Saturday, August 1, 2009

शरदाचं चांदणं.

गांवाला आमच्या शेजारीच शरदचं घर होतं आणि त्याच्या शेजारी त्याच्या काकांचं घर होतं. आम्ही सर्व मुलं त्याच्या काकांच्या घरी खेळायला जायचो.हे मला पक्कं आठवतं.
शरदची राहणी अगदी साधी पण विचारसरणी मात्र उच्च होती.त्यावेळी त्याच्या सहवासात असतानाच त्याच्या ह्या वृत्तीचा मला पडताळा आला होता.शरद मुळातच गरीब स्वभावाचा होता.दुसर्‍याच्या भावना आपल्या कडून दुखवल्या जाऊं नयेत म्हणून तो पराकाष्टा करायचा हे माझ्या नजरेतून चूकलं नव्हतं.
आता मला भेटला तेव्हा मला आमच्या बालपणाची आठवण प्रकर्शाने जाणवली.
मी शरदला म्हणालो,
“मी माझ्या लहानपणी तुझ्याकडून खूप शिकत होतो. मला तुझा स्वभाव खूप आवडायचा. पापभिरू म्हणतात तसा तू वागायचास.मला ही त्याचं कुतूहलवाटायचं.पण त्यावर चर्चा करण्या इतकं त्यावेळी समजत नसायचं.पण आता मागे जाऊन पाहिल्यावर ह्या आपल्या वयात बालपणाच्या जीवनाची उजळणी करायला मजा येते.तुला काय म्हणायचं आहे?”

ह्या माझ्या प्रश्नावर शरद बराच खजील झाल्या सारखा दिसला.आणि मला म्हणाला,
“माझ्या बालपणाच्यावेळी झालेल्या विशेष महत्वाच्या नसलेल्या घटनानी माझ्या स्वभावावर झालेले अगदी खोलवरचे परिणाम मला अजून आठवतात.
माझे आईवडिल मला घरातला मोठा मुलगा म्हणून आणि कुटूंबातला महत्वाचा घटक म्हणून आणि जबाबदारीचा हिस्सेदार म्हणून वागवत होते.त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की आमच्या कुटूंबाच्या आणि आमच्या काकांच्या रहाणीमानात बराच फरक होता. आणि हे ही लक्षात आलं की माझ्या वडीलांच्या मनावर कसलातरी ताण होता.तसं असलं तरी मला तेव्हडी चिंता वाटली नाही जेव्हडी एका घटनेने माझ्या बाल मनावर त्यावेळी खराच प्रभाव पाडला.”
हे ऐकून मी शरदला म्हणालो,
“तुझे काका आणि तुझी चुलत भावंडं पण फार प्रेमळ असायची.आपल्याला त्यांच्याकडे असलेले खेळ खेळायला मनमुराद मोकळीक द्यायचे.त्यांच्याकडे एक भोंवरा होता त्याला दोरीने गुंडाळून ती दोरी जोराने ओढल्यावर भोंवरा एव्हडी जोरात फिरकी घ्यायचा की फायरब्रिगेडची गाडी आल्यासारखा मोठयांनदा आवाज करायचा.तुला आठवत असेल.मी हे कां लक्षात ठेवलं कारण तुझे काका आपल्यावर कधीही रागवायचे नाहीत.उलट खेळ खेळायला प्रोत्साहन द्यायचे.”
शरदला काकांची ही प्रेमळ वागणूक आवडायची.मला नेहमी म्हणायचा,
“माझे काका आणि काकी आमच्यावर खूपच प्रेम करतात.”
सॉरी,मी तुला सांगताना अडवलं तू काही तरी तुझ्या बाबांबद्दल सांगत होतास”
शरद पूढे सांगू लागला,
“मी माझ्या बाबांना एकदा सहज म्हणालो,
“बाबा,आपल्या काकांच्या घरात मुलांसाठी एव्हडी खेळणी आहेत की ती बघून मी चाटच झालो.”
माझे बाबा हे मी सांगत होतो ते निमुट ऐकत होते आणि त्यांच्या चेहर्‍यावर खेद दिसत होता.माझं सांगून झाल्यावर मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावर थोपटू लागले.नंतर मला म्हणाले,
“मी तुला एव्हडी खेळणी देऊं शकत नाही म्हणून तू नाराज आहेस का?”
ते ऐकून माझं मन एव्हडं खट्टू झालं की मला तो प्रसंग त्यावेळी मोठी माणसं समजावून सांगतील असं त्यांना सांगता आलं नाही.
त्या प्रसंगात खेदाचा,प्रेमाचा आणि आदराचा अंश होता.
“नको मला मुळीच खेळणी नकोत”
असं मी खूळ्याचा आंव आणून त्यांना म्हणालो.मला वाटतं त्यानंतर ह्या क्षणापर्यंत बाह्य बडेजाव आणि छानछोकीपणाकडे मी दुर्लक्षच केलं.”
मी म्हणालो,
“तू कधी विचारात असलास,कधी चिंतेत असलास की तडक आपल्या गावातल्या नदीच्या किनारी विशेष करून चांदण्या रात्री जाऊन त्या वडाच्या झाडाजवळच्या मोठया खडकावर बसायचास.तुझ्या शोधात असताना मला तू हटकून तिकडे आढळायचास.आठवतं तुला?तू असं का करायचास?”
ह्या माझ्या एका मागून एक विचारलेल्या प्रश्नाना ऐकून शरद म्हणाला,
“हो ती संवय मी मला लावून घेतली होती.त्याचं मुख्य कारण मला त्या वडाच्या झाडाजवळच्या खडकावर आणि त्या नदीच्या खळखळणार्‍या पाण्याच्या आवाजात मन एकाग्र करायला बरं वाटायचं.शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात मी वेडा होऊन जायचो.असं मी बरेच वेळा केलंय.एकदाची मी तुला गंमत सांगतो.

मला आठवतं मी त्यावेळी अठरा वर्षाचा असेन.आमच्या गावाच्या नदीच्या कडे कडेने मी फिरत फिरत जात होतो.
माझं मन अनेक प्रश्नांनी तुडूंब भरलं होतं.शेवटी मी त्या वडाच्या झाडाजवळच्या खडकावर बसलो.आणि माझ्या मनात एका मागून एक प्रश्न यायला लागले.
जीवनाचा अर्थ काय? आणि जीवनाचं प्रयोजन काय? समाज म्हणजे तरी काय?आणि सूख कसं मिळवावं? न्याय कसा पर्याप्त होतो?भाग्यावर विश्वास ठेवणं उचित आहे काय?

खूप रात्र झाली होती.नदी घों घों करीत वाहत होती.माझ्या प्रश्नांचा विचार करीत मी त्या नदीच्या उसळलेल्या प्रवाहाकडे टक लावून पहात होतो.चांदणं लख्ख पडलं होतं.नदीच्या लहरींच्या पृष्टावर एक लहानशी झाडाची डहाळी वरखाली होताना पाहिली.काही कारणास्तव माझे सर्व प्रश्न त्या खळबळणार्‍या पाण्याच्या पृष्टावरच्या वरखाली होणार्‍या डहाळीत एकत्र झाल्यासारखे वाटू लागले.मी माझ्या चिंतनात तल्लीन झालो होतो.

जेव्हा मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो,तेव्हा मला माझ्या जीवनात मोठ्या प्रमाणात भाग घेतलेल्या तत्वविचारांना हूडकून काढायचं होतं.जीवन शेवटी संपतं. लोक त्या वरखाली होणार्‍या डहाळी सारखे असतात. ते अनिच्छापूर्वक जन्म घेतात.ते अनिच्छापूर्वक जीवन जगतात.आणि ते अनिच्छापूर्वक जीवन संपवतात. ज्यांचं रूप-रंग जे स्वतः निर्माण करतात त्यांना त्यापासून वंचित केलं तर त्यांची खरी मुल्यं दिसून येतात.नाममात्र गोष्टींसाठी जे लोक धडपडत असतात त्यांना फक्त दयनीयता प्राप्त होते.मात्र जीवनातल्या सुखाच्या मार्गाच्या जे शोधात असतात त्यांना तो मिळतो.जर का मी अहंभाव आणि लालसा फेकून दिली आणि स्नेह,सहयोग, चांगुलपणा, दया आणि न्याय ह्यावर माझं लक्ष केंद्रित केलं तर सुख माझ्या आवाक्यातलं होईल असं मला वाटतं.”
शरदचं हे चिंतन ऐकून मला खरोखरच अचंबा वाटला.
मी म्हणालो,
“आता तू शेवटी कोणत्या निर्णयाला आला आहेस.तुझ्या पत्नीकडे बघून आणि तुझ्या मुलांकडे बघून तुझा सुखी परिवार आहे असं म्हणण्याने मी कसलं धारिष्ट करतोय असं मला वाटत नाही.”
शरद माझा हात त्याच्या हातात घेऊन मला म्हणाला,
“तुझं हे म्हणणं ऐकून मला आनंद होतो.आपल्या बालपणाच्या सोबत्याबरोबर ह्या वयात जुन्या आठवणीना जो उजाळा येतो तो अवर्णनीय आहे.
आता तू विचारतोस तर माझा निर्णय मी तुला सांगतो.
ह्या माझ्या तत्वविचाराचा माझ्याशी आणि इतरांशी असलेल्या माझ्या वागणूकीवर निर्णायक प्रभाव झाला आहे.ते एक माझ्या मधून मला मुक्त करण्याचं वरदान होतं. त्यामुळे मला हवं तेव्हडं सुख मिळालं.आता माझ्या मुलांनी ह्या स्वाधीनतेची प्रशंसा करून ती त्यांच्यासाठी त्यांनी जिंकावी अशी मी आकांक्षा करतो,तुला कसं वाटतं?”
आता तू पण विचारतोस म्हणून सांगतो,
“तुझे हे तत्वविचार आणि ते चिंतन ह्याला प्रामुख्याने ती नदी,ते वडाचं झाड,ते खडक आणि ते खळखळणारं नदीचं पाणी कारणीभूत आहे.आणि त्याहीपेक्षां ते चांदणं!
म्हणून मी त्या चांदण्याला “शरदाचं चांदणं” असं म्हटलं तर वावगं होणार नाही”
आणि आम्ही दोघे मनापासून खळखळून हंसलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com