Wednesday, December 21, 2011

केल्यावीणा होणे नाही.




"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं,म्हणजे इतर निदान जगतील तरी."


अरूण मुळ कोकणातला.त्याच्या वडीलांची आणि माझी चांगलीच ओळख होती.कोकणातल्या एका खेडेगावात गरीब परिस्थितीत राहून हे कुटूंब आपली गुजराण करायचं.सुरवातीला अरूणचे वडील एका किराण्या व्यापार्‍याकडे कारकूनाचं काम करायचे.पेढीत बसून खरडे घाशी झाल्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण करावी लागायची.ही कामं करायला त्यांना एक जुनी सायकल दिली होती.



अरूणला भावंडं बरीच होती.त्यामुळे एकटे कमवणारे अरूणचे वडील संसार सांभाळायला मेटाकुटीला यायचे.हे सर्व मला आठवलं जेव्हा माझी आणि अरूणची अलीकडे अर्नाळ्याजवळच्या एका गावात अचानक गाठ पडली.


त्याचं असं झालं,मी अर्नाळ्याजवळच्या एका गावात माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो.त्याच्या घरी गाण्याचा कार्यक्रम होता.दुसर्‍या दिवशी मी त्याच्याकडेच रहायला होतो.सकाळीच उठून आम्ही गावात जरा फेरफटका मारायला म्हणून निघालो होतो.
जाताना एक घर पाहिलं.घराच्या बाहेर अंगणात सुंदर फुलझाडांची बाग दिसली.निरनीराळी फुलं जरा जवळून पहावी म्हणून बागेच्या जवळ गेलो. घराच्या आत पडवीत बसलेले एक गृहस्थ आमच्याशी बोलायला म्हणून आमच्या जवळ आले.कसं कुणास ठाऊक मला त्यांनी ओळखलं.


मला म्हणाले,
"तुम्ही हसला त्यावेळी तुमच्या उजव्या गालावरच्या खळीकडे पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण आली.
तुमच्यासारखे एक गृहस्थ आमच्या घरी यायचे.माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच ओळख होती.
दुसरं कारण म्हणजे तुम्ही आता माझ्याशी चार शब्द बोलत होता तेव्हा तुमच्या बोललेल्या वाक्यात एक हेल येते. कोकणात त्याला हेळे काढून बोलणं म्हणातात तसं भासलं.तुम्ही कोकणातले आहात हे मी पक्क जाणलं.मी पण कोकणातलाच."


माझ्याही लक्षात आलं जेव्हा त्याने आपण अरूण म्हणून ओळख करून दिली.दुसर्‍या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो.
जुन्या आठवणी निघाल्या.त्याचे आईबाबा केव्हाच गेले.अरूण एका नातेवाईकाच्या ओळखीने मुंबईत आला.दादरच्या किर्तीकर मार्केटमधे अरूणने एक दुकानाचा गाळा घेऊन, कोकणातले निरनीराळे मसाले,कुळथाची पीठी,थालीपीठाचं पीठ,आमसोलं,चिंचेचे गोळे,रातांब्याच्या बियांची मुठली असे जिन्नस प्रथम विकायचा.नंतर धंद्यात जम बसल्यावर आणखी गोष्टी दुकानात ठेवून विकायला लागला.
त्यातून थोडे पैसे कमवून लोन घेऊन त्याने अर्नाळ्याजवळच्या गावात हे घर घेतलं.
मला त्याची ही प्रगती बघून त्याचं खरोखरच कौतूक करावं असं वाटलं.
जुन्या आठवणी काढून डोळे ओले करून मला सांगत होता.


मला म्हणाला,
"अगदी साधं जीवन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात मला ते जगणं सोपं जातं.आमच्या कुटूंबा्ची ती परंपरा आहे.माझ्या लहानपणी माझ्या आईवडीलांनी काढलेले ते गरिबीतले दिवस,जगायला आवश्यक लागणार्‍या गोष्टीही हिरावून घेतल्या जाव्या,ती परिस्थिती त्यांनी सहन करावी आणि कुटूंबातल्या सर्वांनी त्यागीवृत्तिने जीवन कंठावं अशा ह्या घटनांची चर्चा त्यांच्या तोंडून मी माझ्या लहानपणी ऐकल्या आहेत.


माझ्या वडीलांना नशिबाने एक काम मिळालं होतं.तिथे जाण्यासाठी चार मैल चालून जावं लागायचं.एस.टीचे पैसे वाचवण्यासाठी चालून जावं लागायचं.माझी आई तिच्या चहाच्या पेल्यात साखर घालायची नाही. उकळत्या पाण्यात चहा न घालता नुसती चमचाभर साखर घालून ते साखर पाणी चहा समजून आम्हाला प्यायला द्यायची.मासे मटण कधीतरी आणायचो.ठिगळ लावून शिवलेले कपडे माझी बहिण शाळेत जाताना घालायची. आणि मी ऐकलंय की माझी आजी रोज शेगडीत कोळसे मोजून घालायची.
तो काळ असा होता की जास्त करून घरीच रहायचं.जे काय आहे त्यावर जगायला शिकायचं आणि जे आहे ते असण्याबद्दल उपकृत रहायचं.



थोडे फार दिवस सुधारत आहेत असं वाटता वाटता वाढत्या महागाईला जेरीला येऊन पुन्हा कष्टाचे दिवस यायचे.आणखी त्याग करायची वेळ यायची. माझ्या वडीलानी एकच धोतर आणि एकच शर्ट कामावर जाताना वापरायचा.रात्री वरून उघडं आणि खाली पंचा नेसून झोपायचं.रात्री धोतर आणि शर्ट धुवून काढायचे.सकाळी सुकल्यावर ते घालायचे.त्यांच्याकडे एकच कोट होता.अशी बरीच वर्ष त्यांनी काढली.आई अजूनही तिच्या चहाच्या कपात साखर घालायची नाही.हळुहळु आम्ही सर्व शाकाहारी झालो.बहिणीच्या शाळेतल्या मैत्रीणीने जुने झालेले तिचे कपडे तिला दिल्याने ती ते कपडे घालून शाळेत जायची.माझंही तसंच व्हायचं.घरात एक सायकल होती पण तिचे टायर्स खराब झाले होते.त्यामुळे मी कुठेही बाहेर न जाता घरीच रहायचो.
ह्या गरिबीच्या दिवसानी आम्हाला खूप शिकवलं.आणि अद्यापपावेतो ते मला शिकवीत आहेत.



माझ्या आईने सफेद जाजमावर लिहून त्याचे फलक करून आमच्या बाहेरच्या खोलीत टांगले होते.जीवन जगण्यासाठी ते तिचं चिंतन होतं.

आहे त्याचा वापर करावा.

जमे तोपर्यंत वापर करावा.

केल्यावीणा होणे नाही

नाहीतर

नसल्यास काम चालवून घ्यावे.

असे आम्ही जगत होतो.आज मी एक लहानसं घर घेतलं आहे.मागे छोटसं अंगण आहे.त्यात थोडा भाजीपाला तयार करतो.कुठेही चालत जाण्याचाच प्रयत्न करतो.नाहीतर बस घेतो.बर्‍याचश्या गोष्टी जमतील तेव्हड्या परत परत वापरतो.


ह्या देशात असे अनेक लोक आहेत की जे पैशाच्या विवंचना करीत बसत नाहीत.अर्थात सगळेच काही नाहीत.
ह्या देशात गरिबी आणि नैराश्य दावणीला धरून आहे.माझ्या घरात आमचं ब्रीदवाक्य म्हणजे,
"आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं म्हणजे इतर निदान जगतील तरी."
माझ्या आईची शिकवणूक अजून माझ्या निवडीला मार्ग दाखवते.


मला वाटतं माझ्या ह्या प्रयत्नाने दुर्लभ गोष्टी इतराना तरी मिळतील.जे माझ्या जवळ नशिबाने आहे त्यातून इतराना नक्कीच फरक पडेल.मी करीत असलेले लहानसे प्रयत्न दुसर्‍या कुणात मोठा फरक पाडील."


मला हे सर्व ऐकून अरूणबद्दल खूप आदर वाटला.सच्चाईने जगण्यातली मजा औरच असते.



श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com