Saturday, April 25, 2009

असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.

आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली,
“तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात.”
हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं.
“ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते.”
मी वृंदाला म्हणालो,
“तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?”
असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.
वृंदा मला म्हणाली,
“ते तुम्ही मालिनीलाच विचारा.मला पण त्याचं कुतूहल होतं,पण तुम्ही विचारणं निराळं आणि मी विचारणं निराळं.”
हे ऐकून मालिनी म्हणाली,
“असं काही नाही.माझे विचार तुम्हाला पटतीलच असं काही नाही.पण तुम्ही आता विचारलंत तेव्हा सांगते.
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
ही उक्ति मी कुठे वाचली ती आठवत नाही.कसं का असेना हे म्हणणं मला आवडतं आणि त्याप्रमाणे राहण्याच्या मी प्रयत्नात असते.
मी ह्या उक्ति प्रमाणे नेहमीच राहिली नसेन. हायस्कूलच्या पूर्वीच्या लाजवट दिवसात,आणि हायस्कूलच्या अभ्यासाच्या दबावाच्या दिवसात ह्या उक्तिपासून जरा दूर राहिले.हेच ते खरे दिवस की ज्यावेळी आपण प्रौढ होण्याच्या प्रक्रियेत असतो,आणि बालीश मुळीच न दिसण्याच्या प्रयत्न करतो.”
वृंदा म्हणाली,
“अग पण ते दिवस काही कायमचे नसतात.त्यानंतर केव्हडं आयुष्य पूढे पडलेलं असतं.”
मला हा वृंदाचा पॉईन्ट आवडला.
मी म्हणालो,
“मालिनी,एखादा संकल्प करायला तसंच काही तरी कारण किंवा एखादी घटना घडावी लागते.असं मला वाटतं”
“अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात.”असं म्हणून मालिनी सांगायला लागली,
“ते वर्ष मला आठवतं की जेव्हा मी माझं जीवन खर्‍या अर्थाने जगायला लागले.
ते आमचे शाळेतले शेवटचे दिवस होते.सर्वजण सुट्टीवर घरी तरी जाणार होतो किंवा आजोळी जाणार होतो.माझी मैत्रीण कविता एका कार अपघातात निधन पावली होती.टिनएजर असलेल्या त्या वयात एखादी मैत्रीण आपल्यातून अदृश्य व्हावी ही विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हती.
कविताचे वडील काय म्हणाले ते माझ्या अजून लक्षात आहे.
“माझी कविता नेहमीच सर्वच करायला घाई घाईत का असायची,हे शेवटी आता माझ्या लक्षात आलं.मला आता समाधान वाटतं की,ती आपलं जीवन असं जगली कारण जरी ते जीवन अधूरं असलं तरी तिने तिला हवं हवं ते करून घेतलं.”

हे त्यांचं बोलणं माझ्या डोक्यात पक्कं शिरलं आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
माझ्या लक्षात आलं की मला गणीतात किती गुण मिळाले हे माझ्या स्मृतीत मी कधीच ठेवणार नाही पण जीवनातली सहजता आणि मी माझ्या प्रियजनांच्या स्मृती काहीश्या चांगल्या लक्षात ठेवते.
लहान लहान गोष्टीकडे पहाण्यासाठी माझ्या जीवनाच्या दृष्टीने माझ्या विचाराना मी एकाग्र करून पहाते. लहान असण्यातली जिज्ञासा,आणि भावार्थ,उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास, जोरात आलेलल्या पावसाच्या सरीचा निनाद,समुद्राच्या किनार्‍यावरचा लाटांचा आवाज आणि त्या वातावरणातला जीवघेणा गंध,वीजेचा चमचमाट,आणि गावातल्या नदितल्या सळसळणार्‍या पाण्याच्या ओघात घेतलीली पहिली डुबकी.तसंच खुळचंट वाटलं तरी केलेली प्रश्नांची सरबत्ती. जसं आकाश नीळच कां? वगैरे.”
मालिनीचे हे विचार ऐकून मला तिच्या संकल्पाचं कारण समजायला लागलं.
“वा! छान विचार आहेत तुझे” असं मी म्हटल्यावर तिला बरं वाटलं.
ती पूढे म्हणाली,
“माझी आई मला नेहमी म्हणायाची,
“तत्क्षणी वाटणारी गोष्ट कर.”
ते ऐकून मला हंसू यायचं.पण त्यामुळे मला काहीही करायला मुभा मिळायची.दिसताच मी संधी घ्यायची.
माझ्या जीवनात मी यापुढे काय काय करणार आहे ह्याची मला यादी करायची आहे.अगदी अपूर्व गोष्टींची पण यादी करायची आहे. जश्या ताजमहाल पाहाणं, हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन येणं,अश्याच काही जगातल्या नाविन्याच्या गोष्टी पहाणं.आणि जेव्हा जेव्हा मी ह्या यादीत लिहायला जाते तेव्हा ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही”
हे वाचून बरं वाटतं आणि असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.”
हे तिचं शेवटंच वाक्य ऐकून माझ्या मनातला विचार मला रोखून ठेवता आला नाही.

मी तिला चटकन म्हणालो,
“असंच एखाद्या शरिराने पिकलं पान झालेल्या माणसाचं मन मात्र तरूण असूं शकतं.आणि ते प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून आहे.अलिकडेच मी एका हिंदी गाण्याचं मराठीत विडंबन केलं.तरूण मंडळीने ते ऍप्रिशीयेट केलं.कारण,
“या वयावर असं गाणं लिहिण्याचे ह्यांना विचार कसे सुचतात?”
असा विचार त्यांच्या मनात आला असावा. तसं गाणं मी लिहावं हे त्यांना अपेक्षीत नसावं.आणि ते स्वाभाविक आहे.
एका वाचकाने प्रतिक्रियेत चक्क लिहिलं,
“पिकल्या पानाचा देठ की हिरवा..”
हे वाचून मला गंमत वाटली.
“पिकलं पान” पूर्वी कधीतरी “हिरवं पान” होतं,त्यामुळे “हिरवं पान ” कसं असतं हे पिकल्या पानाला नक्कीच जाणवलेलं असतं.पण उलटं मात्र खरं नाही.

-reverse is not true-.
जे काही आत्ता असलेल्या हिरव्या पानाला पिकल्या पानाबाबत माहित असतं ते बरंचसं myth-मिथ्या- किंवा कल्पित असतं.कारण ते अनुभवलेलं नसतं. सर्वच गोष्टी समजण्यासाठी अनुभवायला हव्यात हे जरी जरूरीचं नसलं तरी काही गोष्टी अनुभवणं आवश्यक असतं.
जशी वेळ निघून जाते तशी त्या हिरव्या पानाची हिरवट कमी होते,क्लोरोफील कमी झाल्याने ते पिवळं दिसायला लागतं.त्या पिवळ्या पानाचा हिरवा देठ अगदी शेवटी शेवटी पिवळा होतो आणि नंतर पान सुकून गळतं आणि खाली पडल्यावर त्याच पानाला पाचोळा म्हणतात.तो देठ हिरवा असे पर्यंत नव्हे तर पिवळा झाला तरी गळून पडेपर्यंत अगदी हिरव्या पानाच्या बरोबरीत ते पिवळं पान त्या झाडाच्या फांदीवर असतं.सकाळच्या कुंद हवेतल्या त्या दंवबिंदूना सावरणं,पहाटेच्या त्या हळूच येणार्‍या अश्या वार्‍याच्या झुळकीबरोबर डुलणं,हे चालूच असतं.
म्हणून वाटतं मालिनी,
“पावसातलं ओलंचिंब होणं”
असं वाटत राहणं हेच तरूण मनाचं द्योतक आहे.माझ्या सारख्या दुसर्‍या एखाद्याला आता या वयावर वाटणं सोडूनच दे मनांत आणणं पण कठीण आहे.कारण तुझी ती उक्ति,
“जोपर्यंत तुम्ही मनाने तरूण राहता तोपर्यंत तुम्ही वयस्कर होणार नाही.”
त्याने पण वाचली पाहिजे.
तू अशी का दिसतेस त्याचं गुपीत मला कळलं.”




श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: