Tuesday, December 2, 2008

आईची विटंबना.(रामपुरी ते रायफल)

माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली,पण ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला. पण तिने कधीही हातात काठी घेऊन कुणाला मारायला आपल्या घराबाहेर पडली नाही.इतकी क्षमता असून तिने कधीही कुणाच्या घरात जाऊन कसली ही अभिलाषा केली नाही.आल्या- गेलेल्या पाहुण्याला आनंदाने सामाऊन घेतलं.”आवो जावो तुम्हारा घर” अशी वृत्ति ठेवून ती राहिली. इतिहास साक्षी आहे.म्हणून ती आजतागायत जीवंत आहे.बाहेरच्या आगांतूकानी येऊन खूप तिची लुटालूट केली.कुणी तिचे दागिने लुटले,कुणी तिची देवघरं उद्व्हस्त केली.तिच्या गळ्यातला हिरा पळवून नेऊन आपल्या मुकूटात रोवून ठेवला.पण म्हणून ती कधीही दीन झाली नाही.यवनानी शेकडो वर्ष तर फिरंग्यानी दिडशे वर्ष तिच्याच घरात राहून धुमाकूळ घातला, लूट केली.पण तेच आगांतूक आपलं तोंड काळं करून निघून गेले. तिची बाराशे कोटी मुलं आपआपल्या परीने जगताहेत.
तिची होत असलेली भरभराट शेजा‍र्‍यापाजार्‍यांच्या डोळ्यात खूपते.तिची प्रगती खूंटवण्यासाठी ते आपली पराकाष्टा करीत आहेत.पण अशी कुणाची प्रगती खूंटेल का?
ती म्हणते,
“असे खूप आघाद माझ्यावर झाले आहेत.खूप जण जखमा करून गेले आहेत.किती रक्त सांडलं गेलं आहे. वाईट वाटून तुम्ही दुःखी व्हाल.पण हे ही दिवस जातील. आघात करणारेच हरतील.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे हे कुणालाच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे की झालेल्या चूकातून शहाणं व्हायला हवंय.आणि माझा माझ्या बाराशे कोटी मुलांवर विश्वास आहे.”

मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोक काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती. जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे. किंवा लाठ्या काठ्याने डोकी फोडली जायची.हे चाकू मुंबईत तरी चोरबाजारात मिळायचे.हा चोरबाजार भेंडी बाजाराच्या आसपास भरायचा.ह्या चाकवाना रामपुरी म्हणायचे.रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे.

त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या.त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. त्यावेळच्या पोलिसाकडेपण दंडुके-बॅटन- असायचे.त्यावेळच्या पोलिसांचा ड्रेस गमतीदार असायचा. शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या आणि त्याचा रंग पिवळा जर्द असायचा आणि पेहराव असायचा जांभळ्या रंगाचा बुशकोट आणि खाली शॉर्ट-हाफ प्यॅन्ट-असायची.पायात पठाणी चप्प्ल असायचं.पोलिस गमतीदार जोकर दिसायचा.आम्ही पोलिसाला लहानपणी “जांभळी बाटली पिवळा बूच” असं गमतीने म्हणायचो.पोलीसाच्या कमरेला हे पिवळ्या रंगाचे दंडुके-बॅटन लटकत असायचे.त्याचा वापर त्याला क्वचितच करावा लागायचा.आणि मोठ्या दंग्यात गाड्या भरून पोलीस आले की त्यांच्याकडे लांब काठ्या असायच्या.लाठीमार करून जमावाला पांगवायचे.त्याहून गंभीर जमाव झाल्यास रायफली घेऊन पोलिस यायचे. ह्या रायफलीतून एका वेळी एक गोळी झाडली जायची.बरेच वेळा गोळीबार पोलिस हवेतच करायचे.दंगे काबूत यायचे. त्यामुळे मनुष्य हानी कमीच व्ह्यायची. पोलिसांच्या साहेबाकडे मात्र पिस्तूल असायचं आणि कमरेला एका चामड्याच्या पिस्तुलाच्या आकाराच्या पाऊचमधे ठेवलेलं असायचं.

पिस्तुल प्रत्यक्षात कसं दिसतं ते आम्हाला कधीच पाहायला मिळालं नाही.पण नाही म्हटलं तरी वांद्र्याच्या वांद्राटॉकीझमधे चार आण्याचं तिकिट काढून आम्ही इंग्लिश फिल्म बघायला जायचो. “झोरो इन टाऊन” किंवा “डेथ ऑफ गॅन्गस्टर” असले फायटिंगचे चित्रपट बघायला मजा यायची.त्यात पिस्तुलं म्हणजे काय ते पहायला मिळायचं.तेव्हड्या लहान वयात मोठ्या भावाबरोबर चित्रपट बघायला गेल्यावर इंग्रजी काही कळत नसायचं.मोठा भाऊ हंसायचा त्यावेळी आम्ही हंसायचं.एक मात्र खरं धावत्या घोड्यावर बसून बंदूकीच्या गोळ्या एकमेकावर झाडण्याच्या दृश्याने त्यांची मर्दूमकी बघायला मजा यायची.एक मात्र इंग्रजी शब्द अजून आठवतो” हेंज-जॉफ” म्हणजेच हॅन्डस अप”

जशी मुंबईची वस्ती वाढू लागली तसे गुन्हेगारपण वाढायला लागले.जरा आधूनीक हत्यारं गुंडाना मिळायला लागली. अलीगढ वरून गांवठी पिस्तुलं मिळायला लागली.उत्तरप्रदेशच्या अलिगढमधे गावठी पिस्तुलं बनावायचे बेकायदा कारखाने बरेच होते. ही पिस्तुलं मुंबईत स्मगल व्हायची.कधी कधी मुंबईचे पोलिस अलिगढमधे जाऊन बेकायदा कारखान्यावर छापे टाकायचे.
मुंबईत त्यावेळी नावाजलेली मराठी वर्तमानपत्रं म्हणजे लोकमान्य,नवशक्ति आणि केसरी.लोकसत्ता आणि सकाळ ही वर्तमानपत्रं आत्ता आत्ताची.परदेशातल्या बातम्या सोडाच एखाद दुसरा भोसकून मेल्याची एखादी बातमी दिसायची.अमेरिकन कॉटनबाजाराचे नंबर मात्र एका ठराविक जागेत दिसायचे.त्या नंबरावर काही लोक सट्टाबेटिंग खेळायचे.

मुंबईची वस्ती आणखी वाढायला लागल्यावर,चोर्‍यामार्‍या दंगेधोपे जातीय दंगल वाढायला लागली.आता नवीन अस्त्र म्हणजे गांवठी बॉम्ब फुटायला लागले.नाहीतर बॉम्ब हा प्रकार फक्त लष्कराकडेच असायचा.ह्या गांवठी बॉम्बच्या वापराने एक्का दुक्का मेल्याची बातमी यायची.गांवठी बॉम्ब बनवायचे मुंबईतपण कारखाने निर्माण व्हायचे.धारावीत त्यांचं जास्त प्रमाण असायचं. हे बॉम्ब विझवण्यासाठी मुंबईपोलिसांच स्पेशल खातं असायचं.हळू हळू सर्रास पिस्तुलं मिळायला लागली.अर्थात बेकायदा वापर व्हायचा.आता पेपरात एकदोन ऐवजी चारपाच दुर्घटनाच्या बातम्या यायच्या.हवालदारपण आता थोडे स्मार्ट व्हायला लागले. पुर्वीचा गचाळ पेहराव जाऊन पोलीस आता जांभळी टोपी आणि खाकी कपडे वापरायला लागले.

एके४७,बिके५७,सिके६७ ही पोलीसांच्या कमरेवरच्या बिल्ल्यावरची नंबरांची नांव असायची.”अरे त्या एके४७ला बोलाव.किंवा बिके५७ला हांक मार” अशी भाषा बोलली जात होती.
एके४७ ही मशीनगन असते हे त्यावेळी पोलिसानासुद्धा माहिती नसावी.मशिनगन्स फक्त लष्करात असतात हे ऐकलं होतं.
पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक कुठे चालला आहे हा जग्नाथाचा रथ?

कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आहे काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपीत त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: