Sunday, August 16, 2009

या सुखानो या!

आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.एकमेकाची आम्ही चौकशी केली.नेहमी प्रमाणे ते प्रो.देसायाना ओळखत होते.आपण प्रि.वैद्य अशी ओळख करून दिल्यावर माझ्या लक्षात आलं पूर्वी मी ह्यांना माझ्या घरी ते भाऊसाहेबांबरोबर आले असताना भेटलो होती आणि बोललो पण होतो.पण त्याला आता बरेच दिवस होऊन गेले. वयोमाना प्रमाणे हल्ली जरा मेमरी फशी पाडते असं उगाचंच वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की प्रि.वैद्यांबरोबर अशाच एका विषयावर मनोरंजक चर्चा झाली होती.त्यानीच मला ती आठवण करून दिली. तळ्याच्या कडे कडेने चालत चालत आम्ही एका नव्या विषयावर चर्चा करायला सुरवात केली.
मी प्रि.वैद्याना म्हणालो,
“माणूस सुखी असतो का?”
मला ह्या विषयावर जरा निराळंच विवरण करायचं आहे.मला असं वाटतं की माणूस सुखी असतो.ह्यात निराळेपणा एव्हडाच की जो सुखी असतो तो क्वचितच मी सुखी आहे असं सांगतो.जो सुखी नसतो तो माणूस नेहमी अभिव्यक्तिशील असतो.तो आपल्या विचारचं आदान-प्रदान करीत असतो.असा माणूस जग कसं चुकतंय हे सांगायला उत्सुक्त असतो आणि बरेच श्रोते जमवायला त्याच्याकडे चांगलीच कला असते.ही एक आधुनिक शोकांतीका आहे की नैराश्येला अनेक प्रवक्ते असतात आणि आशेला अगदीच कमी.
म्हणून मला वाटतं की आपण सुखी आहे असं माणसाने जाहिर करीत असावं.अशाप्रकारचं म्हणणं जरी निराशावाद्यांपेक्षा कमी प्रभावशाली आणि कमी मनोरंजकअसलं तरी जाहिर करावं.”

माझं हे विवरण ऐकून प्रि.वैद्य विचारात पडल्यासारखे दिसले.आणि म्हणाले,
“मी सुखी आहे असं का म्हणावं बरं?तसं पाहिलंत तर मी ज्यांच्यावर प्रेम करीत होतो त्यांना मृत्युने माझ्यापासून वंचित केलं.माझ्या घोर प्रयत्नांचा दारूण अपयशाने पिच्छा पुरवला.लोकानी माझा आशाभंग केला.मी पण त्यांचा आशाभंग केला.आणि मी माझ्या स्वतःचा आशाभंग केला.मी आंतर्राष्ट्रीय उन्मादाच्या दबावाखाली आहे हे मला माहित आहे. हे असले काळेकुट्ट ढग पुढे कधीतरी फुटून अणुबॉम्बच्या वर्षावाखाली लाखो लोकांचं आयुष्य रसातळाला जाणार आहे. आणि मी ही त्यातला एक असणार.
ह्या सर्व साक्षीवरून मी मुळीच सुखी नाही अशी जबर वस्तुस्थिती स्थापित करूं शकत नाही काय? “

