Friday, January 9, 2009

इच्छेच्या पाऊलवाटा

माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर, विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला.
मी तिला विचारलं,
“सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?”
सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात लेक्चरर म्हणून पण होती.नंतर तिने शेतीत लक्ष घालायला सुरवात केली.आणि त्याचं कारण तिचा नवरा होता.कारण तो ऍग्रिकल्चरची डिग्री घेऊन ह्या खेड्यात शेती करायच्या इराद्दाने रहात होता.
माझ्या वरील प्रश्नाला तिने चक्क तत्वज्ञान देण्याच्या उद्देशानेच उत्तर दिलं.

“मला वाटतं आपल्या इच्छा-आकांक्षेचा मार्ग आपण नीट काळजीपूर्वक निवडला पाहिजे.चुकीची निवड झाल्यास परिणाम घातक होतात.
वास्तुशास्त्राच्या भाषेत मार्ग म्हणजे पायवाट,गवतातून चालून झालेली चिखलवाट असं समजल जात.एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पटकन जायच झाल्यास केलेल्या मार्गालापण पायवाट किंवा पाऊलवाट म्हणतात.ह्या निरनीराळ्या पाऊलवाटाच आहेत.
मी खेड्यात शेती करून राहते.आणि माझ्या परिसरात डझनावर पाऊलवाटा आहेत.परसातल्या मांगराकडे जाण्याची पाऊलवाट,गाईच्या गोठ्याकडे जाण्याची पाऊलवाट, विहीरीकडे जाण्याची पाऊलवाट.
ह्या पाऊलवाटा आपल्या इच्छेमुळेच तयार होतात. कारण आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याची इच्छा होत असते.मी सरसकट ह्या पाऊलवाटाना “इच्छेची पाऊल वाट ” असं समजते.
ह्या इच्छेच्या पाऊलवाटांचं चांगलच रक्षण व्हावं असं मला नेहमी वाटत असत.पण मला वाटतं त्यांच्या पासून काळजी पण घ्यायला हवी.
एका बाजूनी विचार केल्यास मी कडक नियमाच्या पालनाची सक्ति नापसंत करते.पण मी तसं करावं लागल तर मोठ्या कल्पकतेने ती आचारणात आणते. पण दुसर्‍या कुणाचे नियम तोडण्यापूर्वी दोनदा विचार करते. मी माझ्या मुलांच्या आणि पतीच्या इच्छेचा जसा सन्मान करते तसा माझ्या शेतातल्या पशुप्राण्यांचा पण सन्मान करते.त्यांच्या पाऊलवाटा ह्या त्यांच्या इच्छेनुसार झालेल्या असल्याने त्याचा ही सन्मान करते.पण माझा हा सन्मान दुधारी आहे कारण ह्या इच्छेच्या पाऊलवाटा आपल्याला संकटात आणू शकतात.
अलिकडेच अशीच एक पाऊलवाट आमच्या शेतीच्या बैलाला घातक ठरली.
त्याचं अस झाल,की तो बैल चरत चरत आमच्या घरा मागच्या परड्यात लुसलुशीत गवत खाण्याच्या इराद्दाने परड्याला घातलेल्या आखांड्याला ओलांडून येण्याच्या प्रयत्नात जवळच्या एका गायरीत-खड्यात पडला.ती त्याने केलेली त्याची इच्छेची पाऊलवाट असावी.जरी मी त्याला रोज खुराक देत असली आणि ते पुरेसं असल तरी त्याला ते गवत खायची इच्छा झाली असावी.
त्याच्या मागच्या पायाचं हाड मोडलं.त्याला उचलून घेऊन जाताना इतर गाई-बैलानी ते पाहिलं असावं.नंतर तो बैल उपचार करूनही शेवटी मेला.पण त्या इतर प्राण्यानी काय शिकल का? नाही. ते पण त्यांच्या इच्छेची पाऊलवाट करून असेच येण्याच्या प्रयत्नात असतात.अर्थात मी ती गायरी बुजून टाकली म्हणा.
अलीकडे मी त्या पाऊलवाटेच्या समोर भलाभक्कम आखांडा घालून त्या पाऊलवाटेला बंद करून टाकलं.हे माझ्या मनाविरुद्ध मी केलं.माझ्या स्वभावाला असं करणं परवडत नाही.पण कधी कधी मला अशा तर्‍हेच्या घटनेतून शिकूनमाझ्या विचाराना मोड घालावा लागतो.शेतकरी,आई आणि पत्नी म्हणून मला नियम घालून वागावं लागत.
उदाहरणार्थ, मी आणि माझे पती बर्‍याच गोष्टीवर सहमत नसतो.राजकारण,श्रद्धा आणि कधी कधी आम्हाला एकच संगीत ऐकायला आवडत नाही. त्यामुळे आमच्या इच्छेच्या पाऊलवाटा जर का आमच्या नात्यात आडकाठी आणू लागल्या तर आम्ही असेच मजबूत आखांडे-अटकाव घालून एकमेक आज्ञाधारी ढंगाने आपआपली बाजू संभाळतो.आणि बरेच वेळा ते कामी येतं.
बरेच वळा सीमेची जरूरी असते. ती लागू करायला जास्त प्रयास करावे लागतात.म्हणून मला वाटतं आपआपल्या इच्छेच्या पाऊलवाटा काळजीपूर्वक निवडायला हव्यात.त्या चुकल्या तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.माझ्या त्या मेलेल्या बैलाने आणि मी, मोठ्या मुष्कीलीने हे शिकलं आहे.”
सुमतीचं हे बोलणं संपल्यावर मी तिला म्हणालो,
“सुमती तू मला असं एक तत्वज्ञान सांगितलंस की ह्या इच्छेच्या पाऊलवाटा माझ्या कायमच्या लक्षात राहाणार.आणि एकलक्षात आलं की तू जरी आता शेतकरी झालीस तरी पूर्वीची लेक्चररशीप अद्दाप राखून आहेस.”
त्यावर मला हंसत हंसत म्हणाली,
“लेक्चर देण्यासारखा मला जर का स्टुडंट भेटला तर मी त्याला काय करू?”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: