Saturday, February 20, 2010

जीवन आणि समय एकच आहे.

“आजूबाजूच्या जंगली झाडांकडे पाहून एक डोक्यात कल्पना आणली आणि ती कागदावर कविता समजून उतरवली.”

माझा थोरला भाऊ तसं पाहिलं तर सदाचा स्वपनाळू.त्याच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर आहे.त्याच्याशी गप्पा मारीत बसल्यावर वेळ मजेत जातो.आज मी त्याच्या घरी त्याच्या गावी जाण्याऐवजी तोच माझ्याकडे काही कोर्टाच्या कामानिमीत्त दोन दिवस राहायला आला होता.रात्री जेवणं झाल्यावर आम्ही दोघे बाल्कनीत गप्पा मारीत बसलो होतो. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.हवा ही अंमळ थंड होती.
“एक एक कप कॉफी घेऊया कां?”
असं मी त्याला विचारलं.लगेचच मला म्हणाला.
“नेकी और पुछ पूछ?”
दुधात पाणी न घालता कॉफीची पूड त्यात टाकून चांगली उकळल्यावर उतरता उतरता त्यात थोडीशी वेलचीची पूड आणि साखर टाकून भरलेले दोन कप घेऊन बाल्कनीत आलो.एक कप त्याला देत मी म्हणालो,
“आज काहीतरी तुझ्याकडून निराळंच ऐकायचं आहे.रोज रोज तेच तेच दुनियादारीचे विषय ऐकून जीव विटलाय.”

थोडासा विचारात पडल्यासारखा होऊन मला म्हणाला,
“असं म्हणतोस,तर ऐक.मी अलिकडे माझी जूनी कागदपत्रं चाळताना त्यात मला एका चिटोर्‍यावर मीच लिहिलेली कविता सापडली.ती कविता वाचून मला ते दिवस आठवले.तू त्यावेळी वयाने फारच लहान होतास.मी नेहमीच आपल्या बाबांबरोबर संध्याकाळी रानात फिरायला जायचो.”
माझा भाऊ मला माहित नसलेलं आणि ते सुद्धा बाबांबरोबरच्या एखाद्या आठवणीबद्दल सांगत आहे हे बघून मला ही आनंद झाला.

मी माझ्या भावाला म्हणालो,
“तुझी कविता नक्कीच निसर्गावर असणार.मी तुझ्या कविता वाचलेल्या आहेत.पण ही कविता जूनी असल्याने खचीतच मला ती ऐकायला आवडेल. पण तू निसर्गावर प्रेम करायला कसा वळलास?”

“निसर्गावर प्रेम करण्याची देणगी मला आपल्या बाबांकडून मिळाली.”
मला माझा भाऊ सांगू लागला.
“आपले बाबा शांत स्वभावाचे आणि उत्कृष्ट अवलोकन करणारे होते. एकदा असंच आम्ही रानातून फिरत जात असताना,मला गूपचूप राहायला सांगून एका गोल दिसणार्‍या करड्या रंगाच्या दगडाकडे निरीक्षण करायला त्यांनी सांगीतलं.ते स्वतः त्या दगडाजवळ जाऊन बोटाने दाखवीत असताना तो दगड जीवंत झाला.कारण तो एक ससा होता.
तो अचानक पळून गेला.माझा श्वासपण त्याच्याबरोबर गेला असं मला त्या क्षणी वाटलं.त्या क्षणापासून माझ्या जीवनात शास्त्रज्ञ म्हणून,प्रकृतिवादी म्हणून आणि कवी म्हणून एक जीवनक्रम स्थापित झाला.”

मी आणखीन काहीतरी त्याला प्रश्न विचारण्याच्या तयारीत आहे असं पाहून,
“मला आणखी काही सांगायचं आहे ते ऐक आणि मग तू बोल.”
असं सांगून तो पुढे म्हणाला,
“जीवनातली सुंदरता आणि विविधताबद्दल फिकीर करणार्‍या तुमच्या आमच्या सारख्याला हे जरा कठीण दिवस आलेले आहेत.पृथ्वीवर पूर्ण विलोपन करायला एक प्रकारची चूरस लागली आहे. मला वाईट वाटतय की मी जे पाहिलं आहे ते माझ्या पंतवंडाना कदापी पहायला मिळणार नाही.पण ह्यामुळे मी जरी दुःखी झालो असलो तरी मी माझी असीम उमेद राखून ठेवली आहे.सध्या आलेली आपत्ति कितीही कठीण असली तरी जीवन टिकून रहाणार आहे.आपण आपला विनाश करू पण सृष्टीचा विनाश होणार नाही.”

हे त्याचं सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“जीवनाच्या असीमित क्षमतेला मी मानतो.अशी क्षमता की जी ब्रम्हांडातल्या निर्वात अन्तरिक्षात ह्या प्रचंड शिलेला ज्याला पृथ्वी म्हटलं जातं तीला आच्छादीत करते. ह्या ब्रम्हांडातलं हे एकच जीवंत जग आहे अशी समजूत आहे. मला असही वाटतं की जो प्रत्येक जन्माला येतो त्याला हे जीवंत जग जणू एक उपहार कसा मिळतो आणि तो जीविताच्या अग्रणी राहून त्याची परतफेड करतो.”

“तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
असं म्हणत तो पुढे म्हणाला,
“मी कवी असल्याने मला माझ्या भावना,माझा दृढवि़श्वास, फक्त गद्यात प्रकट करता येणार नाही.मला आठवतं ही कविता त्यावेळी मी आपल्या घराजवळच्या डोंगरावर चढून अगदी वर एका टोकावर बसून आजूबाजूच्या जंगली झाडांकडे पाहून एक डोक्यात कल्पना आणली आणि ती कागदावर कविता समजून उतरवली.तू म्हणतोस तसं जीवनात असलेल्या क्षमतेची आणि सृष्टीच्या सुंदरतेची कल्पना येऊन ही कविता मी त्यावेळी लिहीली असावी,समोर एक कडूलिंबाचं प्रचंड झाड वाढलेलं होतं.कविता अशी आहे.

डोंगराच्या माथ्यावरी असे
एक कडूलिंबाचे झाड
आडवे तिडवे वाढूनी
वार्‍यास देई आव्हान

एक एक दिवस करूनी
राहिले जीवंत ते अजूनी
थंडी वारा पाऊस झेलूनी
करीत राहिले गुजराण

कीड,मुंगी,तू अन मी
येतो अन जातो ह्या जगातुनी
मिळतो समय त्यामधूनी
करण्या अपुल्या्ला निपूण

“मी अनेकदा त्या कडूलिंबाच्या झाडाजवळून गेलो असेन.पण पुढच्या खेपेला जाईन तेव्हा तुझी कविता मला नक्कीच आठवेल.तुझी आणि आपल्या बाबांची मला नक्कीच आठवण येईल.”
कविता ऐकून झाल्यावर असं मी माझ्या भावाला म्हणालो.हे ऐकून आनंद त्याच्या चेहर्‍यावरून लपला नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com