Thursday, December 4, 2008

ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला,
“साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील.”
मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर,गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्या आवाजात मला “जय महारष्ट्र” म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभा ठाकला.
त्याचं ते दुपदरी शरिर बघून मीच त्याला म्हणालो तुम्ही मागेच बसा मी ड्राईव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर बसतो.त्याला ती माझी सुचना आवडली.इतका लांबचा प्रवास असल्याने अंमळसं सगळ्यांनाच ऐसपैस बसायला आवडेलच.
प्रवासात जेव्हा गप्पाना रंग चढला तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले,
“मला वाटतं जे लोक जे काही करतात त्याबद्दल त्याना आत्मसन्मान वाटला पाहिजे. जरी इतर कुणीही त्याबद्दल गैरसमज करून घेतला किंवा तिरस्कार केला तरीही.
मी व्यवसाईक कुस्तीगार आहे.गेली जवळ जवळ दहा वर्षे.ह्या माझ्या व्यवसायातून माझी गुजराण व्हायची. पण माझ्या कुस्ती खेळण्याच्या व्यवसायाला लेबल चिकटवलं जायचं.फाल्तू खेळ,खतरनाक शौक,बिनडोकी शारिरीक प्रदर्शन अशा पद्धतीची उपनावं लावली जायची.

मी ज्यावेळी शाळेत जायचो,त्यावेळी एकदा माझ्या गुरूजीनी मला सर्वांसमोर तंबी दिली होती की मी जर का अभ्यासात जास्त लक्ष न देता कुस्ती खेळण्यात वेळ घालवला तर,मला पुढे चांगलं उपजीविकेचं काम मिळणार नाही.माझं भवितव्य निराशाजनक होणार.

त्या निराशाजनक काळात मी कुस्ती खेळायचं अजिबात सोडलं नाही.आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती करीत राहिलो. तरीपण बरेच वेळा माझे प्रयत्न विफल व्हायचे.पण माझ्या लक्षात आलं की एखाद्दा गोष्टीत निपूण व्हायचं असेल तर प्रयत्न करीत राहायचं.मग जरी खरचटणं झालं,थोडा मार बसला,एखादा हात पाय मुरगळला,लोकांनी टिंगल केली तरी.
देशात अलीकडे कुस्तीच्या खेळाला समाजातल्या मुख्यधारेत चांगलीच मान्यता मिळाली आहे.पण अजूनही काही प्रतिकूल रुढिबद्द लोक आहेत.कुस्तीला अनुकूल असलेले जे लोक मला माहित आहेत ते सामाजाचे उत्तरदायी नागरीक आहेत.त्यातले बरेच लोक वडील,घरंदाज,जगप्रवास केलेले,आणि सफल ठेकेदार आहेत.त्यांचा पेहराव आणि राहाण्याची स्टाईल ही आमच्या विश्वातली संस्कृती असावी.

तर असा मी चाळीसीतला,पती आणि तीन मुलांचा बाप,एक मोठी जबाबदारीची आणि दायीत्वाची लांबलचक यादी घेऊन असलेला आहे.आणि मला जरी खूप उपाधी असल्या जश्या-सि.ई.ओ. एक्झीक्युटीव्ह प्रोडयुसर,सिनीयर कनस्लटंट,फॉऊन्डेशन चेअरमन,फाल्तु अभिनेता तरी सुद्धा मला ज्याचा खास अभिमान आहे तो म्हणजे “व्यवसायीक कुस्तीगार” म्हणून. ही उपाधी मी जरूरीच्या कागदपत्रावर लिहीतो.जरी मला कुठल्यातरी सुरक्षा नाक्यावर,कस्टम ऑफिसात तपासणीला जावं लागलं तरी.

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.
माझं हे उदाहरण मी एक दिवस माझ्या मुलांकडे पासऑन करणार आहे.माझा मोठा मुलगा उत्साही कुस्तीगार आहे.तो मजा म्हणून कुस्ती खेळतो आणि ते मला पुरेसं आहे.
कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही.”

आणखी बर्‍याच गप्पा प्रवासात झाल्या.पण त्या कधीतरी पुढच्या वेळी.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: