Friday, April 18, 2008

आदर करण्याची कदर

“आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे.”

ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती.
एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं.
त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत गेलं.आता मी जेव्हां जरा मिड्ल एज मधे आलो आणि एका मुलीचा बाप झालो तेव्हां त्याच जीवनाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हळू हळू साधा सरळ होत गेला.”

समीर जेव्हां मला हे सांगू लागला तेव्हां मला ते ऐकण्याचं कुतुहल वाढू लागलं.
मी म्हणालो,
“सांग बाबा,काय म्हणतोस ते ऐकायला मजा येते”

मला पुढे म्हणाला,
“अशा ह्या वृतीचं कारण,मी मला एक समजूतदार पालक समजून माझ्या मुलीला चार गोष्टी शिकवायला लागलो.सहाजीकच मी गुंतागुंतीच्या गोष्टी लहान लहान करून त्याचा अर्थ तिला समजावयाला लागलो.सर्व पालक असंच करतात. जीवन जास्त सोपं करून सांगता सांगता मी पुर्वीच्या मुठभर मुळ गोष्टी जगायला कशा कारणीभूत होतात ह्या विचाराकडे परत आकर्षित झालो.

मी म्हणालो,
“अशा कुठच्या कुठच्या गोष्टी सांग बघू”

त्यावर समीर हंसत हंसत म्हणतो कसा,
“त्यातल्या त्यात मला जास्त वाटू लागलं ते म्हणजे “आदर” किंवा “सन्मान”ह्या वृत्ती बद्दल. स्वतःबद्दलचा आदर,इतरांचा आदर,जगातल्या सर्व प्राणीमात्रांचा आदर ह्या गोष्टी बद्दल.
मी माझ्या मुलीला एखादं वाद्दय वाजवायला, एखादी कविता लिहायला,एखादा गेम खेळायला प्रयत्न कर असं सांगत असतो.आता तसं करत असताना अपयश येणं आणि त्याबद्दल दुःख वाटणं स्वाभाविक आहे पण प्रयत्नच न करणं हे महादुःख आहे.कारण ते नकरणं म्हणजेच आपला आपण आदर न करणं.आणि हे सर्वमान्य आहे की आपला आपण आदर केला नाही तर दुसरा कोणही तो आपल्या साठी करायला मागणार नाही.”

“इथपर्यंत पटलं पुढे काय? “
मी म्हणालो.

त्यावर समीर म्हणाला,
” स्वाभिमान हा एक स्वतःचा आदर करण्याचा प्रकार आहे,तो काही गर्व होत नाही. हा प्रयत्न अभिमानाने करण्याचा, आपआपल्या पद्धतीने आणि आपल्याला जमेल तव्हडं करण्याचा असा हा प्रकार होईल.प्रत्येक जण परफेक्ट नसतो.आणि ही गोष्ट ज्याने त्याने समजून घेतली पाहिजे आणि मान्य पण केली पाहिजे.त्यानंतर इतरांची विकनेस आणि स्ट्रेन्थ मान्य करायला सोपं जातं.मला वाटतं ही वृत्ती प्रेमा सारखीच दुवा जोडणारी आहे.आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहील्या सारखं आहे.”

मी म्हणालो,
“मी सुद्धा आता तुझ्या सारखी वृती ठेवण्याचा प्रयत्न करीन.”
समीरला नक्कीच हे ऐकून बरं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: