Wednesday, August 5, 2009

वेदना.

माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपना बाझारमधे जाऊन येते.
मी शुभदाला म्हणालो,
“वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही.
जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो.”

जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.
मी तिला म्हणालो,
“लोक नव्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ते शिकतात. पण काही वेदनेचे अनुभव जीव मोडकळीला येई पर्यंत विवश करतात. परंतु ह्या वेदना- भले त्याचा काहीही निष्कर्ष येवो- त्या व्यक्तिला संपूर्ण बदलूनही टाकतात. “
हे माझं बोलणं ऐकून झाल्यावर, शुभदा कसलातरी विचार करताना दिसली.पण लगेच मला म्हणाली,
“काका,तुम्ही असं बोलून माझी जूनी आठवण ताजी केलीत.
मला आठवतं दोन वर्षापूर्वी मी आणि माझी आई देवळात गेलो होतो.भटजी आम्हाला म्हणाले की एका- आम्हाला परिचय असलेल्या- मुलीला देवाज्ञा झाली असं आजच त्यांना कळलं.त्या मुलीला आमच्याबरोबर देवळात येताना त्या भटजीने बरेच वेळा पाहिलं होतं. अलीकडे ती आम्हाला भेटली नव्हती.बातमी ऐकून माझी छाती सहाजीक धडधडायला लागली.समय हळू हळू चाललाय असं वाटूं लागलं.त्या मुलीचं नांव ऐकून माझे कान बधीर झाले.माझ्या आईचे डोळे पाणावले.
ती मुलगी माझ्या थोरल्या बहिणीची मैत्रीण होती.हे असं कसं झालं ह्याच्या कित्येक दिवस मी विचारात होते.पूर्वी कधीतरी मला आठवतं एकदा एका प्रवचनात मी ऐकलं होतं की माणसं रडतात ते माणूस गेल्याने रडत नाहीत तर ते माणूस पुन्हा आपल्याला दिसणार नाही म्हणून रडत असतात.
ती मुलगी आशावादी होती,खेळकर होती,दयाशील होती,सच्ची होती.एव्हडंच नाहीतर ती भेटल्यावर दिवस प्रसन्न जायचा.तिचं हंसणं एक प्रकारचं सांसर्गीकहोतं.आम्ही ही तिच्याबरोबर हंसायचो.आणि जेव्हा ती हंसत नसायची तेव्हा समजावं पुन्हा हंसण्यापूर्वीचा तो तिचा थोडासा विलंब होता.तिची आठवण काढणारेफक्त तिच्या मृत्युबद्दलच विचार करीत हे पाहून मी खूपच दुःखी व्हायची.”

मी म्हणालो,
“शुभदा,मला आठवली ती मुलगी.तुझ्या थोरल्या बहिणीबरोबर हंसत हंसत रस्त्यावरून जाताना बरेच वेळा मी आमच्या बालकनीतून तिला पाहिली आहे.तू तिचं वर्णन केलस ते अगदी बरोबर असावं.ही बातमी ऐकून मला पण खूप वाईट वाटलं.”
शुभदालाही खूप वाईट वाटल्याचं मला जाणवलं.कारण ती म्हणते कशी,
” कधी कधी लोकांशी जवळीक करताना हे पूर्व संचित कुणाच्याही लक्षात येत नाही. असंच चालणार असं जो तो गृहित धरून चालतो.आणि शेवटी अश्या तर्‍हेने त्याचं वेदनेत रूपांतर होतं.हे झालं जवळीक करण्याच्या बाबतीत.पण काही वेळा लोकांशी जवळीक करताना आणि त्याबरोबर एखादी जोखिम घेताना त्याचा परिणाम ही वेदनेत होतो.
काका,तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं दिसतं.ऐकते मी.”

“बालपणातल्या वेदना मामुली वेदना असायच्या.जरा आपल्या बालपणात जाऊन डोकावून पाहिल्यास दिसेल जर का आपण काही अविचारपणे केलं आणि जखम झाली,काहीतरी गंमत करताना असं काही अचानक झालं,आणि इजा झाली तर त्या वेदना तात्पुरत्या असायच्या,त्याचा व्रण दिसायचा.आणि तो व्रण कायम राहायचा.”
शुभदाचा त्या घटनेची आठवण येऊन झालेला विरस पाहून मी विषयांतर करण्यासाठी लहानपणांचा अनुभव सांगून तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो.

पण तिला आणखी काहीतरी सांगायचं होतं.ती म्हणाली,
“मृत्यु ही आकस्मिक दुर्घटना आहे.पण त्या मृत्युच्या पश्चात, व्रण आणि त्याची स्मृती आपल्याबरोबर कायम असते.
ह्या झालेल्या व्रणांना स्मृतीच्या वेदना असं समजून त्या वेदनाकडे पाहिलं जातं. पण मला वाटतं असं वाटून घेऊं नये.ज्यामुळे तो व्रण झाला त्या घटनेची स्मृती असायला हवी. आपल्या आयुष्यात लोक येतात, आपल्याला हवे तेव्हड्या काळासाठी ते आपल्याबरोबर नसतात.अश्या वेळी त्यांनी आपल्याला काय दिलं ह्याचा बहूमान व्ह्यायला हवा.ते सोडून गेले ह्याचा कायमचा आपल्याला विलाप होवूं नये असं मला वाटतं.”
तेव्हड्यात शुभदाची आई अपनाबाजार मधून खरेदी करून आली आणि आमचा विषय तिथेच थांबला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com