Sunday, May 31, 2009

“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला”

त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो. कवी बोरकरांच्या कवितेचा एक संग्रह घेतला.पावती देताना पावतीवर नांव काय लिहू असं मालकानी विचारल्यावर म्हणालो,
“श्रीकृष्ण सामंत”
माझ्या बाजूला एक गृहस्थ अशीच पुस्तकं चाळत असताना,माझं नांव ऐकून कुतूहलाने मला त्यांनी विचारलं,
“ते मिपामधे लिहिता ते तुम्हीच कां?”
सहाजीकच मला हो म्हणावं लागलं.
“तुम्हाला वेळ असेल तर चला आपण जरा गप्पा मारूया.जवळच मामा काण्यांचं हॉटेल आहे.”
कुणी आग्रह केला तर मला त्याचं मन मोडवत नाही.
मी म्हटलं,
“चला”
दोन प्लेट बटाटेवडे आणि दोन कप चहाची ऑर्डर देऊन आम्ही गप्पा मारायला लागलो.
माझी त्यांनी एव्हडी चौकशी केल्यावर मला त्यांच्या विषयी विचारणं स्वाभाविक वाटलं.
मी म्हणालो,
“तुम्ही सध्या काय करता?”
“मी माझं दुसरं पुस्तक लिहितोय.त्या पुस्तकाचं नांव आहे,
“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला.”
माझ्या चेहर्‍यावरचं असाधारण कुतूहल बघून ते गृहस्थ मला म्हणाले,
“तुम्हाला हा पुस्तकाचा विषय जरा विक्षिप्त वाटला असेल.त्याचं कारण देण्यापूर्वी प्रथम मला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.त्या साठी मला थोडं भूतकाळात जावं लागणार आहे.
यापूर्वी मी माझं पहिलं पुस्तक छापलं. मी तसा मुळचा नाटकात काम करणारा नट.हवं तर नाटक्या म्हणा.माझा नट होण्याचाच विचार होता.आणि पुस्तक लिहिण्याचा मी कदापीही विचार केला नव्हता.
मी एक छोटीशी गोष्ट लिहिली होती.आणि माझं नशीब असं की त्या गोष्टीला बक्षीसपण मिळालं.त्यातून उत्तेजन मिळून मी दुसरी गोष्ट लिहायला घेतली.सात एक पानं लिहून झाल्यावर मी तो नाद सोडला.आणि काही वर्ष मी लेखनाचं सर्व विसरूनच गेलो.आणि एक दिवस माझा एक मित्र त्या गोष्टीची ती सात पानं वाचून मला म्हणाला,
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
आणि मी तसंच केलं.
दिवसा साधारण एक पान लिहिणं, असं करीत मी माझं पहिलं पुस्तक पूरं केलं. ते पूरं करायला जवळ जवळ एक वर्ष लागलं.पूर्वीच्या माझ्या गोष्टीला बक्षीस मिळालं असल्याने, साहित्यिक जगात मी चाचपडून पाहिलं.पटकन मला एक एजंट भेटला त्याने ते माझं हस्तलिखीत एका पब्लिशरकडे पाठवलं.
नंतर त्या हस्तलिखीताची कॉपी एका सिनेमाच्या प्रोड्युसरकडे पाठवली.हे सांगताना मला नेहमीच गुदगुदल्या होतात आणि माझ्या अंगावर कांटा येतो.

मी नंतर नट व्हायचं की लेखक व्हायचं ह्याच्यावर खूप विचार करीत होतो.आणि ही विचाराची प्रक्रिया माझ्या नकळतच संपली.काहीतरी प्रचंड झालं आणि माझ्या नजरेतून चूकलं.जीवनातल्या मोठ्या घटना लाल दिव्याच्या उघड-झापिकडे दुर्लक्ष करीत नाहीत.
कधी कधी ते वर्षानुवर्ष दृष्टीपथात येत नाहीत.आणि जेव्हा त्याचे छोटे तरंग आणि प्रतिबिंबं दिसायला लागले की नजरेतून ते सुटत नाहीत.

जरी ही घटना मला त्यावेळी लक्षात आली नाही तरी मला मागे वळवून पाहिल्यावर आता अचूक माझ्यात काय बदलाव झाला ते दाखवतं.
मला ज्यावेळी तो मित्र म्हणाला,
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
खरं सांगायचं तर त्याने त्यावेळी पुस्तक लिहायला सांगितलं असतं,तर मी त्याला वेड्यात काढलं असतं.मी पुस्तक कधीच लिहलं नसतं.
पण त्या शांत वेळी त्याचे ते बिनदास पण उचित शब्द ऐकून माझ्या मनात भितीचा लवलेशही राहिला नाही.
“नक्कीच” मी म्हणालो,”कां नाही?”
त्यानंतर मी ओळखी-अनओळखी लोकात बसून माझ्या पुस्तकाबद्दल बोलायचो आणि त्याचे त्यांच्यावर विस्मयजनक परिणाम होत होते .
त्या माझ्या पहिल्या पुस्तकाचं नांव आहे,
“मी पण अमक्या अमक्या सारखा झालो असतो तर?”
पुस्तकाचा विषय स्वैर-कल्पनेवर आहे.-मी अमुक अमुक व्यक्ति सारखं गायलो असतो तर, मी अमुक व्यक्ति सारखं वाजवलं असतं तर,मी अमुक व्यक्ति सारखं नाचलो असतो तर,मी अमुक व्यक्ति सारखा विनोदी असतो तर, मी काऊच्या चिमणरावासारखा झालो असतो तर वगैरे वगैरे.
ह्यावरची माझी चर्चा ऐकून माझ्या पुस्तकाच्या विषयाचा होणारा सम्मिश्र परिणाम आणि माझा कसलाही आधी विचार नकरता घेतलेला माझ्या व्यवसायचा निर्णय ह्या दोन्ही गोष्टी लोकांना प्रेरीत करून त्यांच्या अपेक्षा वाढवीत होत्या.मी त्यांना नेहमी चांगलंच नवीन काहीतरी करा म्हणून उत्तेजन देतो.तसं करायला ते राजी होतात.
मला हिमालय चढायचा आहे….मला चित्रकार व्हायचं आहे…..आणि एक पंचाहत्तर वर्षाचा यशस्वी व्यापारी म्हणतो मला एक तुतारी विकत घेऊन वाजवायची आहे……
मी ह्या वयस्कर गृहस्थाना विचारलं,
“तुम्ही कुठे रहाता?”
“दादरला”
“प्लाझा सिनेमा समोर एक वाद्यांच दुकान आहे तिकडे जाऊन विकत घ्या,आजचाच दिवस योग्य दिवस आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला”
आणि त्यानी खरोखरंच तिकडे जाऊन तुतारी विकत घेतली.
एक गोष्ट मला न विसरता नक्की सांगायला हवी की,मी त्यावेळी पन्नासएक वर्षाचा असेन ज्यावेळी मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं.आणि त्यानंतरच्या काही वर्षात मी काही धडे शिकलो. पहिलं म्हणजे,
मी घाबरायचं सोडून दिलं.भय कधीही तुमच्या मदतीला येणार नाही.आणि दुसरं म्हणजे जास्त करून “नाय” म्हणण्यापेक्षा “होय” म्हणायला शिका. आणि ह्यावर माझा विश्वास आहे.
आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो,
“आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला.”
आणि ह्याच विषयावर मी माझ्या दुसर्‍या पुस्तकाचं रोज एक पान लिहित आहे.निरनीराळी प्रकरणं माझ्या डोक्यात येत आहेत.बघूया केव्हां हे लेखन संपत ते?
निघण्यापूर्वी मी त्यांना म्हणालो,
“तुमचं हे सर्व ऐकल्यावर,माझ्या डोक्यात तुमच्या त्या मित्राचा सल्ला चांगलाच बसला आहे आणि तो सल्ला मला खूप आवडला.
“जा,लिहित जा. सर्व संपे पर्यंत लिही.”
त्यामुळेच तुम्ही दुसरं पुस्तकं लिहिण्याच्या प्रयत्नात आहात.”
माझं वाक्य संपता संपता ते हंसत हंसत मला म्हणाले,
“आणि तुम्ही पण असंच मिपावर आणि तुमच्या ब्लॉगवर “सर्व” संपे पर्यंत लिहित जा”
माझ्या संभ्रमीत चहेर्‍याकडून बघून ते गृहस्थ माझी पाठ थोपटीत म्हणाले,
“मी त्या अर्थाने नाही म्हटलं बरं का!”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com