Monday, December 8, 2008

दीर्घ आयुष्याची गुरूकील्ली.

“समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.समूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे विलीन होऊन गाईल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं.”
मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढून जाताना आमच्या गप्पा व्हायच्या.ह्या दोघानी गावात एक भजन मंडळ स्थापलं होतं.आणि त्या भजन मंडळाची आणि संगीताची ते मला माहिती देत होते.
प्रमोद खानोलकर मला म्हणाले,

“आमच्या गावात भजन मंडळ आहे.गावातल्या जस्तीत जास्त लोकांना ह्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने मी आणि माझा हा मित्र कार्याला लागलो.त्यासाठी गाण्याचा अनुभव असण्याची जरूरी नाही हे आम्ही अगोदरच सांगितलं.आमच्या भजन मंडळातले काही लोक तर कधीच पूर्वी गाईले नव्हते.आता आमच्या ह्या मंडळात जवळ जवळ पंधरा वीस लोक सामील झाले.

मला वाटतं,गाण्याचे खूप फायदे आहेत.दीर्घ आयुष्य लाभण्याची ती एक गुरूकील्ली आहे,शरिराला सौष्ठव येतं,स्वभाव संतुलीत राहतो,नवीन मित्र मिळतात,बुद्धिला चालना मिळते,हजरजबाबी व्हायला होतं.कुठेतरी वाचनात आलं की संगीताने,आणि नृत्याने
जीवन आनंदी आणि निरोगी राहतं.
खरं तर,त्यात शारिरीक फायदे पण खूप आहेत.मुळात गाताना फुफ्फुसाचा एव्हडा वापर होतो की दिवसाभर्‍यात तेव्हडा वापर होणार नाही.उच्चस्वरात गाईल्याने गांभिर्यता कमी वाटून,संतुष्ट व्हायला होतं.समुहात गाईल्याने समुहाबद्दल जागरूकता येते.तल्लीन व्हायला होतं.मीपण कमी होऊन आम्हीपण येतं.समानुभूति येते नैतिकता वाढते.
रोज संध्याकाळी आमचा कार्यक्रम असा असतो.भरपूर पाण्याचे तांबे आणून ठेवतो, काही अल्पाहार असतो,भजनाची काही पुस्तकं असतात, काटेकोरपणे वेळेची आठवण ठेवतो आणि सुरवातीला थोडा जोश आणतो.
गाण्याची निवडही काटेकोर असते.शब्दसंपन्न असलेली,स्वर संपन्न असलेली,तालमेल असलेली,गाण्यात प्रकटन असलेली गाणी निवडतो.
आणि ज्यावेळी लोक तालमेल ठेवून लांब सूरात गातात तेव्हाच खरी मजा येते. उच्चसूरात गाणं हेच काही सर्व नसतं. त्याला आणखी दोन पेहलू आहेत.पहिला ताल.सर्वानी मिळून ताल धरला की रोमांचकता येते आणि गाण्याची गति जेव्हा वाढते तेव्हा ते जास्त प्रभावशाली वाटतं.पण दुसरी गोष्ट जपावी लागते ती गाण्यातला भाव.गाण्यातला ताल आणि स्वर यांची सुसंगती सांभाळताना गाण्यातला भाव प्रभावी असावा लागतो.एकाच सूरात गाणं म्हटलं जात असताना आणि वेगवेगळी लय सांभाळताना जर सगळं जुळून आलं तर ब्रम्हानंदच होईल.

अशा तर्‍हेची समुहातली गाणी जर का शाळेत गाईली गेली तर मला वाटतं, लहान मुलांच चारित्र विकसीत करता येईल,आणि त्याही पेक्षा त्यांच्याकडून सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. आम्ही त्या दृष्टीने आमच्या गावातल्या शाळेत हा प्रयोग करून पहाणार आहो.”
हे सगळं ऐकून मला गावात कसे लोक आपला वेळ घालवतात आणि भजनासाठी भजन नसून त्याचा सामाजीक दृष्टीने कसा विचार करतात हे खानोलकरांकडून ऐकून बरं वाटलं.मी त्याना म्हणालो,
“तुमचा संगीता बद्दलचा अभ्यास खूपच खोलवर आहे.मला तुमच्याकडून बरचसं शिकायला मिळालं.तुमच्या नवीन नवीन प्रयोगाला माझ्या शुभेच्छा”



श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: