Friday, September 30, 2011

आईने विणलेली शाल.


“म्हणून मला वाटत असतं की,मला माझ्या आईने दिलेल्या ह्या विणलेल्या शालीतल्या प्रत्येक धाग्यातून माझी आई हळुवारपणे त्या शालीत तिचं प्रेम घट्ट धरून ठेवीत असावी.”

वैशालीला एक भाऊ आणि एक बहिण आहे.ती दोघं अमेरीकेत स्थाईक झाली आहेत.वैशालीचा नवरा दुबईत एका पेट्रोल कंपनीत कामाला असल्याने दुबईवरून ती अधुनमधुन, तिची आई एकटी असल्याने, तिच्याकडे रहायला यायची.दुबईला असताना ती रोज आईला फोन करून तिची जाग घ्यायची. वैशालीच्या गैरहजेरीत जवळचे नातेवाईक तिच्या आईची देखभाल करायचे. शिवाय एक विश्वासातली बाई तिच्या देखरेखीसाठी होती.

वर्षातून एकदा तिची दोन्ही भावंडं आईला भेटायला यायची.ती संधी साधून वैशाली आणि तिचा नवरा आईला भेटायला दुबईवरून यायची.अलीकडे वैशालीची आई खूपच थकली होती हे लक्षात आल्यावर वैशालीने आपल्या नवर्‍याशी बोलून आपला मुक्काम आईजवळच हलवला होता.आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला डॉक्टरने सांगीतल्याने तिने तसा निर्णय घेतला होता.

तिची आई गेल्यावर मी वैशालीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.गप्पा मारीत असताना,तिने आपल्या अंगावर लोकरीची रंगीत शाल घेतली होती,
ती डोळ्यात भरण्यासारखी रंगीबेरंगी लोकरीची शाल पाहून मी त्या शालीची प्रशंसा केली.चेहर्‍यावर आनंद आणून मला वैशाली म्हणाली,
“अलीकडेच माझी आई गेली.जाताना मागे कसले पुरस्कार,कसली मोठी धनसंपत्ती किंवा सफलतेची कसलीही यादगारी ती ठेवून गेली नाही. असल्या गोष्टी ठेवून जाणं हे जगात एखाद्याच्या जीवनाचं सार समजलं जातं.

नाही,माझी आई काहीही ठेवून गेली असेल तर ते आम्हाला ठेवून गेली, आम्हाला मागे सोडून गेली.आणि काही ठेवून गेली असेल तर तिच्या प्रेमाच्या आठवणी,थोडसं तिच्याबद्दल, ते सुद्धा आम्हाला आठवण करून द्यायला की आम्ही कोण आहो ते. आमची आई जिथे झोपायची तिथे तिच्या जवळपास असलेल्या तिच्या कपाटात,किंवा टेबलाच्या खणात पसरलेल्या कागदाच्या खाली,तिने काळजीपूर्वक तिच्या भविष्यातल्या स्वप्नांच्या आठवणी नीट जपून ठेवल्या होत्या.एके ठिकाणी माझ्या लहानपणी माझ्यासाठी विणलेली लोकरी रंगीत शाल मी पाहिली. तिच ही आत्ता मी माझ्या अंगावर घेतली आहे.शिवाय मी पाठवलेली पोस्टकार्ड्स,पत्रं तिने जमा करून ठेवली होती.काही फोटोंच्या मागे,नावं,तारीख,भेटी दिलेल्या जागा लिहून ठेवल्या होत्या.आमच्या जीवनातल्या आठवणी त्यात होत्या.आम्ही तिला पोस्टाने पाठवून दिले्ली तिच्या जन्मदिवसाची शुभेच्छाची कार्डं,तिला दिलेल्या गिप्ट्स, सर्व तिने जपून ठेवल्या होत्या.
एका खणात अठ्ठावन वर्षापूर्वी तिच्या लग्नाला पाठवलेले शुभसंदेश होते त्यात आम्हाला शाळेत मिळालेली बक्षीसं आणि आमच्या करीअर मधल्या लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या आठवणींच्या नोंदी होत्या.

एखाद्या पडलेल्या इमारतीच्या मलब्यामधे काही मिळावं तसा माझ्या आईचा अठ्याहत्तर वर्षांचा इतिहास त्यात होता. एखाद्या उत्खननाच्यावेळी प्रत्येक लहानसहान गोष्टीची पहाणी जशी मोठ्या चित्रावर प्रकाश टाकते तसं झालं होतं.प्रत्येक उलगड्यात माझ्या आईत आणि तिच्या जगात मला काही तरी नवीन दिसायला लागलं होतं.तिच्या त्या जगात आम्ही केंद्र स्थानी होतो.

माझा भाऊ,माझी बहिणी,आमचं बालपण हे सर्व आमच्या आईच्या प्रेमाच्या शालीत हळुवारपणे लपेटलं गेलं होतं.माझी आई ह्या जगात आम्हाला मार्गदर्शन करायला नसणार तेव्हा आम्ही त्या शालीचा एक एक धागा भुतकाळातून भविष्यकाळात विसवून काढावा म्हणून जणू ते तिचं प्रेम वाट पहात होतं.

म्हणूनच मी मानते की ह्या मुल्यवान बाबी,दिसायाला जरी यःकश्चीत असल्या तरी,ते माणुसकीचे छोटे,मोठे अंश असतात.आणि छान जीवन जगल्याचं ते अनमान असतं.ह्या गजबजलेल्या जगात सनसनाटीच्या बातम्या पसरत असतात.परंतु,ह्या असल्या बिनबोभाटलेल्या,सौम्य असलेल्या गोष्टी गवसल्यावर त्या आपला सांभाळ करीत असतात.
हे लहानसे खजिने म्हणजेच जीवनात तिने दिलेलं योगदान म्हटलं पाहिजे. त्याचंच परिवर्तन आपल्यावर होत असतं.एकमेकावर प्रेम करण्याचा ते एक साधन असतं.

माझ्या आईसाठी,आम्ही तिचे प्रयोजन होतो,अर्थ होतो.आमची आई होण्यात तिचे ते पुरस्कार होते,तिचं अभिनंदन होतं.ह्या छोट्या छोट्या आठवणी घेऊन ती तिच्या भुतकाळाचं गाठोडं म्हणून जवळ बाळगत राहिली आणि नंतर आपला वारसा म्हणून ते गाठोडं आमच्या स्वाधीन करून गेली.
तिच्या पश्चात हा खजिना सापडल्याने जणू ती वाट पहात असलेल्या तिच्या मिठीत मी आहे असं मला वाटायला लागलं.

आपल्यापैकी बरेच काही असे आहेत की जे आजुबाजूच्या समुदाया समोर हावभावाचा अभिनय निर्माण करू शकतात.
पण बरेचसे आपण आपल्या छोट्याश्या दुनियेत दिवस गुजारतो.परंतु, ह्या छोट्याश्या दुनियेतच एकमेकाशी प्रेमाचे दुवे निर्माण करायला संधी प्राप्त होत असते आणि शेवटी त्यामुळेच ते दुवे आपल्याला एकत्रीत करीत असतात.

मला नेहमीच वाटत असतं की,दयाळू राहून,प्रेमळ राहून,दर दिवशी येणार्‍या अगदी साध्या सरळ क्षणांतून आपल्या भोवती असलेल्या ह्या मोठ्या विश्वाला आपण आकार देत असतो.आपण कोणही असलो आणि आपण कुठेही रहात असलो तरी,शेवटी आपल्यातला दुवा काय साधत असतं हेच खरं.
म्हणून मला वाटत असतं की,मला माझ्या आईने दिलेल्या ह्या विणलेल्या शालीतल्या प्रत्येक धाग्यातून माझी आई हळुवारपणे त्या शालीत तिचं प्रेम घट्ट धरून ठेवीत असावी.”

वैशालीचा निरोप घेऊन घरी गेल्यावर रात्री झोप येण्यापूर्वी मी पलंगावर पडलो असताना माझ्या डोळ्यासमोर, वैशालीच्या आईने विणलेली, ती लोकरीची रंगीत शाल येत होती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com