Wednesday, February 3, 2010

अरूण आणि अरूणची आजी.

अरूणचा आपल्या आजीवर खूप जीव होता.तो आईपेक्षा आजीच्याच मांडीवर वाढला.लहानपणी झोपण्यापूर्वी आजीकडून एक तरी गोष्ट ऐकून घेतल्या शिवाय त्याला झोपच येत नसायची. तो चालायला लागल्यावर आजी त्याला आजुबाजूच्या परिसरात त्याचा हात धरून फिरायला न्यायची.जेव्हा आजी खूपच वयस्कर झाली तेव्हा त्याने आजीजवळ येऊन राहायचं ठरवलं.आजी जाईपर्यंत त्याने तीची सेवा केली.संध्याकाळ झाली की तीला तो उचलून
आणून पडवीत बसवायचा.वार्धक्यामुळे ती झोपेतच असायची.ते अरूणला समजायचं.
“माझी मला राहूं दे-लिव्ह मी अलोन-”
अशी तीची अवस्था झाली आहे ते त्याला कळायचं.पण तीचा जीव टिकण्यासाठी लागणार्‍या सर्व जरूरींची तो देखभाल करायचा.आजी गेल्यानंतर अरूण खूपच एकटा झाला.त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला हमखास आजीकडून मिळायची.आजीच्या निधनानंतर प्रश्नांची उत्तरं त्याची त्यालाच शोधून काढावी लागायची.
मी अलीकडे जेव्हा त्याला भेटलो तेव्हा सुद्धा तो आजीचाच विषय काढून मला जीवन मुल्यांचं तत्व सांगत होता.

“जेव्हा मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पहातो आणि आतापर्यंत मिळालेल्या अनुभवातून कसली जीवन-मुल्य मी साधली ह्याबद्दल विचार करतो त्यावेळी,जसं एखादं जूनं चित्र आपण पहातो तसंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.त्या चित्राचा पृष्ठ भाग श्रावण महिन्यातला एखाद्या सोनेरी दिवसा सारखा आहे,एक चार वर्षाचा मुलगा-बहुतेक मीच तो मुलगा-आजीबरोबर पायवाटेवरून चालला आहे,आणि रस्त्याच्या कडेला उगवलेल्या पिवळ्या रानफुलांकडे तो निरखून बघत आहे.
आजीने माझा एक हात धरला आहे.आणि माझा नेहमीच्या खेळण्यातला चेंडू माझ्या दुसर्‍या हातात आहे.आमच्या मागोमाग आमची सफेद रंगाची लहानशीच मनीमाऊ एका गळून पडलेल्या सुक्या पानाशी ते वार्‍याने सरकत पुढे जात असताना त्याचा पाठलाग करीत आहे,शेजार्‍यांचा दानगट कुत्रा मनीला पाहून भुंकत आहे आणि ते ऐकून पळून जाणार्‍या मनीचा पाठलाग करून तीला बाजूला पाडून आपल्या मागच्या दोन पायावर उभा राहून मला चेंडू फेकायला विनवणी करीत आहे.
ते मांजराचं पिल्लू हालचाल करीत नाही.अगदी निपचीत पडलं आहे.मी घाबराघुबरा होऊन सुद्धा माऊकडे पहात आहे.मोठी माणसं जो भयंकर शब्द वापरतात “मृत्यु” तो तीला आला होता.

काही तासानंतर पाऊस पडायला लागला. आजी आणि मी त्या पावसाचे थेंब आणि पडणार्‍या पावळ्या पहात आहो.
“आजी! मरण म्हणजे गं काय?”
मी आजीला विचारलं.
आजी मान हलवीत सांगते
“बाळा मला खरंच काय ते माहित नाही रे! मी आयुष्यभर ते काय आहे ते समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.अजून काहीही समजू शकले नाही.एव्हडंच मला माहित आहे जसं जगणं आहे तसंच मृत्यु हा एक जीवनाचाच भाग आहे.जे जीवीत आहे त्या सगळ्याला ते लागू आहे.
तुझ्या मनीमाऊने ज्याचा पाठलाग केला होता ते पान पण मृत्यु पावलं आणि तुझी मनी पण गेली.त्या पिवळ्या रानफूलाकडे बघ,गेल्यावर्षी ती मरण पावली होती.आणि आता तुला दिसताहेत त्या फुलांचीपण तीच गत होणार आहे.
मनी पुढच्या श्रावणात परत येईल काय? कदाचीत.”
आजीने श्वास घेत सगळं सांगीतलं.
” “कदाचीत!”.मला नाही वाटत.काही ही म्हण.”
मी आजीला म्हणालो.”

हे अरूणकडून ऐकून घेतल्यावर मी त्याला म्हणालो,
“तुझ्या जीवनात तुझ्या आजीचा तुझ्यावर एव्हडा परिणाम झाला आहे की नेहमीच तू त्या चित्राकडे आणि आजीबरोबरच्या त्या संवादाकडे आकृष्ट झालेला दिसतोस.”

“सध्या तरी ह्याच माझ्या आयुष्यात जे मिळू शकेल ते मिळण्यासाठी मी व्यस्त आहे. माझ्या आयुष्यातल्या दिवसातून-कधी काळे कूट्ट दिवस तर कधी प्रखर दिवस- मी जसा मार्ग काढीत राहिलोय त्या मार्गकडूनच अशा विचारसरणीची आयोजना माझ्यात केली गेली आहे.आणि माझा त्यावर भरवंसा आहे.”
मला अरूणने लागलीच उत्तर दिलं.

मी म्हणालो,
“एखाद्याच्या आयुष्यभराच्या अवधित ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण झालं तर कदाचीत पुढच्या जन्मात ती उत्तर मिळावी अशी जीवनाची योजना असावी.कसं आणि कुठे हे सारं मिळू शकेल ते मला माहित नाही.”
मला अरूण म्हणाला,
“मला वाटतं जीवन सर्व मिळून,एकच प्रकारची,सतत वाढत जाणारी लयबद्द प्रक्रिया आहे.मला वाटतं जो तो स्वतःला अनुरूप करतो किंवा कुणाकडून केला जातो.तसंच जो तो स्वतःला विकसित करतो किंवा कुणाकडून केला जातो.
मी माझ्यात असलेल्या बुद्धिमत्तापूर्वक केलं की झालं,मग त्याचे परिणाम यशात किंवा अपयशात का होईनात.?”

“तुझ्याशी मी पूर्ण सहमत आहे.”
असं सांगून मी अरूणला म्हणालो,
“एखाद्या पोहणार्‍याचा जसा पाण्यावर विश्वास असतो तसाच तुझा तुझ्या जीवनावर विश्वास पाहिजे.मला वाटतं,निर्मिती ही सततची प्रक्रिया आहे.इथे आणि आत्ता असं मी म्हणतो.जे तू तुझ्या लहानपणी आजीकडून उत्तर मागू पहात होतास ते त्या चित्रातून तुला उघडपणे दिसत आलं आहे.ती पीवळी रानफुलं,ते सुकलेलं पान,ती तुझी मनीमाऊ.”
अरूणला माझं म्हणणं पटलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com