Thursday, May 21, 2009

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

“ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो. पण हे आव्हान जरा जबरी होतं.मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्या पलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय? तसं माझं पैशाचं सेव्हिंग जरूरी प्रमाणे होतं.रस्त्यावर येण्याची काही पाळी नव्हती.एक निर्बल करणारी उत्कंठा होती की घर सोडून मुंबईहून बाहेर जाणं म्हणजे एक महत्वपूर्ण व्याप होता. “

माझा मावसभाऊ जून्या आठवणी काढून मला हे सांगत होता. आता हा माझा मावसभाऊ कोकणात मांडकूलीला राहत आहे. हे गांव कोकणात कुडाळ पासून तीन मैलावर आहे.भावाची शेतीवाडी,गाई-गुरं आहेत.घरही तसं मोठं आहे.मी त्याला भेटायला गेलो होतो.

“काही तरी स्वेच्छेने काम करावं असं मनात येत होतं. शेती आणि त्यासाठी लागणारी माहिती शहरात वाढलेल्या मला कुठून मिळणार.सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत मिटिंग्स मिटिंग्स आणि मिटिंग्स घेण्यात आणि मिटिंगला हजर राहण्यात आयुष्य गेलं.हातपाय मोडून कंबर कसून काम करायची जबाबदारी जरा हटकून वाटत होती.”

मी त्याला म्हणालो,
“लहानपणी मावशीकडे शाळेच्या सुट्टीत मी येऊन राहयचो. तिची शेती आणि गाई-गुरं संभाळून कंबर कसून काम करण्याची जीद्द मी पाहिली होती.जोताला लावलेली पवळ्या-ढवळ्या बैलाची जोडी आठवते, कपिला आणि तिचं वासरूं तानु आणि त्यांची नीगा ठेवण्याची कामं, मावशी नोकरांकडून करून घ्यायची. गाईला चारा घालून झाल्यावर सकाळच्या वेळी चकचकीत घासलेली पितळेची दुधाची चरवी आणून गाईच्या आंचळांना चरवीतल्या थंड पाण्याने झपकारून झाल्यावर तानुचा दावा सैल करून सोडून दिल्यावर ते चार खूरावर उंच उड्या मारीत आपली शेपटी उंच ताठ करून आपल्या आईच्या आंचळाना लुचायला जाताना आणि कपिलापण आपलं बाळ दुध प्यायला आल्यावर प्रेमाने त्याला चाटून चाटून गोंजारातना पाहून ह्या मुक्या प्राण्यांचं निष्पाप प्रेम बघून माझा जीव कासाविस व्ह्यायचा.तानु सुद्धा आपल्या आईचं दुध लुचता लुचता आणि जबड्यातून दुध बाहेर पडत असताना सुद्धा आणखी धार मिळावी म्हणून आईच्या आंचळाना ढुसक्या मारताना पाहून माझ्या मनात यायचं की किती हा अधिरेपणा? पण ती अधिरता नव्हती ते एक पुन्हा त्या मुक्या प्राण्याचं -तानुचं- गगनातल्या आनंदाचं प्रतिक असावं.”

माझं हे लहानपणातलं अनुभवाचं वर्णन ऐकून मला माझा भाऊ म्हणतो कसा,
“हे मीही पाहिलं होतं.पण एकदा मुंबईत आल्यानंतर इकडच्या दुनियादारीत आणि व्यापात जीवन इतकं गुरफटून गेलं होतं की,कधीतरी आईला भेटायला म्हणून कोकणात गेलो तर दोन चार दिवसाची धांवती भेट असायची,आणि मुंबईतल्या कामाचाच बोजा डोक्यावर सतत असल्याने हे बालपणातलं जीवन आठवून मश्गुल व्हायला मनस्थिती नसायची.
तू आता म्हणालास तेव्हा माझ्या आठवणी जागृत झाल्या.
पण कपिला बिचारी गेली.तानुला आता दोन पाडसं झाली आहेत.कपिले सारखीच तानू दूध भरपूर देते. आईच्याच वळणावर गेली आहे.”

