Tuesday, January 13, 2009

“मम मरण पाहिले मी, म्यां डोळा”

सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच.
सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा.
छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी लागते ती त्याच्या जवळ उपजत नसावी.
सूर्याची म्हातारी आई अजून होती वडिल पूर्वीच निर्वतले होते.सूर्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.सूर्याची पत्नी त्यामानाने चलाख होती.पण त्याकाळात पतीच्या सांपत्तीक परिस्थितीवर पत्नीचं वजन दिसून यायचं.तशात ती शिकलेली असून सुद्धा नोकरी करीत नव्हती.बायकानी बाहेर नोकरीला जाणं त्याकाळात जरा अप्रशस्त वाटायचं.सूर्याचंपण तेच मत होत.सूर्याला मुलं मात्र दोनचार होती.त्याकाळात मुलंही जास्त व्हायची.
मोठी मुलगी,शोभना.त्यानंतर मोठा मुलगा शरद.त्यानंतर एक मुलगी वंदना,मग तिसरी मुलगी डिंपल आणि धाकटं शेंडेफळ कुमार.
शोभनाचं लग्न समीर दिवाडकर बरोबर झालं होत.दिवाडकर,दिवाडकर आणि दिवाडकर नावाच्या अकौटंसी फर्म मधी तो पण वकीलकी करायाचा.त्याच्या फॅमिलीची ती फर्म होती.शोभना तशी बरीच सधन होती.आईबाबाना ती जरूरीच्यावेळी आर्थिक मदत करायची.स्वभावानेपण वडिलांसारखी साधी होती.मोठा मुलगा शरद जास्त शिकला नाही.पण गप्पीष्ट होता.कट्ट्या कट्ट्यावर गप्पा किंवा चकाट्या मारताना दिसायचा.कट्टयावरचे त्याचे मित्र त्याला ज्युनीअर जेठमलानी म्हणायचे.तो नेहमी वडलांच्या वकिलीबद्दल फुशारकी मारायचा.पण तो जेठमलानी सारखा “चापलूस” नव्हता.त्यालापण मराठी नाटकांची खूप आवड होती.अधून मधून जरूरी पडली तर नाटकात रोलपण करायचा.बहुतेकवेळां नाटकाच्या पडद्या आडची कामं करून चार पैसे मिळवायचा.शरदने लग्न केलं नाही.नशीबवान बिचारी ती होणारी पत्नी म्हटलं पाहिजे.दुसरी मुलगी वंदना ही तर आईसारखी चलाख होती. तिने तिच्या ऑफिसातल्या एका पंजाबी एक्झिक्युटीव्हला गाठून प्रेमविवाह केला आणि ती दिल्लीलाच राहायची. तिसरी मुलगी डिंपल ही मात्र छानछोकी रहाण्यात मश्गुल असायची.ती टीव्ही चॅनेलवर सा-रे-गा-मा-पा (सारेगमप) किंवा हर-दील-जो-लव-करेगा किंवा इंडियन-आयडोल असल्या कार्यक्रमात भाग घ्यायची.एखाद्दा आयटेम डान्समधेपण बॉलिवूड टाईप नाचणार्‍या मुलीत भाग घ्यायची.तिने राजेश सावंत नावाच्या नाचातल्या सहकार्‍याशी लग्न केलं.तिच्या मैत्रीणी तिला नेहमीच म्हणायच्या,
“अग, डिंपल तुझा नवरा अगदी राजेश खन्ना सारखाच दिसतो आणि नाव पण राजेश की ग!”
डिंपलला आपलं नाव डिंपल आणि नवर्‍याचं नाव राजेश हे पाहून कौतुक वाटायचं. तिला एकच मुलगी होती तिचं नाव तिने राखी ठेवलं होतं.पुढेमागे आपल्यासारखीच टेव्ही चॅनेलवर ती कार्यक्रम करू लागली तर तोपर्यंत निदान सा-रे-गा-मा-पा-धा-नी-सा नावाचा कार्यक्रम होईल आणि राखी सावंत म्हणून आपली मुलगी नावाजली जाईल हा मुलीचं राखी नाव ठेवण्याचा तिचा उद्देश असावा.
शेवटचा शेंडेफळ कुमार हा मात्र फार हुशार होता.आय- आय-टीत शिकून अमेरिकेत बॉस्टनला एका सॉफ्ट्वेअर कंपनीत काम करीत होता.त्याचं अजून लग्न झालं नव्हतं.

काल मला फोन आला आणि सूर्या मॅसीव हार्टऍटेकने गेला असं निरोप मिळाला. मी तसाच त्याच्या घरी गेलो.सर्व मंडळी शोकाकूल पाहून मलाही दुखः आवरेना.
किर्तनकार करतात तसं वरचं सर्व प्रवचन झाल्यावर मुळ आख्यानाला लागतो.
सूर्याच्या जवळ बसलो असताना त्या शांत चेहर्‍याकडे बघून मला दहा वर्षापूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली.
त्याचं असं झालं,नाशकाला एका प्रसिद्ध कंपनीचं नाटक लागलं होत.हे नाटक आम्हाला मुंबईत चूकलं होत.म्हणून दोन दिवसासाठी मी आणि सूर्या सुखटणकराने नाशकाला जायचं ठरवलं.परतीच्या वेळेला,सूर्या मला म्हणाला,
“तू पुढे जा,मी नंतरच्या एस्टीने येतो.माझं एका अशिलाकडे काम आहे.जातान माझी ही बॅग मात्र तू ने.”
मी निघालो.घरी येऊन जरा फ्रेश होऊन सूर्याच्या घरी जायला त्याची बॅग घेऊन निघालो.त्याच्या चाळीत आल्यावर त्याच्या रूम जवळ खूपच गर्दी जमलेली दिसली.मला कळेना काय झालं ते.सूर्याची म्हातारी आई मुसमुसून रडत होती. इतक्या वर्षाच्या संसारातल्या खडतर जीवानात मुलाला लहानाचं मोठं करीत असताना दुःखाच्या प्रसंगात रडून रडून तिचे अश्रू सुकले होते. बिचार्‍या बर्‍याचश्या आईला ह्या अडचणीतून जावं लागतं. बाहेर असलेल्या त्याच्याच एका शेजार्‍याला विचारल्यावर कळलं की सूर्या मॅसिव हार्टऍटेकने गेला असा नाशिकहून फोन आला. मला शॉक बसलाच आणि अशक्य वाटलं.कारण चार तासापूर्वी मी त्याच्या बरोबर होतो.पण काय कुणासठाऊक हल्ली कुणाला काय होईल ते.काही सूर्याची मुलं जवळ होती.मोठी शोभना निरोप मिळाल्यावर ती आणि तिचा नवरा आला होता.शरद घरचाच तो तिथे होताच पण नंतर शेजार्‍या बरोबर टॅक्सी करून नाशकाला गेला.डिंपलपण आपल्या नवर्‍याला घेऊन आली होती.दिल्लीच्या मुलीला, वंदनाला कळवलं ती संध्याकाळ पर्यंत विमानाने यायला निघाली.अमेरिकतला मुलगा कुमार मात्र ताबडतोब येत नव्हता.खोलीत एका कोपर्‍यात एक वयस्कर गृहस्थ दाढीमिशी लांब असलेला डोक्यावर एक काळी टोपी आणि मान खाली घालून विचारात पडल्यासारखी चर्या करून बसलेला मला दिसला.मला वाटलं सूर्याचा कुणीतरी वयस्कर नातेवाईक असावा.बाकी मंडळी यायची असल्याने मी घरी जाऊन परत येतो असं शोभनाला सांगून घरी गेलो.रात्री नऊच्या दरम्यान मला फोन आला की,
“काका तुम्ही ताबडतोब परत या.इकडे आल्यावर तुम्हाला काय ते कळेल.”
मी सूर्याच्या घरी परत आल्यावर सर्व मंडळी हंसत होती आणि त्या सर्वा मधे सूर्या बसून हंसत होता.मला सूर्याचा राग ही आला आणि गंमतही वाटली.मला पाहून सूर्या म्हणाला,
“उद्दा संध्याकाळी आपण समुद्रावर भेटूया मी तुला सर्व किस्सा सांगतो.तुला इकडे ये-जाचे बरेच हेलपाटे झाले आहेत.तू दमला असशील,काळजी करू नकोस सर्व काही ठीक आहे.”
दुसर्‍या दिवशी समुद्रावर भेटल्यावर मला त्याने जे काय सांगितलं ते ऐकून हंसावं की रडावं हेच कळेना.
मला सूर्या म्हणाला,
“गेले कित्येक दिवस माझ्या मनात येत होतं की जर का मी मेल्याची बातमी माझ्या ह्या मंडळीना कळली तर ही कशी वागतात ते मला प्रत्यक्ष पाहायचं होतं.मग तू मला माझी ही क्रेझी आयडीया म्हण किंवा आणखी काही म्हण,हा प्रयोग करून पहायचं माझ्या डोक्यात कित्येक दिवस घोळत होतं,तो काल मी चान्स घेतला.”
मी आणखी प्रश्न विचारण्यापूर्वीच मला म्हणाला,
“तू म्हणशील असं करून तुला काय मिळालं?” तेच सांगतो.माझ्या आई पासून माझ्या सर्व मुलां पर्यंत कोण कोण काय काय बोलतं ते ऐकायचं होतं.म्हणून मी, तू नाशिकहून गेल्यावर लगेचच दुसर्‍या एस्टीने मुंबईत आलो.एका इराण्याच्या दुकानातून घरी तो फोन केला.बातमी ऐकून मंडळी घरी जमेपर्यंत कोपर्‍यावरच्या लॉन्ड्रीत माझे आंगावरचे कपडे उतरून घरी जमलेल्यांच्या गर्दीत वाट काढून एका खूर्चीवर बसलो होतो.तू माझ्याकडे निरखून बघायचास त्यावेळी मी हळूच दुसरीकडे बघायचो.तू येण्यापूर्वी मी त्या खूर्चीवर बसून कोण कोण काय काय बोलत होते ते कान लावून ऐकत होतो.”
मी सूर्याला मधेच थांबवून म्हणालो,
” किती रे तू निष्टूर वागलास.तुला कुणचीच कशी किंव आली नाही.?”
मला हंसत हंसत सूर्या कसा म्हणतो,
“वकिली करून करून खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायची मला संवय झाली आहे.पण एक मला माहित झालं आहे की माणूस फक्त दोन वेळा नचूकता खरं बोलतो एकदा जर का तो भरपूर दारू प्याला असेल-तुझ्या भाषेत घूटूं घेतलेला असेल-तर किंवा दुसर्‍यांदा आपलं जवळचं कोण गेलं असं कळल्यावर त्या गेलेल्या माणसाशी झालेल्या प्रातारणा आठवून किंवा त्याच्याशी पश्चातापपूर्वक काही वागणूक झाली असल्यास माणूसकी म्हणून खरं सांगायचा संभव असतो.”
मी म्हणालो,
“मग सांगून टाक की रे काय ते लवकर कोण काय काय बोललं ते”
“ऐक तर” मला म्हणाला,
“सर्वांना दुःख झालं होतं आणि पश्चाताप ही झाला होता.पण फक्त दुःखं झालं होतं ते माझ्या आईला.तिला कसलाच पश्चाताप झालेला दिसला नाही.
तिच्या पोटात नऊ महिने वाढून,माझं तिने संगोपन करून एव्हडं मला वाढवलं.मला लहानपणी दम्याचा विकार होता.त्यावेळी दम्याची उबळ आल्यावर मी कसा कासावीस व्हायचो,त्याची आठवण ती इतराना सांगत होती.
