Saturday, December 3, 2011

जीवनातलं परिवर्तन.


“जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं.परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.”

पद्मजा,गिरीजा आणि तनुजा ह्या पटवर्धनांच्या तीन मुली.
पटवर्धनानी त्यांना उत्तम शिक्षण दिलं.मोठ्या दोन मुलींची लग्नपण करून दिली.आणि एकाएकी ऐन उमेदीत असताना पटवर्धनाना मोठा हृदयाचा धक्का येऊन त्यातच त्यांचं निधन झालं.

पटवर्धनांच्या पत्नीला हा धक्का सहन झाला नाही.तिने अंथरूण धरलं.तनुजाने आपल्या लग्नाचा विचार सोडून दिला.आईची सेवा करण्यासाठी तिने आपलं उर्वरित आयुष्य खर्ची घालायचा पक्का निर्णय घेतला.

मी पटवर्धनांकडे अधुनमधून जातयेत असायचो.तनुजाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी तिला बरेच वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“आईची सेवा दुसर्‍या कुणाकडून करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.जिने आपल्याला या जगात आणलं,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना माझ्या जीवनात दुसरी कसलीही मजा मला आनंद देऊ शकणार नाही.”
असं मला तनुजाने एकदा सांगीतलं होतं.मी पण तिच्या ह्या म्हणण्यावर खूप विचार केला होता.

मी तनुजाला एकदा म्हटल्याचं आठवतं,
“जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.”

सेवा करीत असताना जेव्हा जीवनात परिवर्तन येत असतं त्याचा अनुभव कसा वाटतो ते मला सांगावं असं मनात आल्याने ह्यावेळेला मी तिला भेटायला गेलो होतो त्यावेळेला तनुजा मला सांगत होती.

“येत रहाणार्‍या परिवर्तनाचा स्विकार करणं आणि ते अंगीकारणं ह्याची आपल्या अंगात क्षमता असणं हा एक आपल्या जवळ असलेला खजिना आहे असं मला वाटतं.

गाडी काढून गावोगाव फिरायला जाणं,पालक बनणं,जॉब बदलणं,घर बदलणं त्यापुढे जाऊन जीवनाचा दृष्टीकोन बदलणं,जीवन आरामदायी आहे आणि सुरक्षीत आहे मग धडपड कशाला हवी?,आहे त्यात स्थिर होऊन रहाणं ह्या असल्या गोष्टी काहींना सुखकर वाटतात.

माझ्या लहानपणी मला व्यवस्थितपणे रहाण्याची आणि कुठच्याही गोष्टीची ठोस माहिती असावी ह्या गोष्टींची तीव्र इच्छा असायची.बर्‍याच मुलांना ती असते.माझ्या तीन बहिणींनी आणि मी जीवन कधीच कंटाळवाणी करून घेतलं नाही.असं करण्याचा एक भाग म्हणजे माझी आई.ती सतत बिछान्यावर झोपून असते.आश्चर्य म्हणजे माझी आई मला प्रेरणा आहे.वातावरण आनंदाचं असो वा दुःखाचं, माझ्या आईचं कोलाहलाचं जीवन असल्याने तिचं ते जीवन कोणत्याही परिवर्तनाभोवती फिरायला अक्षम आहे.तिच्या आजारावर दिलं जाणारं औषधच मात्र तिच्या प्रखर किंवा निम्न विचाराना परावृत्त करणारं ठरतंय.ह्या औषधापायी तिला,खूपच शांत रहायला,खूपच बेचैन व्ह्यायला,खूपच थकून जायला,खूपच जागरूत रहायला,खूपच भावुक व्हायला, खूपच संयमशील रहायला अटकाव येतोय. खरोखरंच,औषधामुळे तिचं अस्तित्वच नाकारलं जात आहे.

माझ्या पूर्‍या जीवनात माझ्या आईला मी संघर्ष करताना पाहिलं आहे.आत्ता तिच्या सहासष्ट वर्षावरच्या उतार वयात तिच्या डोळ्यात रिक्तता आणि खिन्नता दिसून येते.ती मला सांगते की तिच्या अतिमहत्वपूर्ण भावना म्हणजे,रटाळ जीवनाशी चिकटून रहाणं,कुणाशीही मैत्री करण्यात पुढाकार न घेण्याची वृत्ती ठेवणं नवीन काही शिकायलापण हिरीरी नसणं.तिला आठवतं,उत्साहपूर्ण रहाण्याचं,धुंदफुंद रहाण्याचं तरूण वयातलं आत्यंतिक धडपडणं,ती औषधं घेत राहिल्याने संपूष्टात आलं.तिचं आयुष्य आता स्थिर झालं आहे आणि अंगातली ठिणगी विझून गेली आहे.तिच्या जीवनात परिवर्तन असावं अशी जरी तिची तीव्र इच्छा असली तरी तिच तिची मोठी भीती झाली आहे.

ज्या खडतर परिस्थितीतून माझी आई जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात मी हतबल होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार. जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्‍या परिवर्तनाने जो भरदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुरभाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.

हे तितकच खरं आहे की,परिवर्तनातून मिळणारे धडे शिकायला जरा कठीण असतात.जीवनात पुढे पुढे सरकण्यासाठी तो धोका पत्करायला माझी तयारी आहे.कारण त्याच्या बदल्यात मिळणारं इनाम विस्मयकारक असतं.ह्या परिवर्तनामुळेच माझं काही चुकलं असेल तर ते मान्य करायला मला धीर येतो.कुणाला मी दुखवलं असेन किंवा कोण, कोणत्या दृष्टीकोनातून बोलत असेल ते समजून घेण्यात मी असफल झाली असेन अशावेळीही माझी चुक कबुल करायला मला धीर येतो.जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं. परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.

परिवर्तनातल्या गोष्टी अज्ञात असल्याने काही प्रमाणात परिवर्तनाची भीती वाटते. पूर्वानुमान काढण्याच्या क्रियेला हे परिवर्तन बाधा आणते.पण माझ्या आईच्या नीरसता आणि निश्चलता ह्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या आईच्या परिस्थितीची मला आठवण येते.

आईला लागणार्‍या कष्टांची आठवण येते.त्यामुळे मी परिवर्तनातल्या अज्ञात गोष्टींना जास्त संमत्ती देते.कारण परिवर्तनातल्या अज्ञात परिस्थितीत चाणाक्ष राहिल्यास उपचार,आशा आणि नवजीवन मिळण्यासाठी येणार्‍या संधीच्या गुंत्याला उकलता येतं.माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे.”

तनुजाने तिच्या आईची इतकी वर्षं सेवा करीत असताना घेतलेल्या अनेक अनुभवातून जीवनातलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातली अज्ञानता ह्याची तुलना आणि जीवन जगत असताना पूर्वानुमान काढून जगण्यात वाटणारी मजा ह्या मधला फरक फारच सुंदर शब्दात सांगीतला.मी तिची पाठ
थोपटली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com