Monday, September 5, 2011

लेट ललित.


“आत्ता ही फ्लाईट लेट असल्याने,तू मात्र वेळेवर आला आहेस.”मी ललितला म्हणालो.त्यानंतर आम्ही दोघेही हसत हसत गेटवर जायला निघालो.

ललित अभ्यंकर आणि मी एकाच ऑफिसात काम करायचो.ललित तसा माझ्यापेक्षा वयाने थोडा लहान होता. मला त्याचा स्वभाव आवडायचा.मुख्य म्हणजे तो प्रमाणिक होता आणि माणूस होता.
एक मात्र त्याच्यात मी पाहिलं होतं की,त्याला वेळेची कदर नव्हती.एक एका माणसात तसं असतं.मला आणि ललितला नाटकं पहाण्याची फार आवड असायची.आलटून पालटून आम्ही एकमेकाची तिकीटं काढायचो.आमचं पेट नाट्यगृह म्हणजे पार्ल्याचं दिनानाथ नाट्यगृह.

अलीकडेच ललित माझ्या घरी आला आणि एका नवीन नाट्यप्रयोगाचे दोन पासीस आणून एक मला देत म्हणाला,
“तुम्ही तुमच्या वेळात जा.मी थेट नाट्यगृहात येतो.”
मी त्याला लागलीच म्हणालो,
“वेळेवर ये रे बाबा!”

ललित ऐकून हसला.हो म्हणण्यात अर्थ नाही हे त्याला माहित असावं.
आणि व्ह्यायचं तेच झालं.मी वेळेवर पोहोचून त्याची वाट पहात होतो.नाटकाच्या तीन घंटा होईपर्यंत साहेबांचं येण्याचं काही लक्षण दिसेना.मग मी आत गेलो आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर एक पुस्तक ठेऊन दिलं.त्याची वाट पहात होतो.शेवटी हे महाभाग एक प्रयोग झाल्यानंतर आले.
“काही नाही रे! प्रायोगीक नाटक होतं.एव्हडी धडपड करून येण्यात काही मला गम्य वाटलं नाही.”
असं मला नाक वरून करून म्हणाला.
मी मनात ठरवलं ह्या ललितला एकदा विचारून टाकायाचंच.
“तू कधीच वेळेचं भान का ठेवीत नाहीस?”

आम्ही जेव्हा दिल्लीला दोघे मिळून ऑफीसच्या कामाला जायचो,त्यावेळी फ्लाईट सुटे पर्यंत ललित दिसायचा नाही.आणि शेवटी विमानाचे दरवाजे बंद करायची वेळ आल्यावर हे गृहस्थ धावत धावत यायचे. मला कधी कधी फ्लाईटवरच्या एअर लाईन्सच्या लोकांना सांगावं लागायचं की,जरा थांबा.

कधी कधी आम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळा विमानातून जावं लागायचं त्यामुळे एअर लाईन्सच्या लोकल स्टाफशी तोंडओळख चांगली होती.
त्यामुळे मी सांगीतलेलं ते लोक काही प्रमाणात ऐकायचे.आम्ही दोघे एकदा दिल्लीहून मुंबईला परत येत होतो.फ्लॅईट दोन तास लेट झाली होती.

टाईमपास म्हणून मी ललितला माझ्या मनात खात असलेला प्रश्न विचारला.
“ललित तुला कुठच्याही गोष्टीला वेळ का लागतो?”
माझा प्रश्न ऐकून, मला ललित म्हणाला,
“तुम्ही असं कधीतरी मला विचारणार ह्याची खात्री होती.आपल्याला आता चर्चा करायला भरपूर वेळ आहे. तुमचा प्रश्न मला आवडला.असं बघा,
सूर्योदय आणि सूर्यास्त रोज होत असतो.दिवसा दिवसातला फरक दाखवला जातो.म्हणून काही निसर्गाकडून एखाद्या दगडावर सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ कोरून ठेवलेली नसते.जर का निसर्गाने प्रत्येक फुलाला उमलवलं असतं,प्रत्येक झाडाला उगवलं असतं,प्रत्येक समुद्राच्या लाटेला ठरावीकच वेळी किनार्‍यावर आणून फुटवलं असतं,तर मग मी वेळेचं महत्व मानलं असतं.असं होत नसल्याने, तोपर्यंत, वेळेच्या सभोवती घुटमळत रहाण्याची गरज असावी असं मला वाटत नाही.

मी ज्यावेळी व्यायाम घेण्यासाठी बाहेर चालायला जात असतो त्यावेळी हाताला घड्याळ कधीच बांधत नसतो.बरोबर सेल फोनही घेऊन जात नसतो.माझा व्यायाम अर्ध्या तासात होवो वा दोन तास लागोत, मला समाधान होई तोपर्यंत मी चालत रहातो,किंवा आणखी चालायला काळोख खूपच व्ह्यायचा असेल तर त्यानंतर चालत नाही.किती वेळ झाला आहे किंवा कुणी माझ्यासाठी वाट बघत आहे ह्याची मी फिकीर करीत नाही.मी जेव्हडा चालतो तिच माझी वेळ.”

मी ललितला म्हणालो,
“वेळ साधली नाहीस तर तुझी बरेच वेळा कुचंबणा होत असेल नाही काय?”