माझ्या पुर्वीच्या प्रश्नाला वैद्यांनी आव्हान दिल्यासारखं होतं.मी पण ते आव्हान स्वीकारून म्हणालो,
“हो, मी स्थापित करूं शकेन पण ते एक चुकीचं चित्र तयार होईल.ते इतकं चुकीचं होईल की जणू पडझड झालेल्या पानाच्या झाडाकडे बघून झाड नेहमीच असंच दिसतं असं म्हटल्यासारखं होईल.
मी ज्यांच्यावर प्रेम करतो आणि जे मेले नाहीत अशा लोकांची यादी करून ठेवल्यासारखी होईल.
माझ्या अनेक अपयाशामधे काही उभारून आलेल्या यशाची स्वीकृति दिल्यासारखी होईल.
मला निरोगी प्रकृतीचं वरदान असल्यानेच मी उन्हापावसात भटकू शकतो असं दाखवून दिल्यासारखं होईल.
माणसाच्या अंगात असलेल्या चांगुलपणामुळेच तो सरतेशेवटी बुराईच्या लढाईत यशस्वी होऊं शकतो ह्या माझ्या श्रद्धेला धक्का बसल्यासारखं होईल.”
मला उत्तर द्यायला प्रि.वैद्य म्हणाले,
“हे सर्व प्रत्येकाच्या जीवनातले तेव्हडेच हिस्से आहेत जेवढी चिंतेची सावटं पण त्यांच्या जीवनात आहेत.मला वाटतं चांगल्या- वाईटातल्या संघर्षाचा शेवटी एका गाढ्या पेचात विलय होतो.”
मी म्हणालो,
“वैद्यसाहेब,तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल न व्हाल.खरं सांगायचं तर, कुणीही सद्गुण आणि सौंदर्याला,यश आणि हशीखूशीला वेगळं करू शकत नाही,तसंच कुरूपता आणि दुराचरण किंवा अपयश आणि अश्रुपूर्णतेच्या संपर्कात कुणालाही कुणी ठेवू शकत नाही. जो माणूस असल्या असंयुक्तिक आनंदासाठी परिश्रम घेतो तो तोंडघशी पडण्याच्या प्रयत्नात आहे असं समजावं.तो असंयुक्तिक अंधकारात गुंफला जाणार असं समजावं.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो.?”

“मला वाटत नाही की कुणी ही जीवनातल्या त्रुटि स्वीकारल्या शिवाय ह्या जगात आनंदाने राहिल.
त्याला माहित असावं लागेल आणि स्वीकारावही लागेल की त्याच्यात त्रुटि आहेत,इतरात त्रुटि आहेत आणि ह्या त्रुटिकडून त्याच्या आशाआकांक्षां उद्वहस्त व्हाव्यात असा त्याने विचार करावा हे पोरकटपणाचं होईल.”
असं वैद्यांच म्हणून झाल्यावर तेच म्हणाले आपण जवळच्या एका बाकावर जरा आराम करायला बसूंया.तेव्हड्यात प्रो.देसाई लगबगीने येताना दिसले. मी भाऊसाहेबाना आमच्या चर्चेचं थोडक्यात वर्णन करून सांगितलं.प्रोफेसरच ते.
आम्हा दोघांना म्हणाले,
“ह्या त्रुटिवर मी एखादं उदाहरण देऊन सांगू का?
निसर्गाचंच घ्या.माणसापेक्षा तो प्राचिन आहे.आणि निसर्ग परिपूर्ण नाही.अगदी ठराविक तारखेला त्याचा ऋतु बदलत नाही. निसर्गातले किडे-मकोडे आणि इतर किटक निसर्गाच्या उद्देशाच्या,इराद्याच्या, पलिकडे जाऊन वागतात.निसर्गाने सुशोभित केलेल्या खेड्यापाड्यातल्या पानाफुलांना आणि अंकूराना हडप करतात.जमिनीला खूपच कोरडेपणा आल्यानंतर पावसाच्या सरी येतात. आणि कधीकधी हा पाऊस इतका प्रचंड असतो की सुबत्ता होण्याऐवजी नुकसानी होते.
परंतु,वर्षानुवर्षे निसर्गाच्या ह्या त्रुटितून आणि चुकातूनही चमत्कार होतच असतात.”

“वाः काय मस्त उदाहरण दिलंत तुम्ही भाऊसाहेब.मला तुमच्याकडून त्याची अपेक्षा होती.”
आता इथेच बसलो तर बराच काळोख होईल.त्यापेक्षा निघावं म्हणून आणि माझं घर उलट्या दिशेला असल्याने,चर्चेचा समारोप करताना मी म्हणालो,

“मला वाटतं एखादा चांगलं करण्याची कोशिशी करीत असताना,चांगलं करण्याच्या कोशिशीपेक्षा आपल्यात असलेल्या त्रुटिच्या मार्गाने जाऊन,चुका करून, ह्या विस्मयकारी, उत्तेजीत करणार्‍या,सुंदर अशा जीवनाच्या तूफानातून स्वतःची सुटका मरणाच्या दिवसापर्यंत करीत राहिल्यास त्याची ती नादानी ठरेल.”
परत भेटूं असं म्हणत आम्ही जायला उठलो.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com