Thursday, December 15, 2011

निचे मुंडी नाणी धुंडी



निचे मुंडी नाणी धुंडी.

"मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?"


विनयला रस्त्यातून चालताना पाहिलं की तो नेहमीच मान खाली घालून चालताना दिसतो.अर्थात अधून मधून लांबवर पहाण्यासाठी मान उंचावून पहात असतो.कुणी ओळखीचा येताना दिसला की वेळीच मान वर करून त्याच्याशी संपर्क साधतो.
रस्त्यातून चालत जाताना प्रत्येकाची स्टाईल असते म्हणा.
कोण ताठ मानेने चालतो,कोण सारखा इकडे तिकडे बघत चालतो,कोण चेहरा हसरा ठेवून चालत असतो तर कोण दूर्मुखलेला चेहरा ठेवून चालत असतो.
विजय बरोबर चालत असताना तो मान खाली घालून चालत असतो आणि मी सरळ मान ठेवून चालत असतो.बरेच वेळा विजयबरोबर चालत असताना मी पाहिलंय, एखाद वेळी तो मधेच थांबून मातीतली एखादी चकचकीत दिसणारी वस्तू उचलून निरखून पहातो.तसंच वाटलं तर तोंडाने त्यावर फुंकून किंवा  हाताने साफ करून पहातो ते एखादं नाणं असेल तर सरळ खिशात ठेवून देतो.


एकदा असाच मी त्याच्याबरोबर जात होतो.रस्यात पार्क केलेल्या मोटारीला पास करून चालताना विनय गाडीच्या बंद दरवाज्याजवळ थांबला आणि एक पन्नास पैशाचं नाणं उचलून खिशात टाकून माझ्याकडे बघून हसला.
मला म्हणाला,
"बहुतेक मोटर मालकाचं चावीचा घोस काढताना त्याच खिशातल्या सुट्ट्या पैशातलं हे नाणं पडलं असावं."


माझ्या चेहर्‍याकडे बघून त्याला काय वाटलं देव जाणे.मला लागलीच सुदेश हॉटेलकडे बोट दाखवून म्हणाला, 
"चला आपण एक एक कप चहा मारूया"
मला उगाचच वाटलं की आताच मिळालेल्या पन्नास पैशात भर टाकून मला विनय चहा पाजायच्या विचार आहे की काय? पण त्याच्या मनात काही निराळच होतं.


मला म्हणाला,
"तुमच्या चेहर्‍याकडे बघून मला वाटलं की तुम्ही मला नक्कीच त्या पन्नास पैशाच्या नाण्याबद्दल विचारणार.तुमच्याशी निवांत बसून माझ्या ह्या सवयीची पार्श्वभुमी लगेचच सांगावी म्हणून म्हटलं चहाच्या कपावर बोलावं." 


चहा बशीत ओतून फुंकर मारून सुर्र आवाज काढून प्याल्यानंतर मला म्हणाला,
"एखाद्या दुकानाच्या दारात उभं राहून समोरच भरलेल्या आठवड्याच्या बाजाराच्या दिशेने पाहू लागल्यास ठिकठिकाणी एकच वयस्कर व्यक्ति मान खाली वाकवून काहीतरी हरवलंय ते शोधतोय असं वाटेल.हातात एक खाकी रंगाची पिशवी,पायात जुन्या वहाणा घालून पाय घासत घासत जाण्याची चाल,अधूनमधून थांबल्यासारखं करून काहीतरी मिळालं या आशाने ती व्यक्ती जमिनीकडे नीट न्याहाळून पहाताना दिसते.माझं नातं सांगायचं झाल्यास तो माझा दूरचा मामा म्हटलं तरी चालेल.सर्व त्याला मामाच म्हणायचे."


विनयने आपली जुनी आठवण मला सांगायला सुरवात केली.पुढे म्हणाला,
"इतक्या लांबून ह्या व्यक्तीकडे पाहिल्यावर,ह्या विचित्र दिसणार्‍या म्हातार्‍याने,माझा वयक्तिक विश्वास प्रेरित केला आहे अशी कल्पना करणही कठीण आहे. 
मी स्वतः त्याला मामाआजोबा म्हणतो.बाकी लोक काहीही म्हणोत.आमच्या गावात आठवड्याचा बाजार भरतो.आजुबाजूच्या गावातली मंडळी ह्या बाजाराला येतात तसंच विक्रेकरही आपला माल घेऊन या बाजाराला येतात.ऐन दुपारी तर फारच गर्दी ह्या बाजारात असते.


एकदा झालेल्या घटनेची मला आठवण आली.मी माझ्या ह्या मामाआजोबाला माझ्या स्कुटरच्या मागे बसवून ह्या बाजाराला आलो होतो.माझ्या स्कुटरचं मागचं चाक म्हणजे त्या चाकाचा टायर अलीकडे कमी हवा आहे असा दिसायचा.म्हणून बाजारातल्या एका टायरच्या दुकानात स्कुटर दुरस्त करायला म्हणून दिली.दुकानदाराने स्कुटर ठाकठीक व्ह्यायला एक तास तरी लागेल म्हणून सांगीतलं.


मी मामाआजोबाकडे पाहिलं.
"काही हरकत नाही."
असं सांगून नुकताच भरत असलेल्या बाजाराकडे बोट दाखवून आपण तिकडे जाऊया असं तो मला म्हणाला.मी त्याच्या बरोबर रस्ता ओलांडून तो म्हणाला तिकडे जायला निघालो.


शनिवारची सकाळची वेळ होती.अजून बाजारात विशेष गर्दी झाली नव्हती.समोरच एका चहाच्या दुकानात आम्ही दोघे गेलो आणि मी मामाला म्हणालो,
"आत जाऊन मी दोन प्लेट बाटाटेवडे आणि दोन चहाची ऑर्डर देतो."
दुकानात प्रवेश करून मी मागे वळून पाहिल्यावर माझा मामाआजोबा मला दिसेना.बाजार भरला होता त्या जागी भरभर जाऊन काही हरवलंय ते शोधत आहे अशा पोझमधे मला दिसला.
मी भरभर त्याच्या जवळ गेलो तेव्हा मला म्हणाला,
"सकाळ सकाळचा पहिला लाभ"
मातीत मळलेली गुळगुळीत झालेली पावली,म्हणजेच पंचवीस पैश्याचं नाणं मला दाखवत होता.पुढचा एक तास स्कुटर तयार होईपर्यंत आपण नाणी शोधूया असं मला म्हणाला.


"घाई घाईत काही लोकांच्या खिशातून अशी ही नाणी खाली पडतात.काही लोक पडलेलं नाणं उचलून घ्यायची मेहनतपण घेत नाहीत.एकाच खिशात नाणी आणि चाव्याचा घोस ठेवल्यावर चाव्या काढताना एखादं नाणं पडतं, असं हटकून घडतं.कसं का असेना त्यांची नुकसानी म्हणजे आपला फायदाच म्हणावा लागेल."
असं मला समजावून सांगत होता.


मी मामाआजोबाचा तर्काआधार घेऊन त्याच्या म्हणण्याशी सहमत झालो नसलो तरी असा एक तास घालवण्यासाठी राजी नव्हतोच.दोन चार नाणी मिळण्यासाठी मी त्याच्याशी,त्याचं मन राखण्यासाठी काहीसा कबुल झालो होतो.आणि ह्यातूनच आमच्या ह्या प्रथेला सुरवात झाली हे नक्कीच.
त्यानंतर आम्ही दोघे बरोबर असताना कुठेही गर्दीच्या ठिकाणी काही वेळासाठी अडकलो गेलो असलो की अशी खाली पडलेली नाणी शोधून काढण्यासाठी वेळ घालवत असायचो. 


त्यानंतर केव्हातरी मी आमच्या ह्या रिवाजाचं मोठं चित्र डोळ्यासमोर आणून पहात होतो.माझा मामाआजोबा जरी अगदीच श्रीमंत नसला तरी एरव्ही तो करत असलेल्या कष्टातून एव्हडी मिळकत कमवायचा की त्याच्या कुटूंबाला तो सुखात ठेवायचा.त्याला रस्त्यातली ही पडलेली नाणी जमा करायाची जरूरी भासत नसायची.
मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?त्यासाठी मी माझ्या मुल-सिद्धांतासाठी माझं तत्व-ज्ञान विचारात आणून मला त्याचं उत्तर मिळतं का पहात होतो आणि ते मिळालं.


एक म्हणजे,
सतत कार्यरत रहावं.फाल्तु वेळ दवडण्यापेक्षा उठावं आणि फिरावं.आमच्या घराण्यात हृदय विकाराची उदाहरणं आहेत.जितकं म्हणून मी कमी बसून राहिन तितकं माझ्या टिक-टिकणार्‍या घड्याळाला बरं आहे. 

दुसरं म्हणजे,
संधी सापडण्यासाठी डोळे उघडून शोधात असावं.एका पावलीने मी गरीब रहाण्यापेक्षा एका पावलीने मी श्रीमंत राहिन.पण तसं करायला मी जर लक्ष दिलं नाही तर ते श्रीमंत होणे नलगे.

तिसरं म्हणजे,
काहीतरी उद्देश ठेवून रहावं.मग तो उद्देश कितीही साधा असू द्यात.आपलं मन त्यात व्यग्र करावं.वचनबद्ध असल्याशिवाय यश प्राप्ती कशी व्हायची?

आणि शेवटी,
अनुमान काढायला घाई करू नये.
हे म्हणायला एक कारण झालं.खरंच,तो इतराना अनोळखी दिसणारा बाजारात मान खाली घालून फिरणारा म्हातारा, दिसला जरी विचित्र तरी त्याच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे त्यानेच ती शंभर रुपयाची नोट दुसर्‍या जागेतून हुडकून काढली जी मी खात्रीपूर्वक सांगत होतो की माझ्या जीनमधल्या पुढच्या खिशात सापडणार म्हणून.मी असं सांगून वाद घालत होतो.पण माझं अनुमान चुकलं होतं.


मला वाटतं अशी ही बरीचशी हरवलेली नाणी इतस्तः पडलेली असणार.आपल्या प्रत्येक जणाची त्यावर मालकी असावी,पण ती नाणी आपली होण्यासाठी आपण त्यांच्या शोधात असलं पाहिजे."

विनयचं  हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"तुझे हे विचार मी आज जर ऐकले नसते तर तुझ्या ह्या सवयीचा मी भलताच अर्थ काढून बसलो असतो.
निचे मुंडी पाताळ धुंडी असं म्हणण्या ऐवजी
तुझ्या बाबतीत,
निचे मुंडी नाणी धुंडी असं म्हटलं तर गैर होणार नाही."

वेटरला बिल घेऊन येताना पाहून विनयने चहाचं बिल देऊन झाल्यावर ते गाडीजवळ मिळालेले पन्नास पैसे त्या वेटरला टीप म्हणून दिले.आणि कुतूहलाने माझ्या चेहर्‍याजवळ टक लावून पहात होता. 




श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com