Tuesday, April 1, 2008

“काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां” ललिताचं जीवशास्त्र

“ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?”

गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दयकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे. ती आयुष्यात विषेश काही करून दाखवणार असा त्यांचा होरा होता.तिला मलेशियात एका हॉस्पिटल मधे रिसर्च करण्याची संधी मिळाली म्हणून ती तिकडे जाणार होती.तिने लग्न करून जावं असं गडकऱ्यांच मत होतं.

तिने वडलाना कसतरी समजावलं की मी एक दोन वर्षात पुन्हा येईन तेव्हा नक्कीच तुम्ही म्हणता तसं लग्न करीन.असं म्हणून ती मलेशियाच्या ट्रिपवर निघाली.योगायोग पहा, त्याच विमानात एक उमदा तरूण वसंत केळकर,हा त्याच हॉस्पिटलात मलेशियात मॅनेजरच्या नोकरी साठी जात होता.तिची आणि त्याची विमानातली ओळख पुढे त्यांच्या लग्नात परिवर्तन होण्यात झाली.वसंत आणि ललिता यांच्या सलगी बद्दल ललिता, गडकऱ्याना वरचेवर कळवित होती.त्यानीच तिला त्याच्याशी लग्न करून मोकळी हो असा सल्ला दिला.पाच सहा वर्ष तिकडे राहून हे केळकर जोडपं मुंबईत कायमचं रहाण्यासाठी परत आलं.त्यांना एक सुंदर बाहुली जशी मुलगी होती.ललिता तिची खूप काळजी घ्यायची.

एकदां मी त्यांच्या घरी गेलो होतो.तिने आपल्या वडलांना गडकऱ्याना- पण बोलावलं होतं.इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर, कुतुहल म्हणून मी ललिताला विचारलं,
“तू तुझ्या ह्या मुलीची खूपच काळजी घेतेस, असं मी मघापासून पहातोय. मला ती प्रकृतीने सुद्दृड दिसते.तिला बरं आहे नां?”
हुषार डॉक्टरच ती.माझ्या ह्या प्रश्नाने ती जरा उद्दयुक्त झाली.मला म्हणाली,
“जे दिसायला अगदी साधं आणि सोपं दिसतं त्याच्याकडे अगदी क्षुल्लक गोष्ट म्हणून पहाणं आणि त्याचावर गैरविश्वास दाखवणं ह्यात पुर्वी स्वतःला मी विषेश समजत होते.नंतर मागल्या फ्रेब्रुवारीत मला पहिली मुलगी झाली.ती जन्मतःच मृतावस्थेत होती.तशी ती मला पाचव्याच महिन्यावर झाली. कारण ते माझ्या शरिराचं अपयश होतं,असं मला वाटतं.ती इवलीशी माझी मुलगी इतकी लहान होती की तिला स्वतःलाच श्वास घ्यायला त्राण नव्हता.तिची फूफ्फूसं मजबूत करायला दिल्या जाणाऱ्या औषधाला पचवायला पण ती लहान होती. व्हेन्टीलेटर्स लावून घ्यायला पण ती कमजोर होती.थोडक्यात ती जगायलाच कमकूवत होती.कशावर तरी विश्वास ठेवण्याची पाळी यायला ही मला चालून आलेली वेळ होती.देवावर विश्वास ठेवून आमची श्रद्धा ज्यांच्यावर आहे त्या आमच्या गांवच्या मंदिरातल्या पुजाऱ्याचे शब्द माझ्या कानात घोळवायला ही वेळ मदत करीत होती.त्या मुलीच्या जन्मामुळे पुनर्जन्माच्या गहन विचारावर विश्वास ठेवण्याची ती वेळ होती.किंवा माझ्या पुर्वकर्मामुळे हताश होण्याची पाळी माझ्यावर आली असावी असं समजण्याची ही वेळ आली होती.

पुढलं पुर्ण वर्ष मी आशेवर घालवलं.गणपतिच्या मंगल दिवसात मला परत दिवस गेल्याचं लक्षांत आलं.आणि आशेचे हे दोर मी पुन्हां बाळंत होईतो मजबूत ठेवून होते.अत्यंत आनंदलेली मी, आशेच्या पलिकडे नजर टाकू लागली. नशिबावर माझा विश्वास वाढू लागला.ही मुलगी मला होणं ही माझी योग्यता आहे असं वाटूं लागलं.
आई होण्याच्या आणि आपल्या मुलावर प्रेम करण्य़ाच्या सुखाला मी वंचित झाले नाही याचंमला समाधान वाटत होतं.नशिबात येतं आणि जातं, कुठच्याही गोष्टीला लायक असणं ही तत्कालीक संबंधाची बाब असू शकते असं वाटत होतं. असं सर्व वाटत असताना परत मला दिवस गेले.पुन्हा तोच प्रसंग उद्भवला.जगायला समर्थ नसलेला नाजूक जीव जन्माला आला.
आशा,नशिब,दैव ह्या सर्व गोष्टी पुन्हा अर्थहीन वाटू लागल्या. उघड,उघड वाटला तो फक्त जीवशास्त्राचा अर्थ.माझ्या नवबालकाचं जगणं न जगणं हे एक माझ्या शरिराचं अपयश असावं असं वाटू लागलं. कारण शरिर जीवशास्त्राच्या धर्मानुसार वागत होतं.
ह्या मुलीचं शरीर जणू मला जीवशास्त्राचा अभ्यासाचा धडाच होता.लक्षात ठेवण्या सारखी त्यात एक सुंदरता होती.शरिर विज्ञानाचं चिमुकलं पुस्तकहोतं. सचित्र स्नायुचं,हाडांचं, शुद्ध-अशुद्ध रक्त वाहिन्यांचं जाळं होतं.असं मृत शरिर हातात घेवून त्याचा स्पर्श कधी यापुर्वी जाणवला नव्हता.तिच्या जवळ राहून माझ्या स्वतःच्या चालत्या बोलत्या सळसळणाऱ्या रक्ताच्या आणि हवा आत बाहेर करणाऱ्या शरिराचा अचंबा वाटत होता.ते इवलंस मृत शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते. मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?

मृत्यू ही कुणाची योजना नसते.मृत्यू कुणाच्या कमनशिबाने येत नसतो.किंवा तो दुरघटना म्हणून होत नसतो.मृत्यू होणं हे फक्त शरिराच्या काम करण्याच्या पद्धतीतलं एक स्थित्यंतर असतं एव्हडंच.कुठच्याही गोष्टीवर विश्वास सहजासहजी येत नाही. पण माझ्या आणि माझ्या मुलीच्या शरिराने मला जागं केलं.आता माझा जीवशास्त्राच्या आणि आपल्या शरिराच्या गुंतागुंतीचा प्रकार पाहून विश्वास वाढला.हा गुंता सुटत जातो आणि सर्व काही मजबूत होतं. अगदी आवश्यक बाबी कधी कोडमळतात तर कधी कोडमळत नाहीत. शरिराच्या सहजगत्या न कळणाऱ्या बाबी आणि त्या घडण्यात बिनभरंवसा मधे असतो ह्याचा विचार येवून डोकं सुन्न होतं.

तिन मुलीमधे वाचलेली ही माझी मुलगी,तिचं जीतं जागतं शरिर पाहून आणि दर वेळेला मी तिला जवळ घेते तेव्हा, आणि तिला स्पर्श करते तेव्हा, मला तिची निराळ्याच प्रकारची जगण्याची ताकद पाहून माझा जीवशास्त्रावरचा विश्वास आणखी बळावतो.”
मी मधेच तिला थांबवीत म्हणालो,
“ललिता मी उगाचच तुला प्रश्न केला.तुझी ही बॅकग्राउंड थोडी तरी मला माहित असती तर मी तुला असं ट्रिगर केलं नसतं.”
ललिता म्हणाली,
“तुम्ही काहीच चूक केली नाहित.माझ्या मनांत हे केव्हां पासून होतं,की माझ्या बाबांना सांगावं म्हणून. आणि माझ्या बाबांना एकटं पाहून सांगायला जरा जड झालं असतं. तुम्हा दोघांना एकाच वेळी बसून सांगताना माझा डोक्यावरचा भार हलका झाला.”
ही तिची सर्व गोष्ट ऐकून माझ्या मनात त्या एका जुन्या गाण्याच्या दोन ओळी घोळायला लागल्या,
“काय करूं मी बोला
घरी बाळ ना पुन्हा
नवनवतीचा बाळ माझा
येईल का हो पुन्हां “

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: