Friday, May 15, 2009

“प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे”

“प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे”

लेखांची वाचनं अनेक होत असतात.लेखांना प्रतिसाद मिळाला की लेखकाला निश्चीतच बरं वाटतं.मग तो प्रतिसाद कसाही असो.लेखन ही ज्याची त्याची निर्मिती आहे असं मला वाटतं.सर्वच वाचक लेखक नसतात,पण लेखकाला मात्र वाचक असावं लागतं.त्याशिवाय त्याला त्याच्या लेखनाच्या विषयांची कल्पना येणार नाही.मात्र एखादा उस्फुर्त लेख लिहिला जाणं निराळं.अनेक प्रसिद्ध लेखकांची वाचनं प्रचंड असतात.ही वाचनं निरनीराळ्या भाषेतली पण असतात.
काही लेख इतके पारदर्शक असतात की त्यांना,
“लेख आवडला” किंवा,
“लेख छान लिहिला आहे”
ह्या व्यतिरीक्त वाचकाला काही लिहिण्याची जरूरी भासत नसावी.काही वाचकांना तेही लिहिण्याची जरूरी भासत नाही.आणि ते स्वाभाविक आहे.
आता ब्लॉग झाले आहेत.एखादा लेख वाचून त्याला ताबडतोब प्रतिसाद देण्याची सोय झाली आहे.पूर्वी वर्तमान पत्रात किंवा मासिकात लेख यायचे.अजूनही येतात म्हणा.आणि त्यावेळी त्या लेखाला ताबडतोब प्रतिसाद द्यायची सोय कुठे असायची?

अनेक लहान लहान लेखांचं एखादं पुस्तक लिहिलं गेलं तरी त्यावर देण्यात आलेली प्रतिक्रिया,किंवा एखाद्या पुस्तकावर “समिक्षा” म्हणून देण्यात आलेली प्रतिक्रिया कुठल्यातरी वर्तमानपत्रात आली तर यायची.
तर हे सर्व सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की,
“इंस्टंट प्रतिसाद ” मिळाला की लेखकाला वाचून बरं वाटतं.आणि ती त्याची इच्छा अलिकडच्या ब्लॉग लेखनाने पुरी होत आहे.ह्यावरून एक कविता सुचली ती अशी,
“प्रतिसाद”
(चाल:- प्रतिमा उरी धरोनी ह्या गाण्याची आणि आधार त्याच गाण्याचा)

प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे
ते लेख निर्मितीचे
विचार करोनी लिहावे

उस्फुर्त भावनानी
स्वप्नात गुंग व्हावे
पुष्पात गंध जैसा
लेखात भाव तैसा

अद्वैत लिखणीचे
त्यां जीवनी असावे
तुम्ही सप्तरंग वाचनाचे
व्हावे अनेक मतांचे

विषय जीवनाचे
चर्चीत कुणी बसावे
का वाचकास वाटे
प्रतिसाद कुणा भावे

ते भावस्वप्न कुणाचे
बेकार कां करावे
प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com