Tuesday, August 11, 2009

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

“मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.”

फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला. समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून खोल्या बनवतात.बाहेर उन खूप असलं तरी झोपडीच्या आत एकदम थंड वाटतं.
झोपडीच्या आजूबाजूला बांबूंची तिरकांडी उभी करून एकपदरी सुंभाच्या दोर्‍या बांधून पिळाच्या चिमटीत बांगडे,तारल्या किंवा कोलंबी अडकवून कडकडीत उन्हात सुकायला ठेवतात. त्याचे सुके बांगडे,सुक्या तारल्या किंवा सुकी सुंगटं तयार होतात.कोकणात समुद्रात बोंबील आणि पापलेटं औषधाला सुद्धा मिळणार नाहीत.बोबंलासारखा एखादा गिळगीळीत मासा जाळ्यात आला तर मास्यांची निवड होत असताना त्याला वाळूत फेकून देतात. त्यामुळे मुंबईला वेसाव्याला दिसतात तसे इकडे सुके बोंबील कदापी नाहीत.
सुका बांगडा चूलीत भाजायला टाकून कोकणात लोक जेवायला बसतात.त्याच्या वासावरच भूक लागून अर्ध जेवण होतं.मग कांटा काढून तो बांगडा सोलून खोबर्‍याच्या तेलात फासून ताटात वाढल्यावर उरलेलं अर्ध जेवण होतं.

फस्कूच्या घरी गेलो तेव्हा तो काही घरी नव्हता.म्हणजे मग त्याला शोधून काढायचं दूसरं ठिकाण म्हणजे किनारा.किनार्‍यावर गेल्यावर सगळेच कोळी लांबून सारखेच दिसतात.वरून उघडे बंब,खाली त्रिकोणी लंगोटी.पार्श्व भाग पुरा उघडा.गळ्यात जड सोन्याची चेन,आणि तोंडात पानाचा तोबरा.ही सर्वांचीच रहाण्याची स्टाईल असते.मला पाहून फास्कू खूप आनंदला.
“काय बामणा खूप दिसानी आठवण काढून इलंस?”
असं म्हणून त्याने माझं स्वागत केलं.
“चल घरा जांवया.इल्ली इल्ली काजूची मारूंया.आणि गप्पा करूंया.”

मला हंसताना पाहून म्हणतो.
“हंसतंस कित्याक?हल्ली बामण सुद्धा इटांबलेत.माशे मटाण आणि घुटूं घेतल्या शिवाय तेंची उंडी नाकाच्यावर जाऊंची नाय.”
“अरे फास्कू मी सोवळा ब्राम्हण आहे रे.अजून मी विटंबलो नाही.फॉरेनला असलो तरी वरण भात तूप आणि लिंबाची फोड हवीच.”
घरच्या वाटेवर असतानाचे हे संवाद चालले होते.फास्कू माझ्याबरोबर कॉलेजात होता.घरचा श्रीमंत म्हणून त्याच्या वडलानी त्याला खूप शिक म्हणून मुंबईला पाठवलं होतं.शिक्षण पुरं झाल्यावर नोकरी करण्याची त्याला जरूरी नव्हती.परत आपल्या वाडवडीलांच्या व्यवसायात जावंस वाटतं अस मला बरेच वेळा म्हणायचा.
काजूची मारून झाल्यावर फास्कू रंगात आला.जेवायला अजून दोन तास होते.फास्कूला चमत्कार,अद्भूत प्रकार असल्या विषयावर लय दिलचस्पी.
मीच विषय काढून त्याला म्हणालो,
“फास्कू अद्भुत प्रकारावर तुझा विश्वास आहे का रे?”
“आता ह्या सांगताना तुझ्याशी मालवणीत बोलून चलूचा नाय.” इती फास्कू.
मला म्हणाला,
“काही अद्भुत प्रकार होणं ह्यावर माझा विश्वास आहे.मग तो अद्भुत प्रकार निसर्गात होवो अथवा आपल्या आयुष्यात होवो.
माझ्या आतापर्यंतच्या जीवनात मी अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.पण सर्वात अद्भुत गोष्टी माझ्या जवळच्या परिसरात झाल्या आहेत.अलीकडे माझ्या समुद्रकिनार्‍याच्या वातावरणात जिथे मी आता कायमचा असतो त्याबद्दल मी म्हणतो.”
उन्हाळ्यात ह्या किनारपट्टीवर मासे पकडणारे कोळी गर्दी करून असतात.त्यांचे पडाव, खपाटे. त्यांची जाळी आणि होड्या.त्या मोठमोठाल्या मासे घेऊन जाण्यासाठीच्या बांबूच्या टोपल्या.त्यांच्या रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या बायका. वाळूत थबकट मारून एकमेकाशी खेळण्यात गुंग होऊन गेलेली त्यांची उघडी नागडी पोरं.हे दृश्य बघून मजा येते.
दूरवर समुद्र जास्त खोल झालेला आहे तिथे मास्यांची रापण भर समुद्रात टाकून पकडलेले मासे जाळ्यातून टोपल्यात टाकण्याचं काम किनारा येईपर्यंत करीतकरीत येणार्‍या होड्या दिसतात.
मी फास्कूला म्हणालो,
“तुम्ही कोळी उन्हाळात अगदी बिझी असता आणि पावसाळ्यात काय करता रे?”
” एकदा पावसाळा चालू झाला की सर्व संपलं.ह्या सगळ्या होड्या आता माडांची झापं विणून बांधलेल्या आडोश्यात ठेवल्या जातात.आणि पावसाळा संपेपर्यंत आम्ही कोळी आराम करतो. काही जण जाळी विणतात कधी कधी काही लोक पोट भरण्यासाठी इतर व्यवसाय करतात.”
मी फस्कूला म्हणालो,
“पावसाळ्यात समुद्रकिनार्‍यावर जायला मला विशेष मजा येते. पावसाळ्यात किनार्‍यावर मासे सापडत नसल्याने बरेच़से पक्षी कुठेतरी किनार्‍यावर येऊन झाडावर किडे मकोडे खाऊन रहातात.पण काही रानटी पक्षी भर पावसात खवळत्या समुद्राच्या पाण्यावर तरंगणार्‍या लहान मोठ्या मास्यांवर गुजराण करतात.
“जीवो जीवस्य जीवनम” ह्या उक्तिनुसार हे मोठमोठे कर्कश आवाज करणारे पक्षी, दिसला मासा का एखाद्या बाणासारखे तीर मारून त्या मास्याला चोचीत धरून उंच आकाशात भरारी मारताना आणि चोचीतला तो मासा जीव वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा करून त्याच्या चोचीतून निसटण्यासाठी करीत असलेली धडपड करताना पाहून कुणाची कीव करावी जीव जाणार्‍या मास्याची की भुकेने व्याकूळ झालेल्या पक्षाची हेच कळत नाही. भर पावसात किनार्‍यावर येऊन हे दृश्य बघायला मला खूप आवडतं.”
हे वर्णन ऐकून फास्कू खूश झाला.मला म्हणाला,
“तुम्ही शिकलेले बामण साहित्यात बोलता.हे तू वर्णन केललं दृश्य आम्ही नेहमीच पाहतो. पण असं आम्हाला समजावून सांगता येत नाही.खरंच पावसाळ्यातला सीन तू उभा केलास.”
मी म्हणालो,
“फास्कू,उगाचच हंबल होऊन बोलू नकोस.तू बामणाला मागे टाकशील, एव्हडं ज्ञान पाजळशील. आता तू आपला ह्या व्यवसायात पडून वेळ घालवतोस पण आपण कॉलेजात होतो त्यावेळी तू वकतृत्व स्पर्धेत वरचा नंबर घ्यायचास. सांग,सांग मला तुझे अद्भुततेबद्दलचे विचार ऐकायचे आहेत.”
काजूची जरा उतरली असं दिसलं.आता मुडमधे येऊन पास्कल म्हणाला,
ह्या अद्भुततेतूनच जगाचं संरक्षण होत असतं असं मला वाटतं. अद्भुतता ही नेहमी उजाड, निर्जन वनप्रांतातच होत असते असं लोक चुकून मानतात. ऍमॅझॉनच्या खोर्‍यात किंवा एव्हरेस्टवर कसलेही बंधन नसलेली अद्भुतता असते.पण मला वाटते ती अद्भुतता कुठेही होऊ शकते.ती जंगलातही दिसेल किंवा घराच्या मागच्या परिसरातही दिसेल.ही अद्भुतता फक्त जागेशी निगडीत नसते.ही अद्भुतता एक संवेदना आहे.कुणाची ज्यावेळी कमीत कमी अपेक्षा असते त्याच वेळी हिचा उदय होतो.”
“तुला ह्या अद्भुततेचा खरा अनुभव आला आहे का?”
असं मी विचारल्यावर म्हणाला,
“तेच तर तुला मला सांगायचं आहे.तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस.
माझ्या कुटूंबात माझ्या जीवनातल्या दोन अद्भुत गोष्टी झालेल्या मी अनुभवल्या आहेत.
माझे आजोबा दिवंगत होताना त्यांचे हात मी माझ्या हातात घेऊन राहिलो असतानाचा तो अनुभव.मी त्यांचे शेवटचे श्वास ऐकले आहेत.ते श्वास खूप जड होते आणि मी त्यांचा हात एव्हडा गच्च धरला होता की त्यांच्या हृदयाचे शेवटचे ठोके मला भासत होते.
त्या दिवशी माझ्यात काहीतरी उचंबळून आलं.कहीतरी खोल खोल, पाश्वीक, अनपेक्षीत, काहीतरी जे मी कधीच अनुभवलं नव्हतं असं,आणि नंतर सहा वर्षानंतर तसंच अनुभवलं जेव्हा मला मुलगी झाली.
ह्या मुलीच्या जन्मापूर्वी बर्‍याच लोकानी मला चेतावणी दिली होती.माझ्या जीवनात काहीतरी फरक होणार आहे.त्या म्हणण्याचा आशय असा की माझं जीवन आजोबा गेल्याने नीरस होणार. पण जे घडलं त्यात कहीही नीरसपणा नव्हता.माझ्या चिमुकल्या मुलीचं जन्मणं,आणि जीवनाच्या उत्पतिचं ते अद्भुत रुदन कानात पडणं आणि त्या चिमुकल्या बाळाचे चिमुकले हात डोक्याकडे वर उंचावले जाऊन जणू जीत झाल्याचं प्रदर्शन पहाणं. ही घटना होता होता मी एक तीव्र प्रवाहाचा आवेश अनुभवला.

खरंच तो एक शारिरीक अनुभव होता त्यात गुदगुदल्या होत्या,सर्वांगावर कांटा आला होता. पण त्यात आणखी काहीतरी होतं.एक अद्भुत झोत होती. हानी नंतरहोणार्‍या लाभाचा तो प्रकार होता.
मला वाटतं जीवन मरणाच्या ह्या घटना आपल्या मौलिक स्वत्वाशी दुवा ठेवतात.आठवण करून देतात की रोजच काहीतरी अद्भुत होण्यासाठी छपून राहिलेलं असतं.आणि ते होऊन गेल्यावर आपण आपल्या सामान्य जीवनाकडे परततो पण बदलाव होऊन आणि आवेशात येऊन परततो.”
फास्कूचा हा अनुभव ऐकून मी त्याला म्हणालो,
“लोक अद्भुत गोष्टी पाहायला जगाची सफर करतात.रोजच्या जीवनात असं काही दिसणार नाही.निसर्गाकडूनच त्याच्या अपेक्षा असल्याने ते निसर्गाच्या सानिध्यात जायला कष्ट घेतात.जे त्याना त्यातून आकलन होतं ते पुस्तकात लिहीतात.तुला तर समुद्रकिनारी राहून हे सर्व आकलन झालं आहे.”
“फास्कू भुसांक तयार आसां,चला आता उठां”
फास्कूच्या आईने जेवण तयार आहे असं सांगीतलं.

“जरी मी ह्या अद्भुत जागांच्या शोधात राहिलो तरी मला माहित आहे,मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.
ह्या इथे जीथे माझा आवडता समुद्रकिनारा आहे,जीथे मी सुरवातीला माझ्या आईचा हात हातात घेऊन चाललो,आणि नंतर जीथे माझ्या आजोबांच्या अस्थी सोडल्या त्या तीथे माझ्या घराच्या जवळच्या ह्या अद्भुत घटना आहेत.”
फास्कू हे सगळं गंभीर होऊन बोलत होता.
आणि आता ह्याच समुद्रकिनार्‍यावर मी रोज माझ्या मुलीचा हात धरून इथे फिरायला येतो, मनात गुपचुप आशा करतो की माझी मुलगी जेव्हा आता माझ्यासारखी कमीतकमी अपेक्षा करीत असेल तेव्हा तिच्याही आयुष्यात त्या अद्भुत घटना आपणच वर उठून येतील.”
फास्कूच्या आईने केलेली कोलंबीची आमटी,आणि तळलेले बांगडे खाण्यासाठी पोटात कावळे कांव कांव करीत होते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com