Monday, April 27, 2009

श्रेष्ठतम मैत्री.

पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो.
मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्या पासून गाढी दोस्ती होती.

अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली. तो पण आपल्या म्हातार्‍या आईवडलाना भेटायला म्हणून आला होता. एकदा फिरत फिरत आम्ही दोघे आमच्या गावातल्या नदिवर जाऊन जुन्या आठवणीना उजाळा देत बोलत बसलो होतो.
बोलता बोलता शरदची आठवण आली.मी पुरुषोत्तमाला कुतूहल म्हणून विचारलं,
“काय रे आपण सगळे एकत्र खेळायचो.एकत्र शाळेत जायचो.संध्याकाळी सगळे मिळून नदीवर पोहायला जायचो.पण तुझ्यात आणि शरद मधे मला नेहमीच खास दोस्ती दिसायची.तुम्ही दोघे अगदी सख्खे भाऊ कसे एकमेकावर प्रेम करायचा.हे कसं काय?”
पुरुषोत्तमला शरदची आठवण आली.हे मला त्याच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं. आणि माझ्या ह्या प्रश्नाने त्याला मनापासून शरदच्या जून्या आठवणी काढून मला काही तरी सांगावं असं वाटलेलं दिसलं.

मला म्हणाला,
“मला वाटतं खर्‍या मैत्रीमधे फक्त दोघांमधला विश्वास आणि लगाव ह्यांच्या पेक्षा काही तरी जास्त असतं. एकमेकाच्या बुद्धिचं आदान-प्रदान असतं.खर्‍या मित्रांमधे एकमेकाच्या हृदयाशी संगति असते.एक मित्र जर का सुखी,दुःखी किंवा भयभयीत असला तर दुसरा त्याच्या भावनेचा वाटेकरी असतो. मानवजातितलं हे सर्वांत उच्चतम बंधन असतं.

कोकणातल्या माझ्या राहत्या खेड्यातल्या परिसरात माझा एकच खरा मित्र होता. मी माझ्या आणि त्याच्या जन्मापासून एकमेकाचे शेजारी होतो.त्यावेळी इतर तुझ्या सारख्या बाळगोपाळांसारखं आम्ही पण लहानपणातले खेळ,मस्ती-मजा यामधे आनंद घेत होतो.जरा मोठे झाल्यावर गावातल्या नदीच्या पाण्यात पोहायला शिकलो.
आमच्या बरोबर इतर समवयस्क दोस्त मंडळी पण पोहायला यायची.हे तुला आठवत असेलच.
आमच्या घरात दोन म्हशी,दोन बैल,एक दुभती गाय- कपिला- आणि तिचं लहानसं पाडंस- तानु- अशी जनावरं होती.नदीवर म्हशीना पाण्यात डुबायला आणि धुवायला नेताना आम्ही दोघे म्हशीवर बसून गप्पागोष्टी करीत घरून नदीपर्यंत जात असूं. नदीत डुंबताना आणि पोहून एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत जाताना अनेकदा इतरांशी पोहण्यात चूरस लावित असायचो.
माझा आणि माझ्या मित्राचा-शरदचा- नेहमीच पुढचा नंबर असायचा.
आमच्या दोघांतला दुवा साधायला थोडा वेळ घालवावा लागला.आमचा उन्हाळ्यात विशेषकरून बराच वेळ नदीवर जायचा.सकाळी लवकर उठून-ज्यावेळी इतर आमचे संवगडी अंथरूणात गुडूप झोपलेले असायचे- अशावेळी आम्ही दोघे नदीवर पाण्यात डुबत असायचो. आमच्या दोघातला हा मैत्रीचा दुवा सकाळच्या पोहण्याच्या संवयीने आणि ह्या नदीच्या साक्षीने तो जास्त असामान्य झाला.एकमेकाशिवाय नदीत पोहणं कठीण होत होतं. तेरा वर्षावरचा आमचा तो पोहण्याचा उन्हाळा शेवटचा होता.तो शेवटचा उन्हाळा होण्यासाठी आम्ही काही योजना केली नव्हती. परंतु, त्यावर्षी शरदचा एका गाडीच्या अपघातात शेवट झाला.
तत्क्षणी मला कळून चूकलं की हा अंत होता.तो खास दुवा कष्टदायी होऊन आता तुटला होता.माझं ह्या दुव्याशिवाय आता कसं होणार हे मला कळेना.”
मी म्हणालो,
“हो मला आठवतं,तुला एव्हडा धक्का बसला होता की तू आजारी पडला होतास. शरद गेल्यानंतर तू जवळ जवळ पंधरा दिवस शाळेत येत नव्हतास.एकदा आपले शाळेचे हेडमास्तर तुला बघायला घरी आले होते.आणि त्यानी तुझी समजूत घातली होती.”

“खरंय तुझं म्हणणं”
असं म्हणत पुरुषोत्तम सांगू लागला,
“जसं जीवन पुढे जात होतं तसं मला कळलं की मैत्रीचा हा दुवा कधीच तुटत नाही. आमच्यातला दुवा मृत्युला पण ओलांडून गेला होता.केवळ आम्ही दोघे शेजारी म्हणून हा दुवा नव्हता,तर ते एक पवित्र बंधन होतं.
अजून मी रोज सकाळी उठल्यावर त्याचं स्मरण करतो आणि त्याच्याबद्दलची सहयोगाची भावना माझ्याबरोबर सतत ठेवतो.माझ्या रोजच्या जीवनात त्याचा दुवा आणि त्या नदीतल्या पोहण्याची चूरस ह्या दोन गोष्टी माझ्या यशाला बढावा देते.”

“पण हायस्कूल संपल्यावर आपण सगळेच गाव सोडून शहरात पुढचं शिकायला आलो.”
असं मी त्याला आठवण देत म्हणालो.

“नंतर मी जेव्हा शहरात राहायला आलो,तेव्हा माझ्या लक्षात आलं की,माझ्या दोस्तीच्या दुव्यासारखी आणखी इतरांची पण दोस्ती असते.पण मला वाटत नाही सर्वच लोक तसं मानीत असावे.”
असं म्हणून पुरुषोत्तम बराच सद्गदित झालेला मला दिसला.त्याची समजूत घालण्याच्या इराद्याने मी त्याला म्हणालो,
“परंतु,अशा महत्वपूर्ण मित्राबरोबरच्या दोस्तीने दोघेही चांगले नागरीक बनत असावे. ही महत्वपूर्णता असते म्हणूनच ही दोस्ती नुसत्या दोन व्यक्ती मधल्या विश्वास आणि लगावा पेक्षा जास्त श्रेष्ठतम भासते.”
माझं हे ऐकून पुरुषोत्तमाला खूपच बरं वाटलं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: