Monday, September 12, 2011

स्मित स्मशानातलं.

“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही. आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य
असतं.”

अरूणच्या आजोबांची आज चाळीसावी पुण्यतिथी होती.अरूण स्वतः पन्नास वर्षांचा झाला.दोन्ही घटना साजर्‍या करण्यासाठी होणार्‍या कार्यक्रमात
येण्यास अरूणने मला खास आमंत्रण दिलं होतं.

अरूणच्यावेळी अरूणची आई बाळंतपणातच गेली.अरूणला सहाजीकच आपली आई तिचा फोटो पाहून आठवते.अरूणला त्याच्या आजी,आजोबांनी
लहानाचा मोठा केला.
अरूणचे आजोबा डॅक्टर होते.आजी घर संभाळायची.आजोबांचा दवाखाना घरातच होता.येणारे जाणारे पेशन्टस अरूणला धाकले डॉक्टर म्हणूनच हाक मारायचे.पुढे अरूण डॉक्टर झाला नाही ही गोष्ट वेगळीच.

अरूण दहा वर्षाचा असताना त्याचे आजोबा गेले.चाळीस वर्षापूर्वीची आजोबांची आठवण काढून अरूण मला सांगत होता.
“ती घटना घडली तेव्हा मी चौथीत शिकत होतो.ती घटना म्हणजे माझ्या आजोबांचं त्या वर्षी निधन झालं होतं.त्यांची शस्त्रक्रिया झाली होती.अगदी
सहजपणे होणारी ती शस्त्रकिया होती.पण माझ्या आजोबांचं दैव आड आलं असावं.

माझं माझ्या आजोबांवर खूप प्रेम होतं.त्याचं पण माझ्यावर तेव्हडंच प्रेम होतं.मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकत होतो.आणि त्यांच्या अनुभवाचा
मला माझ्या आयुष्यात खूप उपयोग होत आहे.माझे आजोबा आमच्या गावात खूप प्रसिद्ध होते.ते दयाशील होते,दानशूर होते,मदत करणारे होते
आणि मुख्य म्हणजे ते व्यवसायाने डॉक्टर होते.त्या दिवसात डॉक्टराना व्हिझीटसाठी घरी घेऊन जायचे.माझे आजोबा वेळी अवळी कुणाच्याही घरी
व्हिझीट्ससाठी जायचे.गावातल्या लोकांना माझे आजोबा देवासारखे वाटायचे.पण माझ्या आजोबांना तसं म्हटलेलं आवडत नव्हतं.ते म्हणायचे,
“मला तुम्ही देवपण देऊ नका.नाहीपेक्षा माझ्यातली माणूसकी जाईल.”

माझे आजोबा गरीबांकडून पैसा घेत नसत.उलट त्यांना, जमलं तर, फुकट औषध द्यायचे.पण त्याची वसूली ते गावातल्या पैसेवाल्यांकडून करायचे.
माझे आजोबा गेल्याचं गावात कळल्यावर अख्खं गाव दुःखी झालं.
“डॉक्टर गेला पण त्याबरोबर एक माणूसपण गेला”
असं काही लोकांनी स्मशानात त्यांच्याबद्दल शब्द काढल्याचं मला आठवतं. आणि हे असं बोललं जाणं अपेक्षीत होतं.मी पण माझ्या वडीलांबरोबर
आजोबाना अखेरचं पोहोचवायला स्मशानात गेलो होतो. का कुणास ठाऊक सर्वांचं आपआपल्यापरीने बोलणं झाल्यावर मलाही माझ्या आजोबांबद्दल
बोलल्या शिवाय रहावेना.मी माझ्या वडीलांची सम्मती घेतली.इतर आजुबाजूचे लोक आवाक झाले.अवघा दहा वर्षाचा मुलगा स्मशानात येऊन
बोलण्याचं कसं धारिष्ट करतो ह्याचा अनेकाना अचंबा वाटला.
मी ज्यावेळी बोलायला म्हणून उभा राहिलो,त्यावेळी ज्याच्या त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते ते.दुःखी दिसत होते.
एक दिवस असाच मी माझ्या आजोबांच्या सहवासात होतो त्या दिवसाची आठवण सांगायचं मी ठरवलं.

मी म्हणालो,
“त्या दिवशी माझ्या आजोबानी सुखी जीवनाचा कानमंत्र मला दिला होता. ते म्हणाले होते की,
“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही.आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य
असतं.”
प्रयोगाने सिद्ध करण्यासाठी मी, आजी आणि माझे आजोबा एक दिवशी गावात गेलो होतो.बाजारात बरेच लोक दिसतात म्हणून मला आजोबा
म्हणाले,
“या ठिकाणी आपण दिसेल त्याच्याशी हसूया.माझं म्हणणं पटण्याजोगं आहे की नाही ते तुला दिसून येईल.”
खरंच ज्यांच्याशी आम्ही हसलो ते सर्व आमच्याशी हसले.अगदी काळजीत दिसणारे,गंभीर दिसणारेसुद्धा आमच्या पांढर्‍या दंतपंक्ती दाखवल्यावर
हसले.
एक वृद्धा,असेल एंशी वर्षाची,आमच्याशी हसली.आम्हाला म्हणाली,
“एक युग होऊन गेलं असेल माझ्याशी कुणीही हसलं नाही.खरंच,आजचा माझा दिवस माझा होता.”
एक निमिषही न लागणारं साधं हास्य,दुसर्‍याला हसवू शकतं.एकाला जर हसवता आलं तर इतराना किती हसवता येईल.जीवनात कुणालाही हसायला अडथळा येत नसावा.
आज मला माझ्या आजोबांची उत्कटतेने आठवण येत आहे.मला माझ्या आजोबांनी, मी पाळण्यात असल्यापासून, वाढवलं.माझ्या गुरूच्या जागी ते
होते.तुम्हासर्वांना ते गेल्याने एव्हडं दुःख होतंय तर माझी काय स्थिती असेल याची कल्पना करा.म्हणून मी आजपासून ठरवलंय की,त्यांना खरी
आदरांजली द्यायची असल्यास त्यांचा कानमंत्र कायम लक्षात ठेवून तो इतरांनाही द्यावा”

माझं एव्हडं भाषण झाल्यावर,लोकांच्या चेहर्‍यावरचे दुःखाश्रू वाळून गेले आणि चेहर्‍यावर हसू दिसायला लागलं.खरंच हसू संसर्गजन्य होतं.त्या
दिवशी माझ्या आजोबानी मला महत्वपूर्ण धडा शिकवला आणि मी तो धडा माझ्या सोबत ठेवला आहे.एखादा दिवस वाईट असला तरी जग बुडती
होत नाही.कृतार्थ होण्यासाठी जगात बर्‍याच चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत.मित्रमंडळी,कुटुंबिय जे माझ्या चेहर्‍यावर हास्य चमकवतात. मुकाटपणे कुढायला जीवन खूपच अल्प आहे.

त्या दिवसाच्या त्या घटनेमुळे आणि माझ्या आजोबांच्या बुद्धिकौशल्यामुळे माझ्या जीवनाला आकार आला.म्हणून मला वाटतं लोकांनी हसत रहावं. माझ्या मित्रमंडळींचं,कुटुंबीयांचं आणि अनोळख्यांचंसुद्धा जीवन सुखाचं जाण्यासाठी माझ्या आजोबांचा संदेश मी जीवंत असे पर्यंत इतराना देत
रहाणार”.

हे ऐकून मलाही गदगदून आलं.पण चेहर्‍यावर हसं ठेवीत मी अरूणला जवळ घेऊन म्हणालो,
“अरूण,खरंच तुझे आजोबा ग्रेट होते.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com