Friday, December 9, 2011

झाडा संगत चालणं.


झाडा संगत चालणं.

"मला आता समजून आलंय,माझे आजोबा जीवनाच्या महासागरातून स्वतःचा कसा बचाव करीत राहिले.माझी खात्री आहे की त्यांच्या जवळचा तो रानातल्या वातावरणाचा खजिनाच अंधारातली प्रकाश ज्योत होती."

प्रवीणचे आजोबा फॉरेस्ट ऑफीसर होते.त्यांची कारकीर्द रानात,जंगलात रहाण्यात गेली.प्रवीण अगदी लहानपणापासून आपल्या आजोबांच्या सहवासात होता.त्यामुळे त्याच्यावर जे आजोबांकडून संस्कार झाले होते ते जास्त करून निसर्गसृष्टी संबंधानेच होते.आता निवृत्त होऊन प्रवीण कोकणातल्या एका खेड्यात कायमचा रहायला गेला होता.त्या खेड्यातल्या निसर्गसृष्टीवर तो जास्त आकर्षित होता.खेड्याच्या भोवतालची डोंगरांची रांग आणि भरपूर पाऊस पडत असल्याने डोंगरावरची रानं त्याला खूपच भावली होती.

मी त्याच्या घरी गेलो असताना मला त्याने आग्रहाने आपल्याबरोबर रानात फिरयाला नेलं.रानातून पायवाटा काढत चालत असताना मला प्रवीण सांगत होता,
"मी आता कधी रानात फिरत असतो तेव्हा माझ्या आजोबांबद्दलच्या आठवणी अगदी आजच्या आजच्या वाटतात.गोचिड जशी कुत्र्याच्या अंगावर चिकटून असते तसंच मी माझ्या आजोबांबरोबर माझ्या लहानपणापासून असायचो.माझ्या आजोबांनी काहीतरी त्यांच्याजवळ राखून ठेवलंय ते मी प्रयत्नपूर्वक हळूहळू जमा करावं असा विचार मनात येऊन तसं करीत होतो.फिरताना आम्ही बोलत असायचो.शब्दाशब्दामधे जे बोललं जायचं आणि ज्याचा विचार व्हायचा त्यातलं गहन असलेलं असं काहीतरी  मी निवडून ठेवीत असायचो.रानातला वातावरणातला खजिना त्यांच्याजवळ असायचा आणि त्यामुळे त्याचं मन शांत असायचं.

मला माझे आजोबा सांगायचे,
"माझ्या जीवनातल्या नोकरीच्या काळात,जेव्हा मी रानात रहायचो,तेव्हा मी माझ्यावरच जबरी आणून घरातला अंधार टाळण्यासाठी बाहेर रानात फिरायला जायचो.हेतू हाच होता की रानातल्या झाडांच्या आकर्षणाने मी पुढे पुढे जात रहावं. 

रानातल्या अनेक प्रचंड वृक्षांचा सन्नाटा जणू झोपलेल्या मुलाच्या अंगावर पांघरूण घातल्यासारखा वाटायचा.त्या शांत वातावरणाने मनात धीर यायचा.हृदय मंद होऊन अंगातल्या नसा वेदनाशामक व्हायच्या.

त्या वातावरणात मला एकप्रकारचं बळ यायचं.मनात यायचं की कुणालाही, जाऊदे,आसो म्हणावं.माफ करावं.समर्पण करावं आणि शेवटी माझा मी खरा कुणासाठी सावली होण्यापेक्षा प्रकाश व्हावं.त्याचं कारण असं की, मला जाणीव झाली होती की जीवन हे एक नुसतंच परिश्रम नसून,झर्‍यासारखी निवांत वहाणारी लय असावी,पूर्ण असावं,सुंदर असावं.हे सर्व 
माझ्यात भिनल्यासारखं झालं.आणि रानातून बाहेर पडल्यावर रानातलं वातावरण हा एक खजिना समजून माझ्याच जवळ मी ठेवला होता. त्यामुळे काही गोंधळ झाला असताना तो खजिना माझ्या जवळ आहे ह्याबद्दल मी जागृत असायचो शिवाय माझ्या अंगातली प्रत्येक पेशी खजिना असल्याच्या आनंदाने गुंजन करयाची. 

मला माहित होतं की हे वातावरण माझ्यासाठीच एकमात्र नव्हतं.झाडांमधे एव्हडी क्षमता असते की कुणलाही त्याचा प्रताप मिळू शकतो."

नंतर आपल्या आजोबाबरोबर रानात फिरताना आठवणीत असलेल्या गोष्टी सांगताना प्रवीण मला म्हणाला,
"आम्ही रानात फिरफिर फिरायचो.नेहमीच मी त्यांच्या मागे 
पाठलाग केल्यासारखा असायचो.काहीवेळा झाडावरच्या फांद्या फांद्यामधे जाळी बांधून त्यात लटकणारे कोळी माझ्या केसात अडकून रहायचे.
माझे आजोबा नावानीशी प्रत्येक झाड ओळखायचे.
मला वाटतं ती माहिती त्यांना सुसंबद्धतीत आणि पूजनीय वाटायची.

मला आठवतं,एकदा माझ्या आजोबांनी,रानटी झाडावरून झरकन पळत जाणारी इवलिशी खार मला दाखवली.ती झाडावर चढत असताना तिच्याकडे निरक्षून पहात होतो.शेवटी तिचा माग संपून ती दिसेनाशी होईपर्यंत आमची मान आम्ही वर करूनच होतो.
ही आठवण त्या क्षणापासून आतापर्यंत माझ्या मनात चिकटून आहे.माझ्या अंतर्मनात दडून बसली आहे.

माझे आजोबा मला सांगायचे की त्यांच्या सोळा वर्षापासून ते असे रानात भटकत असायचे.जरूरी वाटली तर ते दिवसभर श्रम घेऊन पायवाटा बनवायचे.त्यामुळे कुणालाही रानातून सहजपणे चालता यावं.त्यानी स्वतःहून अनेक झाडं आणि त्यांचे रोप लावले आहेत.ती झाडं आता वृक्ष झाले आहेत.
त्यांच्या पेक्षाही प्रचंड असलेल्या कसल्यातरी गोष्टीचे ते एक अंश म्हणून आहेत असं ते स्वतःला मानायचे.हाच रानातला खजिना ते स्वतः जवळ बाळगायचे.माझ्या आजोबांनी खूप मोठी दाढी वाढवलेली होती.दाढी करण्यात वाया जाणारा वेळ त्यांनी वाचवला असं ते म्हणायचे.

मला आता समजून आलंय,माझे आजोबा जीवनाच्या महासागरातून स्वतःचा कसा बचाव करीत राहिले.माझी खात्री आहे की त्यांच्या जवळचा तो रानातल्या वातावरणाचा खजिनाच अंधारातली प्रकाश ज्योत होती.आणि ते प्रकाशात असताना अंधाराची आठवण आपल्या जवळ बाळगून असायचे.ह्या विरोधाभासात प्रकाश आणि अंधार ह्या दोन्ही गोष्टींच्या परिमाणाबद्दल त्यांच्या मनात असहमति असायची.पण त्या दोनही गोष्टींचा मेळ बसवून ते त्यातून बोध घ्यायचे.पण तो बोध क्षणभराचा असायचा.खरंच ते रानातल्या झाडासारखेच असायचे.त्यांच्या मनातला संदेश माझ्या कानात कुजबुजल्या सारखा व्ह्यायचा.फक्त मला निःशब्द राहून गोंगाट न होऊ देता तो संदेश ऐकण्याचं काम करावं लागायचं.

मला ते नेहमी म्हणायचे,
"रानातल्या झाडावरच्या जाळ्यातल्या प्रत्येक कोळ्याबरोबर मी समझोता केला आहे.त्याचबरोबर सतत निर्माण होत राहिलेल्या निसर्ग सृष्टी्वर माझी श्रद्धा आहे.रानातला एक वाघ व्यतीत झाला तरी एक जीवन नवनिर्माण होतं.एक नदी गायब झाली तरी नव्या सागराला जन्माला यावं लागतं."

प्रवीण हे सर्व सांगत असताना आम्ही त्या रानातून किती मैल चाललो ह्याचं भानच राहिलं नाही.मला एव्हडं चालायची सवय नसल्याने.माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी काढून काढून सांगत होता.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com