“काय करणार? Old habits die hard तसं काहीसं आहे.”
असं सांगून ललित पुढे सांगू लागला.
“मी माझ्या शाळेतली एकरा वर्षं अशीच काढली.सकाळी लवकर सहाला उठायचं,आणि शाळेत जाण्यापूर्वी जरूरीची सर्व कामं करून घ्यायचो.आईने दिलेला खाण्याचा डबा दप्तरात ठेव,जरूरीची पुस्तकं घे,आमच्या घरात असलेल्या पोपटाला एक लाल मिरची आणि एक पेरू पिंजर्‍याचं दार हलकेच उघडून त्यात ठेव वगैरे.

पेन्सिल घेऊन कागदावर जरूरीची कामं लिहून ठेव,अशातला मी कधीच नव्हतो.उलट मी नेहमीच उशीरा येणारा म्हणून जाणला जायचो.मला “लेट ललित” म्हणायचे.एकदा काम हातात घेतल्यावर ते संपवायला किती वेळ लागेल हे मला कधीच माहित नसायचं.स्पष्टच सांगायचं तर असं करण्यात विशेष काही आहे याची मी कधीच कदर केली नाही.अशावेळी आमच्या बाहेर बांधून ठेवलेल्या मोत्याला पाण्याची गरज लागली असेल किंवा आईने शेजारच्या दुकानातून डझनभर अंडी आणायलाही सांगीतलं असेल तरी मला चालतं.

आमची शाळा बरोबर सकाळी आठ वाजता भरायची.शाळेत वेळेवर जाण्याची माझी मोठी समस्या असायची,आणि त्याबद्दल मला खूपच लाज वाटायची.अंगात एव्हडी क्षमता आणून मी जे करीन त्यात आनंद मिळण्यासाठी वेळेशी मी कधीच समझोता केला नाही.

पुढे कॉलेजात गेल्यावर मी,आमच्या फुट बॉल टीममधे होतो.एकदा फुटबॉलचे सामने होते.मी नेहमीप्रमाणे शाळेच्या मैदानावर उशीरा पोहोचलो.
माझ्या ऐवजी दुसर्‍या भिडूला घेऊन मला खेळ संपेपर्यंत बाकावर बसायला लावलं.ह्या गोष्टीचा मला रागही आला नव्हता किंवा मी निराशही झालो नव्हतो.

मला आठवतं माझ्या जन्म दिवशी माझ्या वडीलांनी मला एक सायकल घेऊन दिली होती.मला रोज कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी ती दिली होती.आम्ही त्यावेळी शहराच्या बाहेर रहात असल्याने मला माझी सायकल घेऊन शहरात हुदडायला मिळत नव्हतं.
तो दिवस मला आठवतो.तो शनिवारचा दिवस होता.त्या दिवशी उत्तम ऊन पडलं होतं.मला त्यादिवशी माझी सायकल घेऊन कॉलेजमधले सामने पहायला जाण्याची हुक्की आली.घरून निघताना माझी सायकल मी हळू हळू चालवत होतो.वेळेवर कॉलेजच्या मैदानवर पोहचणार नाही असं वाटल्यामुळे मी जोरात पॅडल्स फिरवीत जायला लागलो.पण वेळेवर जायला जमलं नाही.माझ्या एका मित्राने मला त्याच्या गाडीतून घरी
पोहचवायला मदत करण्याचा प्रस्ताव दिला.मला ते ऐकून कससंच वाटलं.

तो इतका आनंदायी दिवस होता.घरून निघताना फक्त सामने पहाण्याचा एव्हडाच माझा उद्देश होता. मित्राच्या गाडीतून जाण्याऐवजी मला माझ्या सायकल वरून अगदी सावकाश घरी जायचं होतं.कारण सकाळी सामने पहायला निघाल्यावर वेळेवर पोहचण्यासाठी मला वेड्यासारखं घाई घाई करत यावं लागलं होतं.त्यामुळे शहरात हुदडायला मला मिळालं नव्हतं.ते आरामात मी साध्य करणार होतो.

आपल्या सर्वांना जगण्यासाठी फक्त एकदाच जीवन मिळत असतं. मी समजू शकतो की पूर्व नियोजीत कार्यक्रमाला वेळेवर हजर रहाणं अगदी अगत्याचं असतं.पण गावातून शहरात जाताना,इतर लोकानी त्यांच्या घरासमोर केलेल्या सुंदर बागेतल्या सुगंधी फुलांचा वास घ्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. असं त्यावेळी मला वाटायचं.

खरंतर प्रत्येक जण त्याच्या उद्यासाठी एव्हडा घाईत असतो की,त्याला त्याच्या आजच्या दिवशी त्याच्याच अवतिभोवती असलेल्या सुंदर फुलांचे ताटवे बघायला अवधी नसतो.
म्हणूनच मी विचार करीत असतो की,सदासर्वकाळ मी वेळेवर पोहोचायला उशीर करीत असेनही,पण एव्हडं मला माहित झालं आहे की,शेवटी असं करण्यासाठी माझ्या जीवनातल्या दुसर्‍या काही गोष्टींची मी फारकत तरी करीत नाही.
म्हणूनच मला वाटतं की कुणीही वेळेसभोवती घुटमळत राहू नये.”

हे ललितचं सर्व ऐकून मला गंमत वाटली.तेव्हड्यात फ्लाईट-बोर्ड होत असल्याची अनाऊन्समेंट झाली. उठता उठता गंमत म्हणून मी ललितला म्हणालो,
“आत्ता ही फ्लाईट लेट असल्याने,तू मात्र वेळेवर आला आहेस.”
त्यानंतर आम्ही दोघेही हसत हसत गेटवर जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com