Thursday, April 9, 2009

कांद्दाची भजी.

ज्याला आपण कांद्दाची भजी म्हणतो त्याची रुचिदार चव कुणाला माहित नसेल असं वाटत नाही.एव्हडं काय आहे त्या भज्यात?असं कुणी विचारलं तर काय सांगणार?.कुणी विचारतं की ही भजी क्षुधावर्धक आहेत का?की कुणी विचारतं ही भजी खाऊन पोट भरता येतं का? तर काय सांगायचं.?
कांद्दाची भजी म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं.काही लोक मात्र तेलकट-तूपकट अश्या अर्थाने भज्यांकडे पाहून खायाला नाकं मुरडतात.
“नसेल खायची तर खायची जबरदस्ती करूं नका” असं कोणी गंमतीत सांगतं.
“उरली तर आम्ही फस्ता पाडायला तयार आहो” असं कुणी म्हणतं.
पण जर का कुणी आग्रहास्तव ही कांद्दाची भजी खाल्ली तर त्यांचा आशाभंग मुळीच होत नाही.ह्या भज्यांचा प्रकारांचा कोकणात,घाटावर नव्हे तर आता देशभर प्रसार झाला आहे.आता जो तो आपआपल्या पद्धतीत भजी बनवतो म्हणा. कोकणात श्रावणातल्या सरी वर सरी यायला लागल्या आणि बाहेर कुंद वातावरण पाहून गरम गरम कपभर चहाबरोबर कांद्दाची भजी खाण्यातली लिज्जत निराळीच म्हणावी लागते.

कांद्दाची भजी खायला घेतल्यावर एक एक भजा बरोबर कुणाची भजी करण्याची कशी पद्धत तर कुणाची कशी यावर चर्चा टाळता येत नाही.विषेश करून जमलेल्या स्त्री वर्गाची त्याबद्दलची चर्चा. कोकणातली कांद्दाची भजी,घाटावरची पद्धत,तर गुजराथमधली भजीया तर वर उत्तरेला म्हणतात ते पकोडे ह्या सर्वांची पाक-विधि- रेसीपी- चर्चीली गेली तर नवल नाही. भजाच्या नांवावर भजी केली गेली तरी बट्याट्याची भजी,उडीद डाळीची भजी,मेथीची भजी,तिखट मिरची घालून केलेली भजी,कच्च्या केळ्याची भजी आणखी असले किती ही प्रकार असले तरी कांद्दाची भजी ही सगळ्यात विरळी.कांद्दांच्या भजाची चव जशी विरळी तसा त्याचा खमंग वास ही विरळा.भजी तळली जात असताना,त्याचा पसरलेला वास कुणी लपवू शकणार नाही.

भज्याच्या प्रस्तावनेची ही जी जरूरी भासली त्याचं कारण अलिकडेच माझ्या दोन मामे बहिणी रेवती आणि यशोधरा आमच्याकडे राहायला आल्या होत्या.
दोघीही आलटून पालटून आपल्या लहानपणाचा भज्याचा किस्सा सांगत होत्या.
” आमच्या आजीचा ही कांद्दाची भजी करण्याचा हातोटा होता.त्याची आठवण येते. पण त्यावर आम्हाला त्या लहान वयात ते सगळं समजून घ्यायला जरा कठीणच प्रयास होता.पाकशास्त्रात यशस्वी व्हायला लागणारी वेळ देणं आणि यश मिळवीणं हे जरा जिकीरीचं होतं.पण आमच्या आईकडून आयतं खायायला मिळत असल्याने आम्ही मोठी होई तो त्याचं स्वारस्य घ्यायला जरा आमच्याकडून कुचराईच झाली. आता ती कांद्दाच्या भजाची रेसिपी एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत होत असताना एकाएकी आमच्यावर त्याची जबाबदारी आली.

ह्या वेळी श्रावणात आम्ही जेव्हा कोकणातल्या ट्रीपमधे एकत्र आलो तेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही तो भजी कार्यक्रम आपल्या हाताने पार पाडावा.
आमच्या भावना संमिश्र होत्या.पण त्या भावना महत्वाच्या होत्या ह्याची आम्हाला जाणीव होती.
किंबहूना तसं वाटणं आवश्यक होतं.जेव्हा मशाल हस्तांतरीत होते त्यवेळी ती पुढे नेत गेलं नाही तर ती विझून जाण्याचा संभव असतो.ही जबाबदारी आम्हाला ठाऊक होती.भजी तयार करण्याच्या कारागीरीचं कौशल्य आणि त्याचं मौल्य आमच्या आजीपासून पिढीजात आहे हे आम्हाला समजत होतं.

माझी आई ही भजी करीत असताना आम्ही किती वेळा ते निक्षून पहात होतो. त्याची गणती करणं कठीण आहे.पण आता आम्हाला आश्चर्य वाटतं की ती कांद्दाची भजी तळून झाल्यावर गरम गरम खाताना कुरकुरीत वाटायला आणि चवीला रुचीदार वाटायला किती मेहनत ती घ्यायची.