पश्चातापाची यादी मात्र इतर वाचून दाखवीत होते.
बायको म्हणाली,
” कधी कधी घरी दमून भागून यायचे,कमाई काही इतकी व्हायची नाही.माझ्या बरोबर चिडाचिड करायाचे मग मी रागाने त्यांना काहीतरी बोलायचे ते तसं करायला नको होतं.त्यांचा तरी काय दोष होता.”
मोठी मुलगी शोभना म्हणाली,
“बिचार्‍यांच्या हाताला यश नव्हतं.पण कष्ट करायचे”
मोठा मुलगा शरद म्हणाला,
“मला अकदी पोटतीडकीने चांगलं शिकायला सांगायचे पण मी त्यांच बोलणं मनावर घेतलं नाही.त्याचा मला आता पश्चाताप होतो.”
धाकटी मुलगी डिंपल म्हणाली,
“मी खूपच त्यांच्या मनाविरूद्ध वागले.मला ते खूप शिकायला सांगायचे.त्याना माझं हे बॉलीवूड वगैरे आवडायाचं नाही.कुमार त्यांना आवडायचा कारण तो आय आय टीत शिकून अमेरिकेला गेला.त्याचा त्याना अभिमान वाटायचा.
एकदा एक अशी घटना घडली,मला ती आठवली की अजून वाईट वाटतं.आज तर प्रकर्षाने वाईट वाटतं.
मी त्या वयावर अल्लडच होते.”दुल्हनीया ले जायेंगे” ह्या पिक्चरला जायला मी खूप आतूर झाले होते.माझी मैत्रीण माझ्या घरी येणार होती.साडेपाच झाले तरी ती आली नाही.पिक्चर सहाचं होत,तेव्हड्यात बेल वाजली.मी मैत्रीण आली म्हणून आतूरतेने दरवाजा उघडायला गेले.आणि पहातो तर बाबा होते.मी पटकन म्हणाले,
“शीः! बाबा तुम्हीss? मला वाटलं की माझी मैत्रीण.”
मी असं बोलायला नको होतं. बिचारे थकून भागून आपल्याच घरी आले होते.मला आता त्याचा पश्चाताप होतो.कधी तरी मी त्यांची माफी मागणार होते.पण आता तसं कधीच करता येणार नाही.”
नंतर सूर्या म्हणाला,
“दिल्लीहून वंदना यायची होती.आणि कुमार तर अमेरिकेत होता.त्यामुळे हे ऐकलेलं लक्षात ठेवून माझ्या खूर्चीतून उठलो.लॉन्ड्रीत गेलो,दाढी मिशीचं वेषांतर काढलं आणि माझे नेहमीचे कपडे घालून घरी परत आलो.”
मी म्हणालो,
“तुला तसा पाहिल्यावर त्या सर्वांच काय झालं असेल.कल्पनाच करवत नाही.”
त्यावर सूर्या म्हणतो,
“अरे,काय सांगू? बायको जोर जोरात रडून माझ्या छातीवर बुक्क्यांचा वर्षाव करीत होती.किती शिव्या दिल्या असतील मला काही आठवत नाही.मुलं तर हंसत ही होती आणि रडत ही होती.मी मात्र माझ्या आईच्या मांडीवर डोकं टेकलं.ती मला जवळ घेऊन कुरवाळत होती.”
हे ऐकून मला डोळे पूसताना पाहून सुर्या म्हणाला,
“हे सर्व तू तुझ्यात आणि माझ्यातच ठेव.तो दाढीमिशीवाला कोण ते त्यांना माहित नाही.आणि त्यांचे संवाद त्याने ऐकले तेही त्यांना माहित नाही.म्हणूनच मी तुला काल समुद्रावर भेटूया असं म्हटलं.”

आज सूर्या निघून गेला.त्याचं गूपित मी फोडलं असा त्याच्याकडून तरी माझ्यावर आरोप येणार नाही.


श्रीकृष्ण सामंत.(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: