Sunday, September 18, 2011

झाडांच्या पानांचा बलवर्धक गुण.


“जीवन सुंदर आहे आणि ते जास्त सुंदर आहे कारण त्या पानांच्या ढीगार्‍यामुळे.
असं मला सतत वाटत होतं.”

पावसाळ्याच्या दिवसात कोकणात जायला मला नेहमीच आवडतं.ह्यावेळी मी माझ्या मावसभावाच्या गावी गेलो होतो.पाऊस यायला अजून वेळ होता. पण रोज संध्याकाळी नदीवरून जोराचा वारा आल्याने सगळं वातावरण थंड होतं.गरम गरम चहा घेत आम्ही मागच्यादारी गप्पा मारीत बसलो होतो. गप्पा मारीत असताना एकाएकी आणखी जोराचा वारा येऊन सगळी झाडं हलायला लागली.पानांची सळसळ ऐकायला आली.आणि काहीवेळाने
जमनीवर एव्हडी पान पडली की खालची जमीनच दिसेना.आम्ही घरात आलो.थोड्यावेळाने बाहेर जाऊन पाहिल्यावर मला कल्पना सुचली की ही
सर्व पानं गोळा करून एका कोपर्‍यात त्याचा ढीग करून ठेवावा.मी माझ्या भावाला तसं म्हणताच तो लागलीच कबूल झाला.पानांना सुंदर वास येत
होता.सर्व पानं जमा केल्यावर त्या एकत्रीत पानांचा वासही मिसळलेला वाटला.त्या वासाबाबत मी माझ्या भावाला सहज बोललो.

माझा भाऊ मला म्हणाला,
“ह्या वासावरून मला माझी एक जुनी आठवण आली.
मला आठवतं,तो माझा वाईट दिवस होता.म्हणून मी जरा बाहेर जाऊन यावं असं मनात आणून मागच्या परसात गेलो.म्हटलं,माझ्यामधे आणि
माझ्या रोजच्या कटकटीमधे थोडी दूरी आणावी.

परसात खूपच पानं पडली होती.पावसाळा येण्यापूर्वी पंधराएक दिवस कोकणात नेहमीच जोराचे वादळी वारे वहात असतात.त्यामुळे झाडांच्या
बर्‍याचश्या पानांची पडझड होत असते.आंब्याच्या,चिंचेच्या,फणसाच्या,उंच सोनचाफाच्या,जांभळाच्या,झाडांची पानं हमखास खाली जमीनीवर जमा
होतात.

म्हटलं, सर्व पानं जमा करावीत.आणि एका कोपर्‍यात त्याचा ढीग करून ठेवावा.तेव्हडाच व्यायाम होईल आणि बरोबर परसाची साफसफाईही होईल. माडांच्या झापांचे हिर काढून बनवलेली झाडू आणि एक मोठं गोणपाट बरोबर घेऊन कामाला लागलो.मला हे पावसाळ्यापूर्वीचे दिवस नेहमीच आवडतात.ढगाआडून येणार्‍या उन्हात काम करायला मला आवडतं. उन्हाळ्यात निरभ्र असलेलं आकाश,ह्या दिवसात ढगाळ होतं. लवकरच पाऊस येणार आहे त्याची ही जणू सुचनाच असते. आपला उत्साहही वाढतो.

गोणपाटावर जमा करून ठेवलेल्या निरनीराळ्या झाडांच्या एकत्रीत झालेल्या पानाना एक निराळाच सुवास येत होता.
का कुणास ठाऊक सहजच एक भन्नाड कल्पना मनात आली. हा पानांचा ढीग पसरवून आपण त्यात चक्क लोळावं.आणि सुगंधात धुंद व्हावं.

भन्नाड कल्पना एव्हड्यासाठीच म्हटलं कारण,ते दिवस असे होते की माझे केस पिकायला लागले होते.माझ्या वयाकडे पाहून पानात लोळण्याच्या
माझ्या कल्पनेला कुणी पोरकटपणा म्हणायचा.पण मला पहायला आजुबाजूला कुणी नव्हतं.त्यामुळे मी हातपाय पसरून चक्क उताणा पडून
आकाशाकडे बघत होतो.अगदी सुरवातीच्या क्षणापासून मस्त वाटत होतं. त्या पानाच्या ढीगार्‍यात वाळून पडलेली सोनचाफ्याची, जास्वंदीची, ओवळीची फुलंही पडली होती.पानांबरोबर त्या फुलांचा सुगंध मिसळून वास घ्यायला खूपच मजा येत होती.

त्या वयात तसा प्रकृतीने मी बराच वजनदार होतो.माझे खांदे आणि कुल्हाचा भाग त्या ढीगावर विशेष वजन पाडून,गोणपाटाच्या खालची जमीन मला लागत होती हे ही लक्षात येत होतं.पण माझे बाहू आणि तंगड्या वजन विरहीत आणि लोंबकळत आहेत असं वाटत होतं.अगदी शांत आणि हालचाल नकरता पडून होतो तोपर्यंत सर्व काही स्थीर वाटत होतं.आणि धगधगत्या चुलीत जळणारी लाकडं जशी चुरचुरून आवाज करतात तसं माझ्या श्वासामुळे काही वाळलेली पानं आवाज करीत होती.

मी माझे डोळे सताड उघडे ठेवून वर आकाशाकडे पहात असताना कृमी-किटक उडत असताना दिसत होते.कदाचीत लवकरच येणार्‍या पावसाची त्यांना जाणीव झाली असल्यामुळे असं होत असेल असं मला त्यावेळी वाटलं.
जमलेल्या पक्षांकडून हळूवार आवाज येत होते.जसे राजकारणी लोक भाषण देतात,जसे वसंत ऋतुत पक्षी गलबला करतात तसा तो आवाज नव्हता. एखादं कुटूंब जमून रात्री जेवताना हळुवार बोलत जेवत असतात तसा काहीसा तो आवाज होता.

थेट वीसएक मिनीटं मी काही हालचाल न करता तसा पडून होतो.आणि शेवटी घरात जावं असं वाटायला लागलं.त्या ढीगार्‍यातून मी हळूच उठलो. माझ्या शरीराचा आणि हातापायाची संपूर्ण छाप त्या पानाच्या ढीगार्‍यात मागे वळून पाहिल्यावर दिसत होती.बर्फात लोळून उठल्यावर जसं दिसतं अगदी तसं.मला बरं वाटलं.अगदी साफ बरं वाटलं नाही पण नक्कीच बरं वाटलं.

त्या पानांच्या ढीगार्‍यावरची ती छाप पाहून मला क्षणभर वाटलं की माझ्या सर्व कटकटी माझ्या पासून दूरावून त्या पानांच्या ढीगार्‍यात पडून आहेत.
घरात आल्यावर माझ्या टेबलावर बसून मी लिहायला लागलो तेव्हा माझ्या डोक्यातल्या केसातून तो वास अजून मला येत होता.
जीवन सुंदर आहे आणि ते जास्त सुंदर आहे कारण त्या पानांच्या ढीगार्‍यामुळे.
असं मला सतत वाटत होतं.”

हे सारं ऐकून मी माझ्या भावाला म्हणालो,
“निसर्ग स्वतःच सुंदर आहे.आपल्या डोळ्यातून ते सौन्दर्य आपल्याला दिसू लागतं.एव्हडंच नव्हे तर आपल्या इतर इंद्रियज्ञानातून निसर्गाची इतर
अंग दिसतात,भासतात. फक्त तसं व्हायला आपल्याकडे क्षमता असायला हवी.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com