Monday, April 13, 2009

एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.

काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्‍याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत आहे बघा.निर्मीती ही निसर्गाची आवश्यक जरूरी असल्याने जीवनाचा र्‍हास होणे त्याला न लगे.

म्हणून कुणाचाही सहजासहजी मृत्युला मिठीमारण्याचा प्रयास निसर्गच उधळून लावतो.जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं गिरीश आपल्या जीवनात जगण्याचे मार्ग शोधू लागला.अगदी साधीशी गोष्ट माझ्या नजरेतून त्यावेळी सुटली नाही ती म्हणजे आता तो सर्रास ऊन्हाचा चष्मा वापरायला लागला. त्या ऊन्हाच्या चष्म्याशिवाय कुणाच्या नजरेत नजर घालून बघण्याचं तो टाळीत होता.असं करण्याने त्याचे रोजचे व्यवहार जर का शाबूत ठेवून त्याला जगता आलं तर कुणाचं काय जाणार?असं माझ्या मनात आलं.
माझे आणि गिरीशचे संबंध भावाच्या नात्यापेक्षा मित्राच्या नात्याने जवळकीचे होते.त्यामुळे तो मला आपली सुखदुःख उघड्या मनाने सांगत असे.मीहून त्याच्याकडे विषय काढला नाही.त्याने आपणहून आपल्या भावनांना-स्टीमआऊट- करण्याच्या उद्देशाने मला एकदा तो म्हणाला,
“माझे डोळे नुसतेच बुबूळापुरते न झांकता पूर्ण डोळे झांकले जातील असा माझा गॉगल-सनग्लासीस-हा माझं नुसतंच उन्हापासून रक्षण करण्यासाठी नव्हता तर -गेल्या वर्षभरात मी पाहिलं आहे की- तो माझं पान्डित्य प्रदर्शित करीत होता.”
मी त्याला म्हणालो,
“गिरीश,तू दिवसभर हा ऊन्हाचा चष्मा वापरतोस ते पाहून मला राहून राहून वाटायचं की असं करण्यामागे वीणाचं अकालनीय जाणं हे असावं,आणि हे माझ्या केव्हांच लक्षात आलं होतं.परंतु,त्याच्या मागे तुझा उद्देश काय आहे ह्याच्याबद्दल मी जास्त विचार केला नाही.तो चष्मा तुला आवडतो,किंवा काही लोक एक फॅशन म्हणून वापरतात तसा काही तुझा स्वभाव नाही.पण कधीतरी तू मला त्याचं खरं कारण सांगशील याची मला खात्री होती.आणि कुठलीही गोष्ट तू विचारपूर्वक करतोस हे पण मला माहित होतं.तसंच माझ्या आणि तुझ्या विचारात खोलवर साम्य नसलं तरी कारणात साम्य असावं ह्याची मला खात्री होती.”
वीणाच्या जाण्याची आठवण करून दिल्यावर त्याला निदान मी तरी त्याच्याशी एकाच फ्रिक्वेन्सीवर आहे हे पाहून बरं वाटलं.

मला म्हणाला,
“माझी एकुलती एक मुलगी वीणा गेल्यापासून माझं आचरण आणि माझे विचार-मति- अस्तव्यस्त झाली होती.आणि साधा उन्हाचा रंगीत चष्मा डोळ्यावर लावून सर्वच गोष्टी एका रंगाखाली आल्या होत्या.
मी हा चष्मा उन्हासाठी किंवा बचावासाठी वापरून मनातल्या संवेदनाना बाधा आणीत नव्हतो.
जीवनातले सूक्ष्म कंगोरे जे मी संवारले होते त्यांच्याबद्दल माझी त्यांच्याकडे पहाण्याची- अवलोकनाची- नवी शैली म्हणून त्याचा उपयोग करीत होतो.माझ्या संवेदनाना नवीन आकार,ध्वनी, आणि रंग त्या चष्म्यामधून उभारून आला होता. नेहमीचंच पहाण्यात परिचित झालेल्या माझ्या डोळ्यावर अवलंबून राहाण्या ऐवजी मला निराळी दृष्टी अवगत करता आली. पलिकडल्या व्यक्तिविषयी अकथित अर्थ लावायला आपण आपल्या संवेदनामधून आपल्यालाच विनंती करीत असतो.
जीवन ह्याच रंगीत गुलाबी दृष्टीतून दाखवतं की, मृत्यू नुसताच जवळून निसटून जात नाही तर तो त्या व्यक्तिला स्तब्ध करतो-रोखून ठेवतो.”
मी त्याला मधेच थांबवून म्हणालो,
“गिरीश,मी तुला खरं सांगू का,होणारी गोष्ट होऊन जाते.मागे राहाणार्‍याला खचीतच जीवन जगण्यासाठी आपल्या मनाची समझ करून घ्यावी लागते.आणि तसं करीत असताना कशावर तरी श्रद्धा ठेऊन जगावं लागतं.तुला तसं नाही का वाटत?”

“हो मला तसंच काहीसं वाटतं”
असं म्हणत गिरीश पुढे सांगू लागला,
“मी समजलो होतो की जे काही मी अनुभवत आहे त्याचा केंद्रबिंदु माझी मुलगी- वीणा- आहे.
ती होती त्यावेळेला जसे मी कपडे चढवत होतो तसेच आताही चढवतो.तिला जसं मी गुडनाईट म्हणायचो तसंच आताही इतराना म्हणतो.तिला घेऊन त्या पांढर्‍या बगळ्यांच्या रांगा जशा निळ्या आकाशात दिसत होत्या तशा आताही दिसत असतात.
त्या ऊन्हाच्या चष्म्याने मला समझ आणण्यासाठी मदत केली ती अशी की निष्कपट आणि संकीर्णपणा कसलाच दृष्टांत दाखवित नाहीत असं सांगण्यासाठी. आणि खरोखर एक गोष्ट माझ्या लक्षांत आली की श्रद्धा डोळ्यांना दिसत नाही ती एक मनोदशा असते आणि ती श्रद्धाळूंची मार्गदर्शिका असते. त्या चष्म्यात एक अदृष्य संतुलन आहे की त्यामुळे मला एक गोष्ट समजायला समर्थन मिळालं की ह्या जगात प्रत्येक जण एकेमेकाशी संबंधीत असून हरएक तत्वाने एकमेकाशी जखडलेले आहेत.”
हे ऐकून मला खूपच बरं वाटलं होतं.निदान गिरीशला हळू हळू जीवनात रस आहे असं वाटू लागलं होतं. आणि हीच तर निसर्गाची खूबी आहे की जशी वेळ निघून जाते तशी दुःखावर आवर येऊन माणूस कसंतरी जगायला धडपड करीत राहतो. त्यानंतर तो जे काही मला सांगू लागला त्याने माझी खात्री झाली की,
“पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा”
गिरीशने कशी आपली समजूत करून घेतली हे मला ऐकावसं वाटलं.
तो म्हणाला,
सगळंच-लोक,स्थानं,संगीत- हे सर्व निरनीराळ्या रुपातल्या परछाया आहेत आणि हरएक सांगतात की जीवनात प्रयास करीत रहावं कारण प्रत्येकाची जीवन जगण्याचा समय ही एक मोजकी संख्या आहे.
मी खरोखरंच एक मुख्य गोष्ट माझ्या ऊन्हाच्या चष्म्यातून पाहिली की शब्द बोलले जावो तसंच क्षण,आणि लोक निघून जावो ते कधीच व्यतीत होत नाहीत.ते तिथेच असतात,फक्त मागे ऐकून किंवा पाहून झाल्यावर जरा निराळे दिसतात. आपण सगळे फक्त अपरिवर्तनशील श्वास आहोत आणि मार्गस्थ असतो.हे मी खरंच पडताळलंय आणि असं मानतो की वीणा अजून इथेच आहे,फक्त ती भिन्न आहे.
मी त्याला म्हणालो,
“खरंच,एव्हडासा तो उन्हाचा चष्मा पण त्या रंगीत चष्मातून तू जी काही समझ करून घेतलीस ते ऐकून मला फार बरं वाटलं.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: