Wednesday, May 13, 2009

ह्या विश्वात आपलं अस्तित्वच का असावं?

असा प्रश्न मी आज प्रो.देसायानां केला.मला खात्री होती की भाऊसाहेब मला ह्यावर काहीतरी समजावून सांगतील.थोडावेळ विचार करून मला म्हणाले,“हा कायमस्वरूपी प्रश्न असून हा प्रश्न आपल्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या मुल्याबद्दल असलेल्या मुलभूत आकांक्षांचं ज्ञान प्रकट करतो.”“तेच ज्ञान काय आहे हे मला तुमच्याकडून आज समजावून घ्यायचं आहे.”असं मी म्हणताच,प्रो.देसाई म्हणाले,“मी मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करीन,पण ते तुम्हाला किती पटतं किंवा तुम्ही त्यातून किती समाधान मानून घ्याल ते तुमच्यावर अवलंबून आहे.”“सांगा तर खरं”असं मी म्हणाल्यावर भाउसाहेब सांगू लागले, ”माझं इथं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचा विचार केल्यावर माझ्या मनात येतं की माझ्याबाबत बहूतांश लोकाना स्पष्ट कल्पना असावी,ती अशी की, माझ्या पत्नीला वाटत असावं की मी तिला मदत म्हणून घरातला केरकचरा साफ ठेवावा,मुलांना गृहपाठ करून घेण्यात मदत करावी,आणि जरूर वाटल्यास तिच्या स्वयंपाकात मी तिला मदत करावी.माझ्या बॉसला वाटतं की मी त्याचा जॉब सांभाळावा. माझ्या मोगोमाग येणार्‍याला वाटतं माझ्या गाडीमुळे ट्रॅफिकमधे अडथळा येत असावा. परंतु,ह्या सर्वांच्या अपेक्षा सांभळत जर मी राहिलो तर मला हवं असलेलं उत्तर काही मिळणार नाही. पण असा विचार करण्यात काही काळ जाऊं दिल्यानंतर मला वाटतं पूर्ण नाही तरी काही प्रमाणात मला उत्तर मिळेल.अगदी स्पष्टपणे मला आठवतं,ह्या जगात माझ्या अस्तित्वाची चुणूक मला यापूर्वीच मिळाली आहे.“ते कसं?”असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई म्हणाले,“मला जुन्या गोष्टींची आठवण आली.मी जिथे काम करीत होतो त्या संशोधन संस्थेत एकदा गच्चीत दुर्बिण उभी केली होती आणि सर्वांना आकाशात पहाण्याची सोय करून दिली होती.एक दिवशी आम्हाला शनी हा ग्रह दिसणार म्हणून सांगितलं,आणि शनीवर ती दुर्बिण फोकस करून ठेवली होती.मी प्रथमच त्या दुर्बिणीतून शनी पाहिला.यापूर्वी मी फक्त हे ग्रह चित्रातून पाहिले होते.एखाद्या लहानश्या वॉशरमधे एक तितकाच लहान मणी तरंगत ठेवावा तसा तो शनीग्रह दिसत होता.त्यावेळी मात्र ह्या विश्वाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच अचानक बदलला.माझ्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर मला नेहमीच माहित असायचं की आकाशात जे झगमगतं ते आकाशातले तारे आणि ग्रह आहेत.पण अगदी सहज मनात आल्यावर मी विचार केला की हे सर्व ग्रह-तारे दुसरं तिसरं काही नसून विश्वाच्या छ्प्परामधून टोचून भोकं पाडलेल्या टांचण्यांच्या वरच्या टोप्या-pinheads- आहेत.शनीग्रहाला दूर्बिणीतून पाहिल्यावर खरं वाटायला लागलं.ग्रह-तारे-आकाशगंगा ह्या खर्‍याच आहेत.हे विश्व अनंतापर्यंत एव्हडंपसरलंय की ते माणसाच्या समजूतीच्या पलिकडचं आहे.मनात यायला लागलं ह्याच कारणास्तव मोठ मोठ्ठ्या संशोधकानी अवलोकन करताना ते इतराना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्यानी तुरुंगात जाण्यापासून ते देहदंड मिळेपर्यंत तो धोका पत्करला.आणि अशाच काहीश्या कारणास्तव भावीवक्ते पण तुरुंगात आणि फाशी जाऊन पण धर्मसंबंधाने आपले ऊपदेश देत राहिले.त्यानी काहीतरी अद्भुत गोष्टी शोधून काढून मनुष्याच्या ज्ञानात भर घालताना ह्या जगतसृष्टित आपलं स्थान काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.तसं पाहिलं तर बरेचसे लोक जिथे आहेत तिथे सुखी आहेत.आणि त्यांच्या सध्याच्या असलेल्या विचारसरणीत फरक झाला तर ते प्रतिकार करायला मागे पुढे पहाणार नाहीत.पण माझी खात्री आहे की मनुष्य आपली प्रगती करीतच रहाणार आणि नवीन नवीन ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार. मग ते ज्ञान शास्त्रीय असो अथवा आध्यात्मिक असो.विज्ञान आध्यात्माशिवाय भावशून्य आहे आणि आध्यात्म विज्ञानाशिवाय अभिलाषा कल्पित चिंतन होईल.मग आपलं इथलं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचं उत्तर असं वाटतं की आपला जीवनमार्ग काटत असताना आपण कशावर विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्ष काय समजतो ह्याचा समतोल संभाळण्यासाठी कदाचीत हे अस्तित्व असेल.आणि मला वाटतं अशा समजूतीवर मला समाधान मानून घ्यायला हरकत नाही.तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मला वाटतं तसं दिलं असं मला वाटतं.”मी म्हणालो,“भाऊसाहेब मला पण तुम्ही समाधान मानून घेता तसं घ्यायला हरकत नाही.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)shrikrishnas@gmail.com

No comments: