Friday, August 7, 2009

संगीतप्रेमी विरेन

“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.”

कुणी तरी म्हटलंय,
“जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं.”
हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे. संगीता शिवाय हे जग काळंकूट्ट झालं असतं.नीरस वाटलं असतं.संगीतातून शिकायला मिळतं, प्रोत्साहित व्हायला होतं,संगीत जोडतं,प्रेरित करतं.”

“किती रे,एखाद्या पंडितासारखा बोलतोस?”
असं मी विरेनला उद्देशून म्हणालो.त्याचे वरचे उद्गार ऐकून माझ्या मनात आलं की सामंतगुरूजींचा हा मुलगा नुसतंच त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालत नाही तर आणखी काहीतरी शिकला आहे.
त्याचं असं झालं,सामंतगुरूजीनी जेव्हा गाण्याचे क्लासिस काढले त्यावेळी विरेनचा जन्मसुद्धा झाला नव्हता.सामंतगुरूजी आता बरेच थकले आहेत. त्यांना आता क्लासात जाणं जिकीरीचं झालं आहे.
विरेन त्यांच्या तालमित संगीत शिकून तयार झाला होता.काही वेळा तो महाराष्ट्रात दौरे पण काढायचा. अजूनही काढतो.
माझ्या एका मित्राच्या मुलीला त्याच्या क्लासात संगीत शिकायला जायचं होतं.त्यासाठी भेटायला म्हणून मी विरेनच्या घरी गेलो होतो.

मी त्याला म्हणालो,
“संगीत ही विश्वाची भाषा आहे ते हृदयस्पर्शी आहे.संगीताला स्वतःची अशी भाषा नाही,ते फक्त प्रेमाची भाषा जाणतं.”
माझं हे बोलणं ऐकून मी जणू विरेनला आणखी बोलायला ट्रिगरच दिली.नव्हेतर मला त्याच्याकडून आणखी ऐकायची हुक्कीच आली होती.छान बोलतो तो.
मला विरेन म्हणाला,
“काका,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला. प्रत्येक व्यक्ति ती संगीताची भाषा समजते. कुठल्याही भाषेतलं नाटक अथवा चित्रपट असो,त्यातलं संगीत ऐकून कोणही आनंदाने मान डोलवतो.संगीताने एकमेकचा दुवा सांधला जातो.सर्व संगीतप्रेमीना एक गोष्ट मान्य असते ती ही की सर्वाना एकत्रीत करण्याची संगीतात क्षमता आहे. विभिन्न लोकाना एकत्रीत करून संगीत त्यांना आपल्या क्षमतेत सामाविष्ट करून घेतं.

मला वाटतं,संगीत आपले सर्व मनोभाव,आवेश जागृत करतं.संगीतातली वेगळी वेगळी शैली वेगळी उमंग आणते.आवेश आणि संवेदना शिवाय जीवन खूपच कंटाळवाणं झालं असतं. संगीत हृदयातले घाव भरू शकतं,मनात बदलाव आणू शकतं आणि जीव मोकळा करूं शकतं. एखाद्याच्या गौरवाचे दिवस आठवून देऊ शकतं.”
विरेनबरोबर चर्चेला बराच रंग चढला होता.मी त्याला म्हणालो,
“मला एखादं उदाहरण देऊन सांगितलंस तर बरं वाटेल.”

जरा विचारात पडून मला विरेन म्हणाला,
“समजा एखाद्या शाळेच्या मैदानकडून जाताना बॅन्ड वाजवीत शाळेतली मुलं कवायीत करीत असताना पाहून एखद्या सैनिकाला त्याच्या तरूणपणातले गौरवाचे दिवस आठवून त्याच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण करायला ते बॅन्डचं संगीत कारणीभूत होतं.एखादा ऑर्केस्ट्रा ऐकून आपल्या जुन्या आठवणी येऊन संगीत डोळ्यात पाणी आणूं शकतं. अंथरूणावर निपचित पडलेल्या एखाद्या रुग्णाला सुंदर गोड गळ्यातलं गाणं ऐकून संगीत त्याला उत्साहित करूं शकतं. “
हे त्याचं उदाहरण ऐकून मला कोकणातली आठवण आली.मी त्याला म्हणालो,
“तुझं हे उदाहरण ऐकून माझं मन कोकणात गेलं.कारण कोकणातला निसर्ग रमणीय आहे.आणि तो रमणीय होण्याचं एक कारण संगीत आहे.”
माझं हे म्हणणं ऐकल्यावर विरेन आपला अनुभव सांगण्यासाठी मला मधेच अडवीत हात करून म्हणाला,
“काका,ह्या उन्हाळात वेळ काढून मी आणि माझा एक मित्र अलीकडे कोकणात गेलो होतो. वेंगुर्ल्याहून खानोलीला हायकिंग करीत-घाटी चढत- गेलो होतो.खानोलीचा फेसाळ समुद्र पाहून आणि अजुबाजूच्या डोंगरावरचं रान पाहून मला संगीताची आठवण आली.
निसर्ग म्हणजेच संगीत आहे.निसर्ग संगीताने परिपूर्ण भरला आहे.झाड्यांच्या पानांची सळसळ,मधुमाशांचं गुणगुणणं,भिणभीणत्या पहाटे समुद्राच्या लाटांचं किनार्‍यावर वाळूत कोसळून झालेला तोच तोच आवाज,निरनीराळ्या पक्षांचं गान,भर उन्हाळ्यात जंगलात लागलेल्या आगीचा चटचट होणारा आवाज,आणि फांद्या मोडून खाली पडणार्‍या झाडांचा कोसळतानाचा आवाज,असे एक ना अनेक न संपणार्‍या यादीत लिहून ठेवणारं निसर्गाचं संगीत वाजतच असतं.हे संगीत -किंवा त्याला आवाज हवं तर तुम्ही म्हणा- परिसरातल्या वातावरणात मनोभावांची भर घालतात.”

मलाही ह्या विरेनच्या निसर्गाच्या संगीताच्या वर्णनावरून एक सांगावं असं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“विरेन, तू जे आता कोकणातल्या डोंगरातल्या परिसरातलं वातावरण आणि समुद्राचा आवाज ह्याचा निसर्गाचं संगीत म्हणून उल्लेख केलास,आणि जरी संगीत वेळोवेळी बदलत असलं तरी संगीत कालातीत आहे.संगीत हे एक अभिव्यक्त करण्याचं साधन आहे,वाणी आहे. गाण्यातून राजनितीक निवेदन करता येतं,मदतीची हांक देता येते,संगीत त्यामुळे राजकीय वातावरणात बदलाव आणण्याचं निमित्त होऊ शकतं. ह्या जगात बरेच “मौन” लोक आहेत आणि त्यांचा आवाज ऐकला जात नाही.त्यांच्या गार्‍हाण्यांकडे कान दिला जात नाही.ते उपेक्षीत राहतात,बाजूला ढकलले जातात,किंवा त्यांची काळजी घेतली जात नसावी.मला वाटतं अश्या लोकाना संगीताच्या सह्याने ऐकलं जात असावं.”

विरेन म्हणाला,
“मला ह्या तुमच्या विचारावरून एक गोष्ट आठवली.उदाहरण म्हणून सांगतो,एखादा दोन दिवसाचा भुकेलेला रस्त्यावर बसला आहे आणि बाजाची पेटी हीच त्याची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत त्याचे फाटके कपडे आणि दाढीचे खूंट चेहर्‍यावर बघून कुणीही त्याच्याशी ढुंकून बोलणार नाही.
समजा त्याने त्या बाजाच्या पेटीवर एखादं मधूर गाणं वाजवायला सुरवात केली की त्याच्या भोवती घोळका होईल.काही पैसे देतील.काही त्याच्याकडे ध्यान देऊन बघतील.तो सहाजीकच संगीताचा उपकृत होईल.म्हणून म्हणतो,
संगीत हा एक सुटकारा आहे.नेहमीच्या तनावपूर्ण जीवनापासून दूर राहण्याचा तो एक सुटकारा आहे.
संगीत हे जणू आत्म्याला संदेशासारखं आहे.
कुणीतरी महान संगीतकाराने म्हटलंय,
“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.”

विरेनबरोबर संगीतावरची चर्चा ऐकून मी माझ्या त्या मित्राच्या मुलीचे मनात धन्यवाद मानले.तिचं निमीत्त करून मी ह्या संगीत पंडीताला भेटायला आलो होतो पण कुठचंही वाद्य न वाजवता आणि न ऐकवता संगीताच्या महतीचे विरेन कडून धडे शिकलो.
म्हणून जाता जाता विरेनला म्हणालो,
“अरे,ती मुलगी तुझ्याकडे संगीत शिकायला येईल तिला तुझ्याकडून शिकलेले संगीताच्या महतीचे धडे मी शिकवीन.पण तू मात्र तिला कसं वाद्य वाजवायचं आणि कसं गायचं हे शिकव.”
“म्हणजे काय काका?”
असा प्रश्न विचारत माझ्या जवळ येऊन विरेन मला कडकडून भेटला.
बोलून चालून संगीतप्रेमी विरेन होता तो.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com