“तू बरं केलंस.निवृत्त झाल्यावर तुझा इकडे येण्याचा विचार मला आवडला.नोकरी करणार्‍यानी शहरात विशेष करून मुंबई सारख्या शहरात गर्दी करून राहणं निराळं आणि निवृत्तीत आल्यावर संध्याकाळी बाल्कनीत बसून किती बसीस गेल्या आणि किती ट्रक रस्त्यावरून पास झाले ह्याची गणती करण्यात जीवन कामी लावण्यात काही अर्थ नाही.आणि जास्त करून तुझ्यासारख्या लोकानी ज्यांना कोकणात शेतीवाडी आहे अशा लोकानी तर जरूर तसं करूं नये.”
असं मी म्हणाल्यावर मला भाऊ सांगू लागला,
“तुला खरं सांगायचं तर ही प्राण्यांची ओढ मला निवृत्त होऊन इथे आल्यावर तू मघाशी वर्णन केल्यास त्या बालपणाच्या आठवणी येऊन मुंबईच्या त्या धकाधकीच्या जीवनाची उबग आणायची. ह्या प्राण्यांच्या सानिध्यात राहाण्यासारखं दुसरं स्थान मला जगात मिळणार नाही अशी मनात आता खात्री झाली आहे.
अश्या ठिकाणी मी आनंदी राहिन आणि माझी ह्या प्राण्यांना जरूरीही भासेल हे मनात येऊन माझ्या मनाला तृप्ति मिळायला लागली.
इथे येऊन राहण्यापूर्वी माझ्या मनात भय होतं आणि माझ्या जीवनाच्या त्या टप्प्यात कशाचीच खात्री नसलेल्या गोष्टींच्या विवंचनेत राहाण्याचं स्थित्यंतर त्यावेळी आलं होतं.”

आता माझी मनातली भिती गेली आहे.आणि त्याचं कारण हे मुकेप्राणीच आहेत. गाई,वासरं,बैल,शेळ्या,कोंबड्या हे पाळीव प्राणी मला आता परिचीत झाले आहेत आणि ते मला आत्मिक अनुभव देत आहेत.ह्या प्राण्यांच्या सानिध्यात असल्यावर एक कायापालट झाल्या सारखं वाटायला लागलं.शहरात राहून जी परंपरा अनुभवीत असायचो त्याचा विचार येऊन,
“गेली ३५ वर्षं मी कुठे होतो?”
असा प्रश्न कधी कधी आपसूप मनात येतो. आता मी ह्या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात त्यांचं अवलोकन करतो, त्यांना मदत करतो.त्यांचा साथी आणि सहयोगी अशीच भुमिका पार पाडताना माझं मन प्रसन्न होतं.
अलीकडे माझ्या लक्षात आलं की मी विचारही करूं शकणार नाही अश्या प्रकारे माझं क्षितिज मी विकसित केलं आहे. ह्या प्राण्यांची देखभाल करता करता मी स्वतःच माझा फायदा करून घेत आहे.
ह्या मुक्या प्राण्यांच्या सहवासात राहून माझ्या मनाला शांती मिळत आहे.”
जेवायची वेळ झाली होती.उठतां उठतां मी त्याला म्हणालो,
“हे सगळे समजूतीचे खेळ आहेत.जनावरांच्या सानिध्यात जर का तुला शांति मिळते,तर ते अगदी नैसर्गिक आहे.आणि ते तू सांगू शकतोस.पण क्षणभर विचार कर त्या मुक्या प्राण्यांना तुला त्यांच्या सानिध्यात पाहून त्यांना किती आनंद होत असेल.
मी तर म्हणेन तुम्हा दोघां मधली ही निसर्गाचीच ओढ असावी. फक्त ते प्राणी मुके असल्याने तुला तसं ते सांगू शकत नाहीत एव्हडंच.”


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com