Sunday, December 14, 2008

जीवनगृहाची घडण.

“मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी.जीवन हे आत्माच आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते.”

डॉ.संजय धारणकरची आणि माझी जूनीच ओळख आहे.कारगीलची लढाई सुरू झाल्यावर त्याने एका फार्मसीटीकल कंपनी मधली नोकरी सोडून सैन्यात भरती करून घेतली.देशप्रेमाच्या भावनेने भारावून जाऊन सैन्यात दाखल होऊन जखमी सैनिकांची सेवा करायची कल्पना त्याच्या मनात आली.जरूर वाटली तर युद्धाच्या जागी जाऊन जखमी रुग्णसैनिक ज्या छावणित उपचारासाठी आणतात त्याठिकाणी पण जाण्याची तयारी त्याने दाखवली होती.हे सर्व मला माहित होतं. पण युद्धावर तो जखमी झाला आणि त्यानंतर त्याला सैन्यातून सुट्टी मिळाली हे मला आत्ताच त्याच्या तोंडून कळलं.
संजयच्या स्वभावाचा कल पहिल्या पासून काही तरी धडाडी करून दाखवण्याकडे झूकत असायचा.आणि त्या दृष्टिने त्याने सैन्यात भरती करून घेतली ह्या बद्दल मला विषेश काही वाटलं नाही.पण युद्धावर जाऊन जीवावर बेतण्या इतक्या परिस्थितीत तो सापडला त्यानंतर त्याचा स्वभाव फारच बदलून गेला असं वाटतं. ह्या खेपेला मला भेटल्यावर जे काही तो बोलू लागला त्यावरून मला असं वाटलं की माणसाचा स्वभाव परिस्थिती प्रमाणे बदलू शकतो.पूर्वीचा संजय धारणकर आता राहिला नव्हता.आध्यात्मिक विचार धारणा माणसाला मरणाच्या दाढेतून वाचल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवते.
“संजय तुझ्यात इतका बदल कशामुळे झाला?”
ह्या माझ्या साध्या प्रश्नाला त्याने जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे.
मला तो म्हणाला,
“कारगीलच्या लढाईत मला शत्रूकडून सुटलेली एक सुसाट गोळी लागली.त्यामुळे मी आपत्तीत सापडलो होतो.मी लष्कराच्या मेडिकल युनिटमधे डॉक्टर म्हणून होतो. त्या घटने नंतर स्वास्थ्यलाभ व्हायला मला बरच कठीण झालं होतं. त्यानंतर माझ्या युवावस्थेची लवचिकता आणि फॉर्मच गेला.माझ्या जीवनात येणार्‍या पुढच्या मार्गात आत्मसन्मानाच्या,कटुतेच्या आणि आत्मदयेच्या अडचणी आल्या.
पहिली अनुभूती आली ती एकलेपणाची.त्यानंतर जास्त जाणीव झाली ती लोक मलाच मदत करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याची.आणि सरतेशेवटी मला जाणीव झाली ती मुलतः मी मलाच सावरण्याची.आणि जरी ती मला माझ्याच प्रयत्नातून सफल करायची होती तरी मला मी कधीच एकटा न राहता माझी उपलब्धी हा इतरांचा ही हिस्सा व्हावा असं वाटायचं. त्यामुळे माझी पुनःप्रतिष्ठा व्हायला मदत झाली.आणि नंतरची माझी मोठी समस्या म्हणजे इतर काय बोलतात आणि करतात याचा नीट अर्थ लावणं.कारण इतरात सामावून घेतल्याशिवाय माझी प्रगती होणं शक्य नव्हतं.
माझ्या तरूण वयात मला शिल्पकार व्हायचं होतं.काही तरी घडवणं माझ्या हातून झालं पाहिजे असं मला त्यावेळी वाटायचं.पण मी माझी ही इच्छा निराळ्या तर्‍हेने उपलब्ध केली. माझ्या एक ध्यानात होतं की घर बनवायचं झालं तर मचाणाशिवाय ते बनू शकत नाही.हे माझं मचाण मी ठरवलं. मी डॉक्टर असल्याने इतरांची सेवा करण्याची माझी जबाबदारी हेच माझं मचाण असं मी ठरवलं .कदाचीत माझा अनुभव कुणाच्या संकटकाळी उपयोगात यावा.
त्या बंदूकीच्या गोळीने माझ्या जीवनात स्थित्यंतर आलं.मी मनाने पोक्त झालो.माझ्या तारुण्यातल्या चंचल स्वभावाला थोडं संतुलन आलं.नाहीतर ही स्वभावातली चंचलता, एकाग्रता आणि उपलब्धता मिळवायला बाधा आणू शकली असती.
आता डॉक्टर म्हणून रुग्णाना पुनःप्रस्थापीत करताना जीवन सदा प्रफुल्लीत राहतं.एका अर्थी मला जी पीडा झाली ते चांगलंच झालं.मी इतरांची सेवा करू शकलो.
माझी झालेली ती जखम आणि त्यापासून होणार्‍या वेदना ह्यामुळे काहीतरी करण्याची धमक माझ्यात आल्याने मी कटुतेला तिलांजली दिली.आणि माझ्या मनात असलेल्या बदला घेण्याच्या विचाराचे हनन केले. ज्याने माझ्यावर गोळी झाडली होती त्या शत्रूपक्षाच्या सैनिकाला जखमी करून ताब्यात घेतलं होतं.तेव्हा मला माहित होतं की ज्याला त्याच्या विद्वेषा बद्दल काहीच वाटत नसलं तरी त्याच्याशी मला बोलता येईल.आणि त्यामुळे मला माझ्या अस्तित्वात मान खाली घालून राहण्यापेक्षा गौरवाने राहता येईल. मला वाटतं ह्याचं कारण मला असलेली कर्तव्याची समझ.अनुभवाने मला दाखवून दिलं होतं की तो माझ्यातला बदल माझ्या चांगल्यासाठीच असावा.

मला वाटतं,मनूष्य आपल्या जीवनात आनंद आणि खेद असतानाही आशा आणि उमेद बाळगून वाढत असतो,आणि तुलनेने दोन्ही गोष्टीची प्रशंसा करतो.
मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी. जीवन हे आत्मा आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते,जेवढी निसर्गाला माहित असावी,की ज्या निसर्गामुळे सुदैवाने आपणच तिची अंतिम प्रतिकृती आहो.मी मानतो की जीवन कसं घडवावं ह्याची आपल्याला जी माहिती मिळाली असते त्याहीपेक्षा जीवनातला अनुभवच हा जीवनाच्या घडणीचा मुख्य पाया आहे.
मौखिक शब्दातून मला अर्थ जाणवतो,कारण तो माझ्या अनुभवाशी अनुरूप असतो आणि मी सत्याकडे जसा पहातो तसा त्याचा निर्देश असतो. एकमेकाशी संपर्क असण्यात माझा विश्वास आहे.तरीपण संकल्पनेतून येणार्‍या बाधा स्विकार करायला माझ्या मनावर दबाव येतो.आणि ह्यातच जीवनातला संघर्ष आणि करुणेचं अस्तित्व असतं.
माझी कमतरता हीच माझ्या जीवनातल्या दर्जाचा मापदंड आहे.तरीपण मी मला नरमाईने नियंत्रीत ठेवतो.कारण कुणालाही त्याला आलेली महत्ता ही परिपक्वता आल्याने येत नाही तर त्याच्या जीवनाचा विकास कसा होतो त्यावरून येते असं मला वाटतं.”
हे सर्व डॉ.संजयचं तत्व ज्ञान ऐकून मी मनात निश्चीत ठरवलं की खरंच, जीवन कळण्यासाठी खडतर प्रसंग येऊन जावा लागतो.
उगिचच कवी बा.भ. बोरकरानी म्हटलंय,
“जीवन यांना कळले हो!
मीपण ह्यांचे सरले हो!”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

No comments: