Monday, December 12, 2011

त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.


त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.

"एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"

माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी
काढून काढून सांगत होता.
मला म्हणाला,
"पहाटेच माझ्या आजोबाबरोबर रानात फिरायला जायला मला आवडायचं.आम्ही जायचो ते रान म्हणजे काहीतरी अलौकिक शाश्वत अशी ही जागा आहे असं वाटायचं.उन्हाळ्याच्या दिवसात माझे आजोबा ह्या ठिकाणी असलेल्या तळ्यातून गोडे मासे गळाला लावून पकडायचे.जांभळीच्या झाडावरून जून टपोरी जांभळं,झाडावर गड्याला चढवून त्याच्याकडे सुंभाने बांधलेली टोपली देऊन त्या टोपलीत जमवलेली ती फळं टोपली भरल्यावर फांदीवरून घरंगळत टोपली खाली आल्यावर एका गोणपाटाच्या पिशवीत रसबाळ जांभळं निवडून घरी आणायचे आणि त्या जांभळांचा रस काढून आम्हा सर्वाना तो ताजा रस प्यायला द्यायचे.
"हा रस जो पितो त्याला मधुमेह होणार नाही."
असं नविसरता सांगून टाकायचे.आणि स्वतः पेलाभर रस प्यायचे.आजीलापण एक कप रस प्यायला द्यायचे.हा रस पिल्यामुळे असेल किंवा कसं पण माझ्या आजी आजोबांना शेवटपर्यंत मधुमेह झाला नाही.आजोबाना गोड आवडायचं नाही.पण रोज दुपारी चहात दोन चमचे साखर टाकून चहा प्यायचे मात्र.
 
मॅट्रिकची परिक्षा पास झाल्यावर मी गावातल्या शाळेत थोडे दिवस शिक्षक म्हणून काम करायचो.माझ्या आजोबांबरोबर ह्या रानात आल्यावर मात्र ह्या दिवसात मी शाळेच्या वेळापत्रकाला नजुमानता रहायचो.
माझ्या ह्या शिक्षकाच्या व्यवसायात आता मी जेव्हडा विचार करीत नसेन त्यापेक्षा कितीतरी जास्त त्या पहाटेच्या वेळी आजोबांबरोबर असताना मी विचार केला असेन.

अलीकडे मी जेव्हा ह्या रानात फिरायला येतो तेव्हा माझ्या मनात विचार येतात,
मी जो काही आता झालो आहे ते पाहून माझ्या आजोबानी माझ्याबद्दल अभिमान वाटून घेतला असता का?
त्यांना जे दुःख झालं ते दुःख त्यांना होणार होतं हे माहित होतं का? जेव्हा माझी आजी ह्या पावसाळ्यात त्यांची वर भेट घ्यायला गेली.
मरण येईतोपर्यंत आपण रहात्या घरातच रहाणार असं वचन आजोबांना दिलेल्या आजीला ते शक्य झालं नाही,ते शक्य होणार नाही हे त्यांना माहित होतं का?

आता जे राहिलं आहे ते रान त्यांचीच आठवण आहे.रानात नव्या पायवाटा काढणं,पक्षांची घरटी शाबूत आहेत ते पहाणं,नसल्यास त्याची जुजबी डागडूजी करणं,तळ्यात मास्यांची पैदास वाढवणं,जांभळांचा वापर करणं हा सगळा माझ्या आजोबांचा वारसा होता.आजीचा घर संभाळण्याचा वारसा होता.त्यात घराची साफसफाई,न्हाणीघरं,संडास स्वच्छ करून घेणं,आल्यागेल्या पाहूण्य़ांची बडदास्त ठेवणं अशी सर्व कामं असायची.

रानातल्या माडाच्या झाडावरून गड्यांकडून  नारळ उतरवून घेऊन त्या नारळांची रास पडवी जवळच्या एका खोलीत जमा करून दुसर्‍या आठवड्याला गण्या आणि बारक्याला निरोप देऊन त्यांच्याकडून सुळक्यावर नारळ सोलून घेऊन नारळ निराळे आणि सोडणं निराळी करून सोडणांची रास पडवी समोरच्या अंगणात सुकायला ठेवून वर्षभर ही सुकी सोडणं इंधन म्हणून वापरायची हाही वारसा माझ्या आजोबांकडूनच आला.

तुरीचं पिक आल्यावर भागेली गोणपाटाच्या गोण्यातून तु्र आणून आजी़च्या हवाली करायचे.गोण्यातल्या तूरी पडवीत ओतून घेऊन पायलीच्या मापाने तूरी ्भा भागेल्यासमोरच मापून घ्यायची. पहिल्या पायलीच्या मापाला "लाभ" असं संभोदायची.नंतरचा मापाचा आकडा दोन तीन वगैरे,

एकदा मी आजीला विचारलं होतं,
"एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?"
आजीला कारण माहित नव्हतं.पण नंतर आजोबांकडून कळलं की शेतातून आलेलं पीक हे आपला लाभ करून देतं.त्याची सुरवात एक आकड्या ऐवजी लाभ ह्या शब्दाने करावी असा रिवाज आहे.

रानातल्या पडक्या विहिरीची गोष्ट मला आजोबांनी,मी मोठा आणि समजदार झाल्यावर सांगीतली.त्यापूर्वी मी कधीही त्यांना विचारलं,
"ह्या तुडंब भरलेल्या विहिरचं पाणी आपण पिण्यासाठी का वापरत नाही.?"
तेव्हा ते म्हणायचे,
"त्या विहिरीतलं पाणी अशुद्ध आहे.ते पिण्यालायक नाही."
"पण मग आपण गाईगुराना ते पाणी प्यायला कसं देतो?"
ह्या माझ्या दुसर्‍या प्रश्नाला ते नेहमीच म्हणायचे,
"तू मोठा झाल्यावर तुला कळेल"
आणि एक दिवस त्यांनी त्या विहीरीचा विषय काढून मला सांगून टाकलं.
"मुणगेकरांच्या शालूने जीवाल कंटाळून ह्या विहिरीत जीव दिला होता.तिला तिचा नवरा चांगलं वागवत नव्हता.दोन दिवसानी तिचं प्रेत मिळालं.ते सुद्धा वर तरंगत होतं ते एका वाटाड्याने पाहिलं.त्यानंतर ह्या विहिरीचं पाणी कुणी पियीनात."

नंतर मला कळलं की शालूचा नवरा काही दिवसानी गुप्तरोगाच्या व्याधीने मेला.

आता जांभळांचा रस मी माझ्या नातवंडाना देतो.पण जेव्हा ती शहरातून सुट्टीत घरी येतात तेव्हा.त्यांना रानात फिरायला नेतो.माझ्या आजोबांच्या गोष्टी मी त्यांना सांगतो.
मला वाटतं,कोकणातले हे बदलणारे ऋतू निरनीराळ्या फळांना उत्पन्न करण्यात जे प्रतिवर्तन दाखवतात तेच माझ्या आजीआजोबांच्या जीवनात मला दिसून आलं आहे.
माझ्या आजीची सेवा करण्यात माझ्या आईने दाखवलेल्या 
संवेदना आणि तिच्या मनातली दया हे जणू त्या रानातून उन्हाळ्याच्या दिवसात दुपारचं उन झाडांच्या फांद्यातून खाली जमिनीवर झिरपतं आणि रानाची जोपासना करतं तसंच काहीसं होतं.

माझा मामा ऐन तारुण्यात प्रेमभंगाच्या धक्क्याने जेव्हा कालवश झाला ते जणू रानाला कडक उन्हाळ्यात जागोजागी लागणार्‍या आगी सारखंच होतं.आता जेव्हा भर पावसात मी रानात येऊन जातो तेव्हा तेव्हा रानातला शुकशूकाट जणू माझी आजी गेल्यानंतर घरातली सर्व मजाच निघून गेली त्यावेळी जसं वाटावं तसं हे वातावरण भासतं.पहाट संपता संपता सकाळच्या वेळी इथे आल्यावर तसं भासतं मात्र.तळ्यातले मासे बघून माझ्या आजोबांची आठवण आल्याशिवय रहात नाही.

मला वाटतं ह्या रानातलं माझं माझ्या आजोबांबरोबर पहाटेचं फिरणं मला जीवनात परिपूर्ण करूं शकलं.
माझ्या आजोबांनीच मला,शहरातलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.कामं करीत असताना विचार येत रहातात,पहाटे 
माझ्या आजोबाबरोबर रानात पहाटे फिरताना यायचे अगदी तसे."

संध्याकाळ बरीच झाली होती.घरी जाईपर्यंत कीर्र काळोख होणार म्हणून प्रवीण चार सेलचा टॉर्च घेऊन आला होता.
रानातून पायवाटेवरून चालताना मी पुढे आणि प्रवीण माझ्या मागे राहून प्रकाशाची झोत टाकत मला मार्ग दाखवत होता.


श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com