत असताना तू निदान तुझं तोंड उघडून थोडं तरी बोलायला हवं.कारण एखादं कुत्र्याचं पिल्लू ही तुला रसत्यात पाहून आपली शेपटी हलवतं.”
हे तिचं उदाहरण दिसायला अगदी साधं वाटतं.पण माझ्या दृष्टीने ते एक दिशा दाखवणारी पाटी आहे, आणि माझ्या “स्व” त्वाचा पाया आहे.
स्वतःला आरशात न्याहाळून आपण कोण आहे हे पहावं आणि आपलं आचरण काय आहे हे ही लक्षात आणावं.माझ्या लक्षात आलं की माझं आचरण दहा वयावरच मजबूत झालं होतं. मला दिसून आलं की जेव्हा मी कुणाशीही बोलत असतो तेव्हा ते पण माझ्याशी बोलतात.आणि त्यामुळे मला ही बरं वाटतं.
ही काही माझी नुसती समजूत नाही,तर ते एक माझ्या आयुष्यातलं वळण झालं आहे.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिला वाटत असतं की त्याचं तिथे असणं हे दुसर्‍याच्या लक्षात आलं पाहिजे.भले ती व्यक्ती कितीही नम्र वृत्तिची का असेना किंवा ती किती महत्वाची का असेना प्रत्येकाला तसं वाटत असतं.

कामावर असताना मी माझ्या बॉसच्या बॉसशी पण हलो करतो आणि कसं काय चालंय म्हणून विचारतो. आणि कॅन्टीन मधल्या लोकांशी पण बोलतो आणि चपर्‍याशी पण बोलतो त्यांची मुलंबाळं कशी आहेत म्हणून पण विचारतो.माझ्या कंपनीच्या डायरेक्टरशी असंच हलो-हाय करण्याच्या संवयीमुळे एकदा त्यांच्या बरोबर मिटिंग घेण्याचं धारिष्ट पण मला झालं.आम्ही दोघं खूप बोललो.एकदा तर मी त्यांना विचारलं, त्यांना काय वाटतं की ह्या कंपनीत मी किती वर्ष अजून राहू शकतो?त्यानी मला चक्क सांगितलं की तुला जितकी वर्ष राहयचं आहे तितकी वर्ष तू राहू शकतोस नव्हे तर माझी जागा मिळे पर्यंत राहू शकतोस.
आता मी ह्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे.पण माझी लोकांशी बोलण्याची संवय काही मी अव्हेरली नाही.मी अजून माझ्या आईचे ते शब्द आठवतो.
मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वाच्या मार्गात येतात.
तुम्हाला कसं वाटतं?”
असा शेवटी प्रश्न मला त्याने केला.
मी म्हणालो,
“खरंच साधं हलो म्हणून ओळख केल्यावर त्याचे दूरवर किती फायदे असतात हे तूं तुझ्या अनुभवातून छानच पटवून दिलं आहेस.इतका खोलवर विचार मी तरी केला नव्हता.”हलो” ह्या शब्दातली क्षमता मला समजली”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: