Thursday, April 3, 2008

लेखन चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय……भाऊ?

ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात. पहिल्याचं “पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग”अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे.

आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले.
मला लिहीतात,
“मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली. उदा.योगायोग हा तुमचा पोस्ट.
मी सिनीयर सिटीझन आहे आणि ह्या ब्लॉगच्या-जगाशी परिचीत नाही.पण बहूदा तुमची आरटीकल्स पहात (वाचत) राहीन.”

आता बघा,ह्यानी लिहीलेलं एकच वाक्य मला वाचताना खटकलं.
” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.” हे त्यांच म्हणणं.
म्हणजे एखादी आई आपल्या मुलांच्या घोळक्यात बसली आहे आणि एका नव्यानेच पाहाणाऱ्या माणसाने तिला म्हणावं,
“किती सुंदर आहेत तुमची मुलं,मला खूप आवडली पण काय हो ही तुमचीच मुलं आहेत नां?”
सकृतदर्शनी कसं वाटेल त्या आईला?

ब्लॉगवरून हल्ली लेखन चोरीची काही चर्चा मी अलिकडेच “मराठी ब्लॉग विश्वावर” वाचली.माझ्या मनात पाल चुकचुकली.हे त्या वाचकाचं खटकणारं वाक्य वाचून मनात आलं,
“काय रे बाबा?आता माझ्यावर कुणी शुक्लकाष्ट दाखवतो की काय?”
पण म्हटलं,
“कर नाही त्याला डर कसली?”

अलिकडे पोस्ट वरच्या तारखावरून पण “मराठी ब्लॉग विश्वावर” चर्चा झाली. मला वाटलं होतं पुर्वीच्या तारखेचा ब्लॉगवरच्या पोस्ट पाहून, नंतरच्या तारखेच्या कुणा दुसऱ्याच्या ब्लॉगवरच्या पोस्टची कॉपी (चोरी) केली जाते असं होवूं शकत नाही आणि हे उघड आहे.त्यामुळे नंतरच्या तारखेचा पोस्ट लिहीणारी व्यक्तिच आपला पोस्ट असं दाखवायला पुर्वीच्या कुणा पोस्ट्ची कॉपी करू शकते.
पण गम्म्त म्हणजे माझ्या वाचनात आलं की ह्या तारखांची पण अदलाबदल करता येते.असं कुणी उदाहरण देवूनही दाखवलं.
ह्या सगळ्या प्रकाराचा विचार करून मी ठरवंल होईल ते होईल आपण त्या गृहस्थाना
”तुम्ही असं का लिहीलत?”
असं विचारावं-मात्र पॉझिटीव्ह थिंकींग करून-आणि मी तसं त्याना विचारलंपण,
” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.”
असं आपण विचारलंत ते वाचून मी जरा खट्टु झालो.आपलं हे विचारणं पण जरा स्पष्टच वाटलं.पण माझं मन सांगतं की तुमच्या मनात माझ्या ह्या लिखाणा बद्दल किंतू नसावा. कदाचीत तुम्हाला ते मला कळवताना नीट मांडता आलं नसावं असा माझा समज आहे.”
पुढे मी त्यांना लिहीलं,
“कविता किंवा लेख लिहीण्याची कला ही कुठल्याही वयांवर माणसाला लिहायला उद्दयुक्त करते. तसंच आणखी मला वाटतं ही कला एखाद्दया व्यक्तिला एक दैवीक किंवा नैसर्गिक देणगी म्हणून मिळत असावी अशी माझी समजूत आहे. मी ज्या काही “अनुवादित” कविता लिहीतो त्या मी मला समजणाऱ्या कुठल्याही भाषेतून मराठीत भाषांतरीत करून लिहीतो. आणि तसं करताना कवितेचा आशय घेवून लिहावं लागतं. शब्दानुशब्द तसंच लिहीलं तर ते कॉपी केल्यासारखं होईल.आणि जी अनुवादित कविता होते ती “अनुवादित” ह्या कॅट्यागरीत टाकतो.आणि जी माझीच कविता असते ती मी “कविता”ह्या कॅट्यागरीत टाकतो. कविता सोडून ज्या गोष्टी, म्हणजे लेख,चर्चा वगैरे असतात त्या अजिबात अनुवादित वगैरे नसतात.अशा लेखात एखादं वाक्य, जे माझं नाही, ते मी ज्या व्यक्तिचं असेल त्याचं नांव देवून उदघोषित करतो,आणि नांव न आठवल्यास,
”कुणी तरी म्हटल्याचं आठवतं”
असं लिहून ते माझं नाही हे दर्शवितो. आणि असं लिहायला मला अभिमान पण वाटतो.

पुढे त्याना मी लिहीलं,
“कुणीही व्यक्तिने काही ही लिहीलं,तरी शब्दानुशब्द त्याच्याच डोक्यातून आलेले आहेत आणि ते त्याचंच लिहीणं आहे असं अपवादानेच होईल.बऱ्याच व्यक्तिचं लिहीणं पुर्वीच्या झालेल्या घटेनेशी संबंधीत असतं. वाचून,संशोधन करून,कधी कधी चर्चा करून नंतर त्यावर आपल्या डोक्यातून आलेले विचार घेवून त्या विषयात सुधारणा करून किंवा बदल करून मग नव्यात रूपांतर झाल्यावर ते नंतर त्याचं प्रॉडक्ट होतं.
ज्ञानेश्वर,तुकाराम आणि अलिकडचे पु.ल. किंवा ना.धों.मनोहर,शिरवाडकर यांचं सभोवतालचं वातावरण,त्यांची आत्मबुद्धि, आत्मज्ञान, आत्मग्रहणाची क्षमता(ऑबझरवेशन) शिवाय त्यांच दांडगं वाचन,मग ते संस्कृतमधे असो वा फारशी भाषेत असो वा इंग्रजीत असो, हे सर्व असल्याशिवाय त्यांच्या प्रतिभेची चुणुक येवू शकत नाही.

संगीत चोरी काही लोक करतात.उदा.अन्नु मलिक ह्यात प्रसिद्ध आहे असं म्हणतात.पण संगीत चोरी मधे लयीची चोरी होते, चालीची चोरी होते,पण शब्द निराळे ठेवून चालीची चोरी केलेलं गाणं, ऐकायला मजा येत नाही असं नाही.आणि चाल चोरी झाली ह्याच ते गाणं ऐकणाऱ्याला विषेश काही वाटतही नाही.तो गाणं एन्ज्यॉय करतो.मात्र लेखन चोरी आणि कविता चोरी केल्याचं लक्षात आल्यावर त्या चोरी करणाऱ्या व्यक्तिची घृणा येते.दुसऱ्याच्या मुरंब्याच्या बरणीतून बोट घालून,चोरून मुरंबा चाटताना तेव्हड्या पुरतं त्या व्यक्तिला बरं वाटतं पण जर का कुणी चोरी उघडकीस आणली तर ती किती शरमेची बाब होईल.? “
मी त्या सदगृहस्थाना पुढे म्हणालो,
“माझंच लिखाण कुणी माझ्या नकळत copy (जशास तसं) केलं असल्यास माझा नाईलाज आहे.पण लिखाण केव्हांचं आहे हे वेळकाळावरून कुणी कुणाला copy केलं ते सहजच कळू शकतं. मात्र तारखेची अदलाबदल न केल्यास.
लहानपणी कुणी विचारलं
“कुणाचं हे चोरलंस रे?”-ती कुठलीही गोष्ट असो.- त्यावर आपण म्हणतो ना
”आईची शप्पथ ते माझं आहे”
अगदी तस्संच,
”आईची शप्पथ ते सर्व माझं लिखाण आहे.”
असं मी त्यांना म्हणालो.ह्या पलिकडे माझ्याकडे काही प्रुफ नाही. आणि इतकही करून माझ्या कोणत्याही पोस्ट सारखं copy to copy दुसऱ्या कुणाच्या पोस्टमधे वाचल्याचं आपल्या आढळात आलं, तर मला अवश्य कळविण्याची तसदी घ्यावी ही विनंती”

हे सर्व वाचल्यावर,त्यानंतर मला त्या गृहस्थानी कळवलं,
“आपण निरनीराळ्या विषयावर आपल्या ब्लॉग मधे लिहीलेले पोस्ट पाहून मी तुम्हाला तसं विचारलं हे तुमचं compliment करण्याचा इराद्याने होतं. तसं लिहील्याने आपल्याला वाईट वाटल्यास,क्षमस्व.”
आता सांगा,सुरवाती पासून मी “ग्लास फूल” ची वृत्ती ठेवल्याने हा प्रश्न समाधानाने सोडवता आला.त्यांच्या त्या एका वाक्यावर मी “हाफ एम्टी” (निगेटीव्ह थिंकींग) वृत्ती ठेवली असती तर कदाचीत त्या सदगृहस्थांकडून निराळी रियाकशन आली असती.

पण कधी कधी टू मच “पॉझीटीव्ह थिंकींग” करून आपल्याला त्रास ही होतो.ते कसं ते मी माझ्या एका पोस्टवर लिहीलं आहे.शिर्षक आहे “मला वाटतं…. 3Feb 08″ तो अवश्य वाचावा.
तुर्तास एव्हडं पुरे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: