Tuesday, February 9, 2010

लाकडी जमीन.

“पुष्कळ वर्ष वापरून वापरून जुनाट झालेल्या लाकडी जमीनी विषयी मला विशेष वाटतं.”

बरेच वेळा एखाद्याच्या कुटूंबात दुर्दैवाने आनुवंशिकतेचं बरंच बंड माजलेलं असतं.शास्त्रिय कारण काहीही असूंदे त्याचे दुष्परीणाम कुटूंबातल्या काही लोकाना भोगावे लागतात.
सुनंदाच्या कुटूंबात अपंगत्व येण्याची परंपरा होती.तीच्या मावशीला पोलियो झाल्याने ती अपंग होती आणि सुनंदाला स्वतःला डाव्या हातापेक्षा उजवा हात काहीसा तोकडा असल्याने अपंगत्व आलं होतं.तशी सुनंदा दिसायला सुस्वरूप होती.चांगली शिकलेली पण होती.
पण तीने लग्न केलं नव्हतं.तीची मावशीसुद्धा अविवाहित होती.
सुनंदाला लग्नाच्या बर्‍याच ऑफर्स आल्या होत्या.पण तीने चक्क आपण मावशीसारखंच रहाणार म्हणून घरात सांगीतलं होतं.मी तीला एक चांगला मुलगा सुचवला होता.त्याचा एक डोळा दुसर्‍या डोळ्यापेक्षा जरा लहान होता. सुनंदाच्या अपंगात्वाबद्दल ज्यावेळी मी त्याला सांगीतलं त्यावेळी तो तीच्याशी लग्न करायला एका पायावर तयार झाला होता.पण सुनंदाच स्वतः तयार नव्हती.माझा नाइलाज झाला.
त्यानंतर बराच काळ निघून गेला.सुनंदाला मी अचानक एका औषधाच्या दुकानात भेटलो होतो.ती तीच्या गावात न मिळणारी काही औषधं न्यायला शहरात आली होती.मी तीला विचारलं,
“सुनंदा कशी आहेस तू?”
मला म्हणाली,
“आता मी बरीच सुखी आहे.मधे पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं.”
मी तीला माझ्या घरी घेऊन गेलो.ती एक दिवस माझ्या घरी राहिली.
खूप दिवसानंतर मी तीच्या कडून ऐकत होतो.

मला म्हणाली,
“तुम्ही माझ्या लग्नासाठी प्रयत्न केला होता.पण लग्न न करण्याचा माझ्या निर्णयाला मी चिकटून राहिले ते आता मला बरं वाटत आहे.
माझी मावशी मला नेहमी म्हणायची,
“स्त्री जन्माची कहाणी पुरूषाच्या जन्मापेक्षा बरीच निराळी असते”.
तीन वर्षापूर्वी माझ्या मावशीचं निधन झालं.माझ्या आईबाबांच्या पीढीत हा पहिलाच मृत्यु होता.माझी मावशी एकटीच होती.ती माझ्या बालपणातली माझी अनुकरणीय व्यक्ति होती.तीच्या सारखं मलाही लग्न करायचं नव्हतं.कुटूंब वाढवायचं नव्हतं.माझ्या मावशीला पोलियो झाला होता. ती एका पायाने अधू होती.त्या आजाराला पूर्वी पायातून वात गेला म्हणायचे.त्या अपंगपणाच्या व्याधीमुळे तीचा लग्न न करण्याचा उद्देश उघड होता.”

मी सुनंदाला म्हणालो,
“आपल्या समाजात स्त्रीयांना लग्न केल्यानंतर म्हणा किंवा लग्न केलं नसलं तरी आयुष्यात खूप समझोता करून घ्यावा लागतो.पुरूषांवर तेव्हडी परिस्थिती नसते.”
मला ती म्हणाली,
“माझ्या सारख्याना किंवा माझ्या मावशी सारख्यांना तर समझोत्याची फारच जरूरी भासते.माझी मावशी असेपर्यंत मला बराच धीर होता.तीच्याकडून मला नेहमीच सल्ला मिळायचा.
माझ्या मावशीच्या जाण्यानंतर माझ्या इतर नातेवाईकांबद्दल मी थोडी चिंतीत होते.तीच्या नंतर आता कोण हा माझा प्रश्न होता.कित्येक महिने मी उत्कंठा आणि करुणा तसंच थकावट आणि सुन्नता असल्या गोष्टींच्या कात्रीत सापडले होते.नंतर हळू हळू माझ्या लक्षात आलं की मी एका शब्दात काय अनुभवत होते ते.तो एकच शब्द होता: दुःखं.

मी ह्या दुःखाशी दोन हात करायचं ठरवलं.लांब रानात फिरायला जायचे,एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसायचे.देवाळात जाऊन बसायचे.
देवळातल्या किर्तनात भाग घ्यायचे.ह्या सर्वांचा काहीच उपयोग होत नव्हता.एकदा माझ्या एका मैत्रीणीने मला एका मेळाव्यात बोलवलं.अनेक तर्‍हेची दुःख सहन करून एकट्याच रहाणार्‍या समविचारांचा तो बायकांचा मेळावा होता. भातशेतीच्या परिसरात एक मोडका मांगर होता.आंब्याच्या झाडाच्या फळ्या कापून,लाकडाची जमीन बनविण्यात आली होती.शिवाय त्याची आणखी डागडूजी करून तो मांगर वापरण्याजोगा केला होता. त्या जागी आम्ही सर्व जमायचो.सगळी जमल्यावर आम्ही कधी कधी भजनं करायचो,कधी एकमेकाचे विचार एकमेकाना समजावून सांगायचो.ती एक चिंतनशील सक्रियता असायची.मनःशांती मिळायची.
एकदा अशीच मी चिंतनात मग्न असताना माझ्या मावशीची मला आठवण झाली.तीच्या जाण्यानंतर मला प्रथमच जाणीव झाली की पुन्हा मला दुःखाने घेरलं आहे.मी ही गोष्ट होण्यापासून खूप टाळलं होतं.”
“पण हे असं का झालं?”
असं मी तीला कुतूहलाने विचारलं.

“त्याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की एकदा त्या मांगरात असताना मी एकाएकी माझ्या पायाखालच्या लाकडी जमीनीवर एकटक बघू लागले होते.माझ्या मनात आलं की नक्कीच अगदी सुरवातीला ही लाकडाची जमीन रंगवून ती चांगली पॉलीश केली गेली असणार.त्यानंतर बरेच दिवस त्यावर अनेक पाऊलं चालली असावीत.खुर्च्या एकडे तीकडे करून तीचा वरचा थर खरचटला गेला होता.सूर्याच्या उन्हाने ती फिकी झाली होती.थंडीने ती आकसली गेली होती.शेवटी रंग आणि पॉलीश तर खरडून गेलं होतंच शिवाय लाकुड अगदी जूनं झालं होतं. आणि आता आता तर मुळ लाकडाचं रूप दिसू लागलं होतं.त्या लाकडावर असलेल्या नैसर्गिक आकृत्या उठून दिसत होत्या. आणि त्या आकृत्या पेंट आणि पॉलीशपेक्षा सुंदर दिसत होत्या.त्या जीवंत आंब्याच्या झाडाच्या सुरवातीच्या लाकडाचा भास होत होता.
मी माझ्या मैत्रीणीना हेच सांगत होते.माझ्या मावशीच्या मृत्युनंतर मी पण अशीच खरडलेली,पावलानी घासल्यासारखी, उन्हाने फिकी झालेली आणि थंडीने आकसलेली झाली आहे.माझ्या शरिराचा पृष्ट थर सुद्धा असाच खरडला गेला आहे.”
सुनंदा मला हे डोळयात पाणी आणून सांगत होती.

आणि नंतर पूढे म्हणाली,
“बरेच लोक मी ज्या दुःखातून जात होते त्याहूनही जास्त आणि भयंकर दुःखातून जात असतील.पण त्यांच्यासाठी मला काहीच सांगता येणार नाही.
परंतु ज्यांचा दुःखाचा दर्जा माझ्या दुःखाशी मिळता जुळता असेल त्यांना मी सांगेन की,मृत्यू,नुकसानी आणि निराशा ह्या बाबत नाराज होणं,ते नाकारणं आणि त्यापासून अलिप्त होणं असं करण्याची मुळीच जरूरी नाही.जर नशिबात असलं तर जीवनात मिळणारा चांगला किंवा तापदायक अनुभव आपल्याला आपल्या जीवनाचं जे खरं सार आहे त्याच्या जवळ आणून सोडतं.सारगर्भित आपला वयक्तिक नकाशा त्या जमीनीवरच्या लाकडाच्या नकाशासारख्या उजेडात आणतं.त्या लाकडाच्या जमीनीकडे पाहून मी माझी समाधानी करून घेत असते.”

सुनंदाचं हे मनोगत ऐकून मला तीच्याबद्दल आदर वाटला.मी तीला म्हणालो,
“सुनंदा,तू अविवाहित रहाणार आहेस असं त्यावेळी मला तू सांगीतलं होतंस ते किती दूरविचाराने सांगीतलं होतंस ते आत्ता हे तूझं ऐकून मला पटलं.सुख आणि दुःख हे जो तो कसं मानुन घेतो त्यावर अवलंबून आहे.आयुष्यात समझोता करून कसं रहायचं ते तुम्हा स्त्रीयांकडून शिकलं पाहिजे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com