Saturday, September 24, 2011

लिखीत शब्दांमधली क्षमता.

“माझ्या हृदयापासून मला माहित झालं आहे की हे जीवन सुंदर आहे आणि ते जगण्यालायक आहे.”

द्त्तात्रयाला, मी आणि काही त्याला दत्या म्हणतो इतर दत्ताजी म्हणतात. द्त्या लहानपणापासून फार हुशार होता.तो रहात होता त्या कोकणातल्या गावात शाळा नव्हती.म्हणून त्याच्या आजोबानी त्याला सावंतवाडीत शिकायला पाठवलं.तिकडे तो सहावी पर्यंत शिकला आणि नंतर रत्नागीरीला आपल्या आतेकडे रहायला गेला आणि तिथून त्याने मॅट्रिकची परिक्षा दिली.
दत्या घरचा श्रीमंत.माड,पोफळीमुळे नारळ आणि सुपारीचं उत्पन्न भरपूर यायचं.आपण शेतीवर अवलंबून राहिल्याने जास्त शिकलो नाही तरी आपल्या नातवंडानी भरपूर शिकावं असं त्याच्या आजोबाना मनोमनी वाटायचं.

द्त्या मॅट्रिक झाल्यावर रत्नागीरीच्या कॉलेजात गेला नाही.तो आपल्या गावात आला आणि गावतल्या काही प्रतिष्ठीत व्यक्तीना हाताशी धरून सहावी पर्यंत शिकवायची शाळा काढली.बरीच वर्ष तो ती शाळा चालवत होता.

त्याचा मुलगा पंढरीनाथ,मी त्याला पंड्या म्हणायचो काही त्याला पंढरी म्हणतात,वडीलांच्या शाळेत दहावी पर्यंत शिकला.पंड्या मोठा होईपर्यंत दत्याने सहावीची शाळा दहावीपर्यंत शिकण्यालायक केली होती.पंड्या दहावी संपल्यावर पुढच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला आपल्या एका नातेवाईकाकडे येऊन राहिला.बीए पर्यंत शिकून झाल्यावर तो नोकरी करणार होता.पण त्याच्या वडीलानी त्याला गावाला बोलावून घेतलं आणि
गावातल्या शाळेतला कारभार पहायला सांगीतलं.

पंड्या लेखन करण्यात खूप हुशार होता.त्याच्या कविता मधून मधून मुंबईच्या काही मासिकात छापायला यायच्या.
किसन ह्या टोपण नावाखाली तो कविता लिहायचा.छोटे लेख आणि निबंध पण मासिकातून द्यायचा.

पंड्याची ही उपजत आवड, त्याने गावातल्या शाळेत शिकायला येणार्‍या आणि ज्यांच्यामधे लेखनाची आवड असेल त्यांना हुडकून काढून, नियमीत शाळेच्या अभ्यासाच्या बाहेर त्यांची आवड विकसीत करायची एक शक्कल काढली.आणि अशा बर्‍याच मुलांच्या मनात लेखनाची आवड रुजवली.
आपल्या वडीलाना भेटण्यासाठी म्हणून आणि गावातली शाळा दाखवण्यासाठी मला तो एकदा आग्रहाने त्याच्या गावाला घेऊन गेला होता.
त्याची शाळ पाहून मला खूप आनंद झाला.

“ज्यांना काहीतरी उपजतच लिहायची आवड आहे अशाना लेखक होण्यासाठी लेखनात उत्तेजन देऊन लेख किंवा कविता एव्हड्या लहान वयात त्यांच्याकडून लिहून घेण्याची कल्पना तुला कशी सुचली?”
असा मी पंढरीला सरळ सरळ प्रश्न केला.

लेखनातून लिहिल्या गेलेल्या शब्दांच्या क्षमते विषयी मला नेहमीच खास असं वाटतं.
तरूण विद्यार्थ्यांबरोबर, ह्या शब्दांतल्या क्षमतेची भागीदारी करण्यात, माझे दिवस निघून जातात.
मी दहावीतल्या विद्यार्थ्यांना शिकवतो.हे सर्व विद्या्र्थी वृत्तांत लिहितात,
आठवणी लिहितात.त्यांच्या लेखनात, मी,माझा वर्ग आणि मुख्य म्हणजे ते स्वतः, वाटेकरी असतात.
लेखन एव्हडं जोरदार असतं की,मीही त्यांच्याबरोबर लिहिण्यात भाग घेतो, कारण त्यामुळे त्यांचा लेखनाचा विकास होत असताना ह्या सामुहीक प्रक्रियेत मी एकटा पडत नाही.
आठवणी लिहायच्या झाल्यास “त्यात काय हरकत आहे”-म्हणजे लिहायला,
असं समजून लिहिलं जातं.आपल्या जीवनात येत असलेल्या घटनांमधून अर्थ शोधून काढण्याचा तो प्रयत्न असतो. आणि असं करताना आपलाच सन्मान राखण्याचाही प्रयत्न असतो.

असा हा अर्थ शोधून काढण्याच्या प्रक्रियेत डोळे अश्रूनी थपथपतात किंवा डोळे हसून हसून ओलेही होतात,ह्या घटना,व्यक्ती किंवा स्थानं आठवणी म्हणून मेंदूत कोरल्या जातात.त्यामुळे रोजचा अनुभव संपन्न होतो.

पाऊस पडून गेल्यावर,मागच्या घराच्या परसात,एखाद्या डबक्यात पाणी साचल्यावर माझे आजोबा कागदाच्या होड्या बनवून मला जवळ बोलावून घ्यायचे.आणि माझ्यासाठी जादुने भरलेली प्रेमळ दुनिया निर्माण करायचे. त्यावेळी त्यांच्या तोंडून आलेले शब्द,उद्गार मी माझ्या आठवणीतून कागदावर लिहून काढल्यावर, ते शब्द वाचता वाचता त्या वातावरणात मला खोलवर नेऊन सोडतात.

जेव्हा मी माझ्याच विद्यार्थ्यांचं लिहिलेलं एखादं लेखन वाचतो,ते इतकं जबरं असतं,की माझ्या हृदयाला पीळ पडतो.मी असा कोण म्हणून आहे? की त्यांनी लिहिलेल्या त्या लेखनाला मला न्याय द्यावा लागावा.असं माझ्या मनात आल्याशिवाय रहात नाही.तसं करायला माझ्या जवळ शब्द उरत नाहीत. परंतु,त्या विद्यार्थी लेखकाच्या डोळ्यात मी पाहू शकतो आणि क्षणभरात माणूसजातीची आणि त्यांच्या विचारशक्तीची प्रशंसा करावी तेव्हडी
थोडीच असं मला वाटू लागतं.

एखाद्याने लेखन केल्यानंतर काही दिवसानी,आम्ही दोघं बसून,त्या लेखनात सुधारणा करतो,त्या लेखनाला उजाळा देतो,त्या लेखनावर ध्यान द्यायला पात्रता आलेली असते म्हणून त्याचं संपादन करतो,परंतु,खरंच सांगायचं झाल्यास त्या विद्यार्थी-लेखकाच्या डोळ्यात पहाताच क्षणी त्या विद्यार्थ्याची,धारीष्ट करून त्याने माझ्या बरोबर घेतलेल्या वाट्याची, आणि मला असं करू देण्याच्या त्याच्या समर्थनाची, माझ्याकडून नक्कीच प्रशंसा होत
असते.

हे लिखीत शब्द एकमेकाच्या संबंधामधे एव्हडं जाळं विणून ठेवतात की, प्रत्यक्ष संभाषणातून ते साध्य झालं असतं असं मला वाटत नाही.
माझ्या स्वतःच्या लेखनातून माझ्या आठवणी आणि माझ्या भावना मी इतरांना वाटत असतो. तसं बहुदा इतर वेळी माझ्याकडून होत नाही.
मला सांगा,मला वाटणारा माझ्या आजीबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी माझी आजी निर्वतल्याची बातचीत करून त्या अनुभवाला न्याय देता येईल की एखाद्या सूंदर कवितेतून सफाईदारपणे लिहिल्याने जास्त न्याय देता येईल?
माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना,
“माझी आजी गेली.मला तिची खूप आठवण येते हे तुम्हाला सांगायचं आहे”
असं सांगण्याऐवजी मी माझ्या आजीवर लिहिलेली माझी कविता वाचून त्यांना दाखवली.

हात माझ्या आजीचा धरूनी
वाटे देवळातून यावे फिरूनी

लहान पडती पाऊले माझी
तशीच चाले माझी आजी

कधी न करे ती चालण्यात घाई
माझ्याच कलाने ती सदैव घेई

आवडे मजला आजी बरोबर चालाया
तिची न माझी नजर पडे फुले पहाया

बाबा अन आई करीती घाई कामावर जाण्या
माझी आजी घेऊन येई खाऊ मला भरविण्य़ा
देवाजीचे उपकार झाले आजीला बनविण्य़ा

प्रत्येक वेळेला आपलं लेखन, इतरना वाटून, एकमेकातला दुवा,माणूस म्हणून,गहिरा होत जातो.
वर्षाच्या अखेरीस,मी आणि माझे विद्यार्थी जेव्हडे एकमेकाना समजू शकतो तेव्हडं इतरांशी होत नाही.आम्हाला जीवनाच्या रोजच्या मार्गात,धाडस,
मनोहरता आणि करमणुक दिसत रहाते.
शाळेच्या शेवटच्या वर्षात,एकमेकातलं नातं दुरावलं जाणार याची खंत मला एव्हडी भासते की विचारू नका.पण पुढे पाऊल टाकावं लागतं.कारण त्याशिवाय गत्यंतरच नसतं. शिवाय माहित असतं की,नव्या वर्षात आणखी नवीन विद्यार्थी येणार आहेत ज्यांबरोबर मी पुन्हा लिखीत शब्दांच्या जादूचं आणि मनोहरतेचं वाटप करणार आहे.

मला माहित आहे की मी स्वतः लिहित रहाणार आहे.आणि असं करताना माझ्या हृदयापासून मला माहित झालं आहे की हे जीवन सुदर आहे आणि ते जगण्यालायक आहे.”

हे सर्व पंढरीकडून ऐकून झाल्यावर आम्ही दोघं दत्तात्रयाला भेटायला त्याच्या खोलीत गेलो.मला दत्तात्रय बराच थकलेला दिसला.मी निघताना त्याला म्हणालो,
“खरंच तू नशिबवान आहेस.गावात शाळा बांधून तू केलेलं समाज कार्य तुझा पंढरी,ते पुढे चालवीत आहे हे पाहून खरोखरच तुम्हा दोघांची कितीही वाखाणणी केली तरी ती कमीच होईल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com