ती पिवळीजर्द चण्याची डाळ ताजी दळून आणल्यावर त्याचं पीठ-बेसन- ठराविक भांड्यात घेऊन त्यात तो ताजा बनवलेला गरम मसाला ज्यात इतकी इतकी लवंग,मीरी,दालचिनी,धणे,सुक्या मिरच्या,बडिशोप, मेथी,तीळ घालून मंद विस्तवावर भाजून बनवलेली ताजी मसाला पूड,तो लाल रंगाचा कांदा उभा चिरून त्याला मीठ लावून कांद्दाला पाणी सुटूं देऊन मग त्यात ते ताजं बेसन घालून त्यात किसलेलं आलं, कोथिंबीर बारीक चिरून,लसूण ठेचून नंतर हळद तिखट घालून ते मिश्रण जमल्यास त्याच कांद्दाल्या सुटलेल्या पाण्यात मुरूं द्दायचं.आणि थोडा अवसर घेऊन मग तेलाला ठरावीक तापमान आल्यावर ते भजाचं मिश्रण मुठीत घेऊन मुठ हलवीत हलवीत तेलावर मिश्रण सोडून देत लालसर रंग आल्यावर भजी तेलातून झार्‍याने काढून घेऊन जरा थंड होऊ दिल्यावर कुरकुरीत होतात.
किती वेळां आमची आई असं करताना आम्ही पाहिलंय.पण आता वाटतं भजी करण्यात कोणताही बिघाड न होता प्रत्येक वेळी ती हे कसं करायची?तो एव्हडा लाल कांदा उभा चिरताना डोळ्यात पाणी न आणता ती कसं करायची?
आता कसंतरी,आम्ही संभाळून घेतो.डोळ्यातून पाणी नंतर येतं.

आईच्या डोळ्यात जेव्हा मोतीबिंदू पडलं आणि त्यानंतर तिचं ऑपरेशन झाल्यावर आमचे बाबा तिला कांदा चिरून द्दायचे.आता बाबा जाऊन एक वर्ष होऊन गेलं. आई जाऊन चार वर्ष झाली.वेळेचं ध्यान रहात नाही.जणू आमचं ह्रुदय घड्याळाच्या टिकटिक बरोबर संधान ठेवीत नसावं.आम्ही दोघीही आईबाबा शिवाय जगत आहो याची मनात संकल्पना करतो.ह्या आईबाबाशिवाय रहाण्याच्या संकल्पनेवर कुणी काही लिहिलं असेल काय हे पहाण्यासाठी आम्ही दोघीनी लायब्रर्‍या धुंडाळल्या.पण कुणीही पोक्त मुलांच्या वयस्कर आईवडीलांच्या नसण्याने आलेल्या त्या दुःखावर काही लिहिलेलं आढळलं नाही.

त्यांच्याआठवणी येतात.त्यांचे उद्गार आठवतात.त्यांचं प्रेम आठवतं,त्यांच्या शब्दांच्या पलिकडचे अर्थ आठवतात, त्यांचे आदर्श आणि त्यांच्या पाक-विधि आठवतात. अशा तर्‍हेने त्यांच्या समिप राहाण्याचा हा आमचा प्रयत्न म्हणा वाटलं तर.पण हे परिश्रम थोडे का होईना प्रतिकूल असले तरी उपयोगात आहेत.जे होतं ते परत आणीत नसलं तरी ते आम्हाला त्यांच्याजवळ आणतं.आणि आम्हाला वाटतं, ह्याच पद्धतिने आम्ही त्यांच्याशी संबंधात राहतो. हे आमचं ऐकून काहिना जरा विक्षिप्त वाटेल,किंवा असुखद वाटेल ज्यांची अशी हानि झाली नाही त्यांनाही असं विक्षिप्त वाटेल.आम्ही तेही समजूं शकतो.हा एक जीवन-चक्राचा भाग म्हणून साधारणशी उक्ति आहे असं वाटेल, अनिवार्य किंवा नैसर्गीक वाटेल.पण आपल्या मनाला हे तर्क-शास्त्र समजत नाही. बुद्धितः ते समजण्यासारखं आहे.तरी सुद्धा मनोभावनाना संतुष्ट करायला अशा तर्‍हेची हानि बरेच वेळा निःशब्द आणि दृष्टिपासून गोपनिय असते.आणि ह्या मनोभावना पाककृतीमधली साधी अनपेक्षित सामुग्री आणि त्यामधलं प्रेम यामधे कुठे तरी निगडीत असतात.”
मी मनात म्हणालो,
“साधी कांद्दाची भजी ती काय आणि ह्या माझ्या बहिणीनी त्याचा केव्हडा वास्तविक विषय केला.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: