Thursday, January 29, 2009

चिनी म्हण–आणि रामदुलारी.

खरं सांगावं,खरं ओकू नये!
“स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ”

रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.
ह्यावेळी तो आमच्या घरीच आला होता.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माझा भाऊ त्याला म्हणाला,
“रामदुलारी आज तू कसला इष्यु घेऊन आला आहेस?”
तो माझ्या भावाकडे बघून हंसत हंसत म्हणाला,
“त्या दिवशी मी ऑफिसात संध्याकाळी घरी जायची वेळ झाल्यावरही जास्त वेळ बसलो होतो.माझा एक सहकारी अरविंद कानविंदे आणि त्याची सहकारी मैत्रीण सुलभा महात्मे आमच्या ऑफीसच्या स्टेशनरी ठेवतात त्या रुममधे बसून त्यांचे बिनदास काही प्रेमचाळे चालले होते.मी मला थोडे कोरे कागद हवे म्हणून त्या रूमकडे जाऊन दार उघडलं.मी थोडा लेट बसलो होतो ते त्याना माहित नव्हतं असावं. त्यांचा हा प्रकार माझे एक सिनीयर सहकारी मोहन मोकाशी यांना मी दुसर्‍यादिवशी सवित्सर सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांना ते सर्व माझ्या तोंडून ऐकायला लाज वाटत होती. मला ते म्हणाले,
“रामदुलारी एक चिनी म्हण आहे,”खरं सांगाव खरं ओकू नये”
माझ्या भावाला रामदुलारी म्हणाला,
“मला ह्या म्हणीचा अर्थ कळला नाही.”
हे त्याच ऐकून झाल्यावर मधेच मी त्याला इंटरप्ट करीत म्हणालो,
“अरे रामदुलारी,मी तुला त्या म्हणीचा अर्थ सांगतो.
त्यासाठी माझ्या मानसशास्त्रज्ञ भावाची जरूरी नाही.
तू मोहन मोकाश्यांना,”ती दोघं प्रेमचाळे करीत होती” एव्हडं जरी सांगतलं असतस तरी त्यांना ते सत्य काय ते समजलं असतं.पण तू जेव्हा त्याना त्या प्रकाराची सवित्सर माहिती सांगायला गेलास त्यावर त्यानी तुला ती चिनी म्हण सांगितली. म्हणजे त्या म्हणीचा अर्थ असा की खरं सांगावं आणि ज्यावेळेला आवश्यक्यतेपेक्षा जास्त खरं सांगितलं जात त्यावेळी त्याला खरं ओकणं म्हटलं जात असावं.”
”बरोबर ना रे?”
असं मी माझ्या भावाला विचारलं.
त्यावर माझा भाऊ मला म्हणाला,
“अगदी बरोबर.मी हवं तर रामदुलारीला आणखी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्दाची पत्नी आपल्या मैत्रिणीला म्हणाली,
“आमचे की नाही हे, रात्रीचे खूपच घोरतात.”
हे तिचं मैत्रिणीला सांगणं म्हणजे खरं सांगणं.
पण ती जर का मैत्रीणाला म्हणाली,
“आमचे की नाही हे रात्रीचे खूपच घोरतात. घॉर,घूर,टॉंस,फूंस असा आवाज काढतात. पिंजरा चित्रपटातल्या निळू फुले काढायचा अगदी तसा गं!.”
तर असं सांगणं हे खरं ओकणं झालं.घोरणारा असाच आवाज काढणार.तो कसा आवाज काढतो हे पुढे सांगणं अनावश्यक आहे.

“ऐसा क्या?”
असं म्हणून रामदुलारीने निःश्वास टाकला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: